ETV Bharat / city

चार राज्याच्या विजयानंतर भाजपचा केंद्रीय तपास यंत्रणेच्या चक्रव्यूहात ठाकरे सरकार

author img

By

Published : Apr 6, 2022, 4:01 PM IST

महाराष्ट्रातील भाजपचे नेते 5 राज्याच्या निवडणुकीपूर्वी वारंवार संकेत देत होते की 5 राज्याच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहे. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या धाडी संदर्भातील भविष्यवाणी ( MH political situation ) केली होती का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर आगामी महानगरपालिका निवडणुका पाहता शिवसेनेच्या नेत्यांविरोधात ईडीचा फास आणखी आवळण्याची शक्यता ( ED action Shivsena leaders ) राजकीय वर्तुळात सुरू आहे.

चक्रव्यूहात ठाकरे सरकार
चक्रव्यूहात ठाकरे सरकार

मुंबई- नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर भाजपला चार राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणेने धुमाकूळ सुरू केला आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी नेत्यांच्या मालमत्तांवर मोठ्या प्रमाणात धाडी सुरू आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीय तसेच नातेवाईकांवरदेखील ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.

महाराष्ट्रातील भाजपचे नेते 5 राज्याच्या निवडणुकीपूर्वी वारंवार संकेत देत होते की 5 राज्याच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहे. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या धाडी संदर्भातील भविष्यवाणी ( MH political situation ) केली होती का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर आगामी महानगरपालिका निवडणुका पाहता शिवसेनेच्या नेत्यांविरोधात ईडीचा फास आणखी आवळण्याची शक्यता ( ED action Shivsena leaders ) राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेना आता भाजपने असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणेच्या चक्रव्यूहातून कसे बाहेर पडणार याकडे सर्वच राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

कुणाकुणाची नावे या संपूर्ण प्रकरणांमध्ये चर्चेत ( ED actions on leaders in Maharashtra ) -गेल्या 15 दिवसांत शिवसेनेच्या तिघांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस पेटत चाललेला आहे. 15 दिवसांत शिवसेनेचे कोण कोणते नेते ईडीच्या जाळ्यात अडकले? कुणाकुणावर कारवाई झाली? शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचे किती जण कारवाईला सामोरे जात आहेत? कोणत्या पक्षाचे किती नेते, मंत्री, आमदार, खासदार ईडीच्या कचाट्यात अडकण्याची भीती आहे? कुणाकुणाची नावे या संपूर्ण प्रकरणांमध्ये चर्चेत आहेत?

उद्धव ठाकरे यांच्यासाठी सर्वात मोठा इशारा ( BJP warning to MH CM ) - शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊतांची अलिबाग आणि दादरमधील मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. फक्त संजय राऊतच नाही तर मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती यशवंत जाधव, मिलिंद नार्वेकर, मंत्री अनिल परब, खासदार भावना गवळी, शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर या सगळ्यांच्या मागेही केंद्रीय यंत्रणा लागल्या आहेत. आता हे सगळे जण शिवसेनेचे चेहरे आहेत. पण आता या मोहऱ्यांसोबत जे घडलय तेच राजासोबत घडणार असे भाजप म्हणत आहे. हा ठाकरेंसाठी सर्वात मोठा इशारा मानला जात आहे. मातोश्रीवरच आता ईडी धडकणार का? असा येथील राजकीय वर्तुळात सध्या चर्चेला विषय बनला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यांची मालमत्ता जप्त ( ED seized property of Shridhar Patankar ) -केंद्रीय तपास यंत्रणा ईडी, प्राप्तीकर विभाग व सीबीआयच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात कोणत्या ना कोणत्या केंद्रीय तपास यंत्रणामार्फत चौकशी सुरू आहे. यात सर्वाधिक सक्रिय असलेली ईडीने तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित मालमत्ता जप्त केली आहे. आता तर महाविकास आघाडीचे सर्वात खंबीर नेते म्हणून ओळखले जाणारे शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केल्याने शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनादेखील धास्ती बसली असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अटक ( Anil Deshmukh Nawab Malik arrest ) - राज्यात ईडीने आजपर्यंत अनेक दिग्गज नेत्यांना चौकशी करीत समन्स पाठवलेले होते. त्यांची चौकशीदेखील केलेली आहे. तर अनेक महाविकास आघाडीचे नेते चौकशीच्या रांगेत उभे आहेत. या सर्वामध्ये आतापर्यंत ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी खासदार आनंदराव अडसूळ, खासदार भावनाताई गवळी, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निकटवर्तीय यांच्या मालमत्तांवरदेखील ईडीने छापे टाकले होते. ईडीने ठाकरे सरकारमधील दोन प्रमुख मंत्र्यांनादेखील अटक केली आहे. त्यात प्रामुख्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे.

