ETV Bharat / city

महापरिनिर्वाणदिनी डॉ. आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करा, चैत्यभूमीवर गर्दी नको - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

author img

By

Published : Nov 23, 2020, 4:35 PM IST

Updated : Nov 23, 2020, 4:54 PM IST

Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले दैवत आहे. आपण त्यांचे अनुयायी आहोत, त्यांच्या विचारांची प्रगल्भता कृतीतून दाखविण्याची ही वेळ आहे. बाबासाहेब आयुष्यभर अन्यायाविरोधात संघर्ष करत राहिले. त्यांच्या अभिवादनाच्या कार्यक्रमात लोकांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. त्यामुळे सहा डिसेंबरला चैत्यभूमीवर गर्दी करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंबेडकरी अनुयायांना केले आहे.

मुंबई - महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ओळखून या अनुयायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता दाखवावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सहा डिसेंबर रोजीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक झाली. त्यानंतर ते बोलत होते.

चैत्यभूमीवर स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी -

महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीनेही सहा डिसेंबर रोजी अनुयायांना अभिवादनासाठी मुंबईत न येण्याचे आवाहन केले आहे. या भूमिकेचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वागत केले. तसेच समितीने चैत्यभूमी येथील अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या सूचनांच्या कार्यवाहीबाबत संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले. त्यानुसार महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन आणि दर्शनाचे थेट प्रक्षेपण, विविध माध्यमातून ऑनलाईन दर्शन, स्मारकावर हेलिकॉप्टरद्वारे पृष्पवृष्टी यांसह विविध सुविधा यांचे नियोजन करण्यात येणार आहे.

असाल तिथून अभिवादन करा -

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले दैवत आहे. आपण त्यांचे अनुयायी आहोत, त्यांच्या विचारांची प्रगल्भता कृतीतून दाखविण्याची ही वेळ आहे. बाबासाहेब आयुष्यभर अन्यायाविरोधात संघर्ष करत राहिले. त्यांच्या अभिवादनाच्या कार्यक्रमात लोकांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. कोविडचे संकट जाता जात नाही. ते संपले असे मानू नये. चैत्यभूमीवर गर्दी न करता डॉ. बाबासाहेब याना अभिवादन करण्यासाठी ज्या-ज्या काही गोष्टी करायच्या त्या सर्व केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ दिला जाणार नाही. यापुर्वीही आपण सर्व सणवार साधेपणाने साजरे केले आहे. डॉ. बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण हा गांभीर्याने आणि अभिवादन करण्याचा प्रसंग आहे. त्यामुळे या कठीण काळात आपण जिथे आहात तिथूनच डॉ. बाबासाहेब यांना अभिवादन करा, असेही मुख्यमंत्र्यानी आवाहन केले.

आजोबा आणि बाबासाहेब यांचे ऋणानुबंध -


शिवसेना प्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नुकताच झालेला स्मृतीदिनही साधेपणानेच साजरा केला होता. त्यापूर्वी लाखोंच्या गर्दीच्या साक्षीने होणारी विठूरायाची पंढरीची वारीही साधेपणाने करावी लागली होती, याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, महापरिनिर्वाण दिनी गर्दी न करता, मोजक्यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्याचा महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचा निर्णय स्वागतार्हच असाच आहे. सरकार म्हणून आम्ही जबाबदारी घेतली आहे. पण आता अनुयायी म्हणून जबाबदारी घ्यावी लागेल. आपण बाबासाहेबांकडून प्रेरीत आणि भारीत होऊन समाजाला पुढे नेऊ या. माझ्या आजोबांचे आणि डॉ. बाबासाहेब यांचे ऋणानुबंध होते. त्यांच्यामध्ये स्नेह होता. हे ऋणानुंबध आपण समाजापर्यंत नेऊ या, असेही त्यांनी सांगितले.

नियमांचे पालन करा -


गृहमंत्री देशमुख म्हणाले की, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीने चागंली भूमिका घेतली आहे. आतापर्यंत सर्वधर्मियांनी सणवार अत्यंत साधेपणाने साजरे केले आहेत. महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे कोरोनाच्या या संकट काळात तो साधेपणाने व्हावा. नियमांचे पालन केल्यास या संकटाला रोखता येणार आहे. अभिवादन आणि दर्शनासाठी गृह विभागांसह सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

बैठकीला हे हजर -


या बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, खासदार राहूल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकूमार जायस्वाल, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर-सिंह, मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंह, जिल्हाधिकारी राजीव निवतकर, ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र मुणगेकर, महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सचिव नागसेन कांबळे, समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सी. एल. थूल उपस्थित होते.

Last Updated :Nov 23, 2020, 4:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.