ETV Bharat / city

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे-भाजप एकत्र येणार?

author img

By

Published : Nov 6, 2021, 6:06 PM IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतांची टक्केवारी कमी झाली आहे. असे असले तरीही राज ठाकरे यांच्या वक्तृत्वाचा मोठा प्रभाव तरुण पिढीवर अद्यापही आहे. सध्याच्या परिस्थितीत राज ठाकरे आणि त्यापाठोपाठ अमित ठाकरे मैदानात उतरल्याने मनसेला पुन्हा एकदा आपली ताकद वाढविता येणार आहे. जर मनसे आणि भाजपा युती झाली तर राज ठाकरे यांच्या वक्तृत्वाचा आणि करिश्म्याचा फायदा भाजपलाही होऊ शकतो.

आशिष शेलार राज ठाकरे
आशिष शेलार राज ठाकरे

मुंबई- आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजप नेते आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झालेली भेट महत्त्वाची मानली जाते आहे. या दोघांच्या भेटीमुळे मनसे आणि भाजपा एकत्र येणार का? नवीन समीकरण जुळणार का? अशी चर्चा आता सर्वस्तरातून सुरू आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नुकतेच कोरोनामधून बरे झाले आहेत. यानिमित्ताने त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भाजप नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना पेंग्विन पब्लिकेशन्सचे ''द बुक ऑन मूवी'' हे पुस्तक भेट म्हणुन दिले आहे. राज ठाकरे हे चित्रपटशौकीन आहेत. त्यांना हे पुस्तक नक्कीच आवडेल म्हणून भेट दिल्याचे आशिष शेलार यांनी सांगितले आहे. मात्र, ही भेट केवळ पुस्तक देण्यासाठी नाही तर मुंबईतील आगामी महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही नवीन समीकरण जुळण्यासाठी होती, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.


हेही वाचा-हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांनी राज ठाकरेंची घेतली भेट


मनसे -भाजपा एकत्र आल्यास काय होणार?

मुंबई महानगरपालिकेत मनसेची ताकद फारशी नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संख्याबळाला मुंबई महानगरपालिकेत उतरती कळा लागल्याचे चित्र गेल्या दोन निवडणुकांमध्ये पहायला मिळाले. यामागे अनेक कारणे आहेत. राज ठाकरे यांची अनेक मुद्द्यांबाबत असलेली धरसोड वृत्ती, तसेच शिवसेनेने घेतलेला हिंदुत्वाचा आणि मराठी भाषिकांचा मुद्द आहे. तसेच मुंबईमध्ये मोदीला लाटेनंतर भाजपला मिळालेले यश ही कारणे आहेत. मात्र, असे असले तरी भाजपची ताकद आगामी निवडणुकीत कमी होऊन त्यांचे संख्याबळ घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा वेळेस मनसेसारखा पक्ष सोबत आला तर भाजपची ताकद वाढेल. मुख्य म्हणजे दक्षिण मध्य मुंबईत त्याचा चांगला फायदा होईल, असे भाजपला वाटते. तर उत्तर मुंबई आणि पूर्व पश्चिम उपनगरांमध्ये भाजपच्या ताकदीचा मनसेला फायदा होऊ शकतो, अशी अटकळ बांधण्यात येत आहे. त्यामुळे आशिष शेलार आणि राज ठाकरे यांनी याबाबतची प्राथमिक चाचपणी केली असण्याची आणि आराखडा ठरविल्याची चर्चा सुरू आहे.


हेही वाचा-जास्मिन वानखेडेंच्या पाठीशी मनसे ठाम राहणार - अमेय खोपकर


मनसेचा भाजपला होणार फायदा?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मतांची टक्केवारी कमी झाली आहे. असे असले तरीही राज ठाकरे यांच्या वक्तृत्वाचा मोठा प्रभाव तरुण पिढीवर अद्यापही आहे. सध्याच्या परिस्थितीत राज ठाकरे आणि त्यापाठोपाठ अमित ठाकरे मैदानात उतरल्याने मनसेला पुन्हा एकदा आपली ताकद वाढविता येणार आहे. जर मनसे आणि भाजपा युती झाली तर राज ठाकरे यांच्या वक्तृत्वाचा आणि करिश्म्याचा फायदा भाजपलाही होऊ शकतो.

हेही वाचा-आता मुक्काम पोस्ट 'शिवतीर्थ'... राज ठाकरे यांचा नवीन घरात प्रवेश

भाजपला पुन्हा मिळणार बालेकिल्ल्यात यश?

मुंबई महानगरपालिकेच्या गेल्या निवडणुकीमध्ये भाजपने दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईत अनेक जागा जिंकत शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला होता. यामध्ये लालबाग, परळ, वरळी, शिवडी, दादर, भायखळा या विभागांचा समावेश होतो. या विभागांमध्ये जिथे शिवसेनेचा विजय झाला. तिथे भाजप आणि मनसे यांना दुसऱ्या - तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. जर शिवसेनेला टक्कर द्यायची असेल तर भाजप आणि मनसे युती झाली तरच या भागात फरक पडू शकतो, असे जाणकारांचे मत आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र आल्यास त्यांना अधिक जागा मिळू शकतील. भाजपाला मुंबईत सत्ता काबीज करायची असेल, तर त्यांना मनसेच्या शिडीचा वापर होऊ शकतो.

राज ठाकरे यांच्या भूमिकेचे भाजपने केले होते स्वागत

विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर नुकतेच म्हणाले होते, की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जे कोणी पुढे येत आहेत त्यांचे स्वागतच आहे. राज ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांचे बरेच अविष्कार आहेत. त्यामुळे राज ठाकरे आयोध्याला गेल्यास हिंदुत्वाचा आवाज आणखी मजबूत होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या नसानसामध्ये मध्ये हिंदुत्व आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांच्या भूमिकेचे भाजपकडून स्वागत केले जात आहे. शिवसेनेने वेळोवेळी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. अगदी काँग्रेसला पुरक अशा भूमिकादेखील शिवसेनेने घेतली आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कधीही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस पक्षाला पूरक अशी भूमिका घेतली नसल्याची आठवण विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण यांनी करून दिली होती.

हिंदुत्वाचा विषय होऊ शकतो निवडणुकीचा मुद्दा?

काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदुत्वाच्या विषयावरून आक्रमक झालेली पाहायला मिळाली होती. मंदिर आंदोलन असेल व इतर आंदोलन असतील यामध्ये मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. राज ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी पक्षाचा झेंडा बदलत नवी भूमिका समोर आणली होती. त्यानंतर आता हिंदुराष्ट्राच्या उभारणीसाठी राज यांनी अयोध्येला जाण्याचे महंताना आश्वासन दिले आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे हिंदुत्वाच्या विषयावर निवडणुका लढवण्याचे संकेत आहेत. याच मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती देखील होऊ शकते, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तविण्यात येत आहे.

राज ठाकरेंची ईडीकडून चौकशी

दरम्यान, कोहिनूर मिल प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना ईडीकडून ऑगस्ट 2019 मध्ये नोटीस बजावण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाजपविरोधी भूमिकेमुळे त्यांना टार्गेट केल्याचा आरोप मनसैनिकांनी केला होता. ईडीकडून विरोधी पक्षातील नेत्यांना सातत्याने टार्गेट केले जात असल्याचा आरोप होत आहे. अशा स्थितीत मनसे भाजपच्या विरोधात भूमिका घेणार नसल्याचा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.