मुंबई - मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या बरोबर नवीन खुलासेदेखील त्यांनी केले होते. त्यांची बहीण जास्मिन वानखडे यांच्यावरही त्यांनी टीका केली होती. याला मनसेने उत्तर दिले आहे. आम्ही जास्मिन वानखेडे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार आहोत, असे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी स्पष्ट केले आहे.
जास्मिन यांच्यावरील आरोप खपवून घेणार नाही
नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांच्या संदर्भात मनसेने आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी जास्मिन यांची पाठराखण करण्यात आली. तसेच नवाब मलिक यांच्याकडून जास्मिन वानखेडे यांच्यावर केले जाणारे आरोप आम्ही खपवून घेणार नसल्याचे मनसे नेते अमेय खोपकर यांनी म्हटले आहे. मनसे चित्रपट सेनेच्या जास्मिन वानखेडे या पदाधिकारी राहिल्या आहेत. त्या रात्रंदिवस महिला आणि मुलांसाठी काम करतात आणि त्यांना न्याय मिळवून देतात. आमच्या पदाधिकाऱ्यावर खालच्या पातळीची टीका केल्यास आम्ही खपवून घेणार नाही असे खोपकर म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जाऊन वसुली करतात
नवाब मलिक हे कुठले डॉन आहेत का? सर्वजण नवाब भाई बोलतात. एखाद्या महिलेला लेडी डॉन त्यांनी बोलणे योग्य आहे का? नवाब मलिकांनी जास्मिन वानखेडेवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. मनसे चांगल्या कामाच्या मागे नेहमीच उभी राहील. महाराष्ट्रात जिथे चित्रपटांची शूटिंग चालते, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जाऊन वसुली करतात, त्यांची लिस्ट देतो, त्यांना अटक करून दाखवा, असे आव्हान खोपकर यांनी नवाब मलिक यांना केले.
आरोप सिद्ध करा
आम्हाला अभिमान आहे की जास्मिन वानखेडे मनसेमध्ये काम करत आहेत.आम्ही ठामपणे जास्मिन यांच्या मागे उभे आहोत. गेल्या 4 वर्षांपासून त्या मनसेमध्ये काम करत आहेत. नवाब मलिकांनी पुराव्या निशी आरोप करावेत. त्यांनी केलेले आरोप सिद्ध करा, तूम्ही तुमचं राजकारण करा पण महिला आहेत त्याकडे तरी लक्ष द्या, असे मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियाचं कनेक्शन काढू का?
नवाब मलिक मूर्ख माणूस आहे. नवाब मलिक मला मालदीव बद्दल विचारतायत त्यांना मी का सांगू तिकडे कशाला गेलेले, माझ्या कुटुंबाला सांगेन. नवाब मलिक यांना वेळ आहे ते पत्रकार परिषद घेऊन बोलत आहेत. मी नवाब मलिक यांच ऑस्ट्रेलियाचं कनेक्शन काढू का? ऑस्ट्रेलियावर आता जास्त बोलणार नाही वेळ आली की नक्की बोलेन... ऑस्ट्रेलियाबद्दल त्यांना विचारा ते सांगतील असे जास्मिन वानखडे यांनी सांगितले.
हेही वाचा - Money laundering case : मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीनची चौकशी, नेमकं प्रकरण काय आहे?