यशवंत जाधव यांच्यावर कारवाई- स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते यशवंत जाधव यांच्यासह त्यांचे जवळचे सहकारी आणि मुंबई महानगरपालिकेसाठी कंत्राटे घेणारे काही कंत्राटदार अशा तब्बल 35 हून अधिक ठिकाणी केलेल्या छापेमारीमध्ये तब्बल 130 कोटी रुपये किंमतीच्या तीन डझन स्थावर मालमत्तांचे तपशील आणि पालिका कंत्राटदारांनी तब्बल 200 कोटींचे उत्पन्न लपवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राप्तीकर विभागाने या कारवाईत 2 कोटींच्या रोख रकमेसह सुमारे दीड कोटींचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. यशवंत जाधव यांच्या सापडलेल्या डायरीत मातोश्रीला 2 कोटी आणि 50 लाखांचे घड्याळ दिल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे या मातोश्री कोण याची चर्चा सुरु झाली आहे. यशवंत जाधव यांनी मातोश्री म्हणजेच आई म्हटले आहे. दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाचे नाव मातोश्री आहे. या व्यवहाराबाबत आयकर विभागाला संशय असल्याने तपास सुरु केला आहे.


श्रीधर पाटणकर यांचीही संपत्ती जप्त - पुष्पक ग्रुप ऑफ कंपनीतील पुष्पक बुलियनविरोधात दाखल गुन्ह्याच्या तपासात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकरांच्या ठाण्यातील निलांबरी अपार्टमेंटचे 11 फ्लॅटस् जप्त केले आहेत हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदीने हमसफर डिलर्स प्रा. लि. या बनावट कंपनीद्वारे पाटणकरांना दिलेल्या 30 कोटी रुपयांतूनच हे फ्लॅटस् पुष्पकने खरेदी केले, असा ईडीला संशय आहे. या 11 फ्लॅटस्ची किंमत 6 कोटी 45 लाख रुपये दाखवण्यात आली आहे.


शिवसेनेचे अनेक मंत्री आणि नेतेही ईडीच्या रडारवर- उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही ईडी आणि किरीट सोमय्यांच्या रडारवर आहेत. दापोलीमधील अनधिकृत रिसॉर्ट आणि आरटीओ बदल्यांमध्ये कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ठाण्यातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनाही ईडीचा दणका बसला आहे. एनएसईल कंपन्यांमधून त्यांच्या कंपन्यांमध्ये पैसे आल्याचा आरोप असून ११.३५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

या नेत्यांच्या मालमत्तांवरही ईडीचे छापे-शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या मालमत्तांवरही ईडीने 5 संस्थावर छापेमारी केली आहे. त्यांच्यावर 100 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे अर्जुन खोतकर यांच्यावर जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावरही ईडीने छापेमारी केली आहे. आमदार रविंद्र वायकर यांच्यावर छापेमारी झाली नसली तरी त्यांच्यावर अलिबागमधील कोर्लई गावात 30 जमीनी करार बंगले खरेदीची प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप आहे. माजी मंत्री आनंदराव आडसूळ यांच्यावरही सिटी बँकेत घोटाळा केल्याचा आरोप असून त्यांच्यावरही ईडीने छापेमारी केली आहे.

काँग्रेसच्या नेत्यांवर अद्याप ईडीची कारवाई नाही- महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून भाजपची सत्तेविना तडफड लपून राहिलेली नाही. शिवसेना आपल्या ताटाखालील मांजर आहे अशीच भाजप नेत्यांची समजूत झाली होती. मात्र अनपेक्षित राजकीय घडामोडींनी राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्याने भाजपला विरोधी बाकावर जाऊन बसावे लागले. अडीच वर्ष होऊनही आणि महिन्याला नवीन मुहूर्त देऊनही सरकार पडत नसल्याने भाजपची अस्वस्थता जास्तच वाढत चालली आहे. ईडी कारवाईवर नजर टाकल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. ईडीला काँग्रेसची आठवण करून द्यावी असे भाजपला आजघडीला तरी वाटत नसल्याचे झालेल्या कारवाईवरून दिसते.

