ETV Bharat / bharat

Bhima Koregaon Case : भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी वर्नॉन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना जामीन मंजूर

author img

By

Published : Jul 28, 2023, 3:30 PM IST

Updated : Jul 28, 2023, 3:57 PM IST

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी वर्नॉन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने उभय आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला आहे. ते ऑगस्ट 2018 पासून तुरुंगात आहेत.

Bhima Koregaon
भीमा कोरेगाव

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी वर्नॉन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना जामीन मंजूर केला आहे. ते ऑगस्ट 2018 पासून तुरुंगात आहेत. जामीन देताना न्यायालयाने, गोन्साल्विस आणि फरेरा त्यांना ताब्यात घेतल्यापासून जवळपास 5 वर्षे उलटली आहेत, त्यामुळे त्यांना जामीन देण्यात आला आहे, असे म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला नव्हता : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुधांशू धूलिया व न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस खंडपीठाने वर्नॉन गोन्साल्विस व अरुण फरेरा यांना जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे असले तरी, एवढा काळ तुरुंगात काढल्यामुळे जामीन मिळणे हा त्यांचा हक्क आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर या दोघांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.

सशर्त जामीन मंजूर : या प्रकरणी युक्तीवाद करणाऱ्या याचिकेत गोन्साल्विस व फरेरा यांनी, उच्च न्यायालयाने आमचा जामीन अर्ज फेटाळून लावला, मात्र याच प्रकरणातील सहआरोपी सुधा भारद्वाज यांना जामीन देण्यात आला, असे म्हटले होते. या दोघांवर माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे. न्यायालयाने उभय आरोपींना सशर्त जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या अटींनुसार, गोन्साल्विस व फरेरा यांना एकच मोबाइल वापरता येणार आहे. तसेच त्याचे लोकेशन तपास अधिकारी 24X7 ट्रॅक करणार आहेत. याशिवाय त्यांना महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी विशेष NIA न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. तसेच पोलिसांनी त्यांचे पासपोर्ट देखील ताब्यात घेतले आहेत.

प्रकरण काय आहे : पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या परिषदेला माओवाद्यांनी फुस असल्याचा आरोप आहे. परिषदेतील भाषणांतर दुसऱ्याच दिवशी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव युद्ध स्मारक परिसरात हिंसाचार झाला होता. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर, ऑक्टोबर 2018 मध्ये वर्नॉन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर UAPA अंतर्गत आरोप लगवण्यात आले होते. तेव्हापासून हे दोघे तुरुंगात आहेत.

हेही वाचा :

  1. Devendra Fadnavis : 'भीमा-कोरेगाव प्रकरणी प्रकाश आंबेडकर..', देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर
  2. Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील साक्ष नोंदवावी - प्रकाश आंबेडकर
  3. Elgar Parishad Case : भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी महेश राऊतांच्या जामीनाला एनआयएचा विरोध
Last Updated : Jul 28, 2023, 3:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.