शिवसेनेच्या तीन बड्या नेत्यांवर ईडीची कारवाई- महाविकास आघाडी सरकार अडीच वर्ष होऊनही पाडण्यात यशस्वी होता येत नसल्याने राज्यातील भाजपने ईडी, सीबीआय आणि प्राप्तिकर विभागाचा खुबीने वापर करून ठाकरे सरकारची पुरती कोंडी करून ठेवली आहे. सरकारमधील राष्ट्रवादीचे मंत्री असलेले अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या तुरुंगामध्ये आहेत. मागील 15 दिवसांत शिवसेनेच्या तीन बड्या नेत्यांवर ईडीने कारवाई केली आहे. त्यात 23 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती जप्त करण्यात आली. 25 मार्च रोजी ईडीने आपला मोर्चा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांकडे वळवला. तर 5 एप्रिल रोजी शिवसेना खासदार संजय राऊत यांची अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती ईडीने जप्त केली आहे.

या ठिकाणचीही मालमत्ता जप्त- मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकरांवर पुष्पक बिलीयन फसवणूक प्रकरणात ईडीने कारवाई केली. त्यात पाटणकरांचे ठाण्यातील 11 फ्लॅटसह 6 कोटी 45 लाखांची संपत्ती ईडीने जप्त केली. आमदार प्रताप सरनाईकांवर NSEL घोटाळा प्रकरणात कारवाई झाली. त्यात सरनाईकांचे ठाण्यातील दोन फ्लॅट ईडीने जप्त केले. हिरानंदानी इस्टेटमधील राहत्या घरासह मीरा रोड येथील 250 मीटरची जमीन मिळून एकूण 11 कोटी 35 लाखांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. तर मंगळवारी गोरेगावातील पत्राचाळ घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगवरुन संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांचा अलिबागमधील किहीम गावातील प्लॉट आणि दादरमधील एक फ्लॅट जप्त केला आहे.

सर्वाधिक शिवसेनेच्या नेत्यांवर ईडीची कारवाई-आता संजय राऊतांना अटक होणार असे भाकीत किरीट सोमय्यांनी वर्तविले आहे. मोहित कंबोजही तेच म्हणत आहेत. नवाब मलिक आर्थर रोड जेलमध्ये जाताच, कंबोज यांनी सलीम के बाद जावेद भी जायेंगे असे म्हटले होते. गेल्या अडीच वर्षांपासून सुरूअसलेल्या ईडी कारवायांमध्ये किती जणांचा समावेश आहे, ते ही जाणून घेऊयात. ईडी आणि प्राप्तिकर विभागाच्या कारवायांमध्ये शिवसेना पहिल्या स्थानी आहे.

हे नेते ईडीच्या रडारवर-शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी आहे. शिवसनेचे 8 नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. तर राष्ट्रवादीच्या 7 नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लागलाय. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवर आयकर विभागाचीही बारिक नजर आहे. शिवसेनेने कोण कोणते नेते ईडीच्या निशाण्यावर आहेत? याचे उत्तर जाणून घ्यायचं झाल्यास संजय राऊत, अनिल परब, प्रताप सरनाईक, राहुल कनाल, भावना गवळी, अर्जुन खोतकर, यशवंत जाधव, आनंद अडसुळांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नवाब मलिक, अनिल देशमुख, प्राजक्त तनपुरे, एकनाथ खडसे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागलाय. तर अजित पवारांचे निकटवर्तीय आयकर विभागाच्या फेऱ्यात अडकले आहेत.

हेही वाचा-Satish Uke Case : सतीश उकेंना मोठा धक्का; 11 एप्रिलपर्यंत कोठडीत वाढ

हेही वाचा-Devendra Fadnavis : भावनिक पळवाट काढू नका.. कायद्याने उत्तर द्या : फडणवीसांचा राऊतांना टोला

हेही वाचा-BJP Founding Day : भाजप श्रेष्ठ भारताचा संकल्प बळकट करत आहे -पंतप्रधान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.