ETV Bharat / state

Bhima Koregaon Case: भीमा कोरेगाव प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील साक्ष नोंदवावी - प्रकाश आंबेडकर

author img

By

Published : Jul 24, 2023, 3:56 PM IST

भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील साक्ष घेण्यात यावी, अशी मागणी करत आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव चौकशी आयोगाच्या समोर 7 पाणी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यासह त्यांनी एकूण 15 महत्त्वाचे मुद्देही मांडले आहेत.

Bhima Koregaon Case
भीमा कोरेगाव प्रकरण

पुणे : प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमच्या माहिती नुसार देवेंद्र फडणवीस हे 40 किलोमीटर जवळ होते. दंगल सकाळी 8 ते साडे आठ वाजल्याच्या सुमारास घडली. तेव्हा पावणेबारा ते 11 वाजून 50 ला हेलिकॉप्टरने बोर्डिंग केले आहे. त्यांना जर या दंगलीबाबत माहिती असती तर ते पुण्याला आले असते, मुंबईला गेले नसते. त्यांना ती माहिती मिळाली की नाही हे त्यांच्याच तोंडून बाहेर आले पाहिजे. म्हणून आमची मागणी आहे की, देवेंद्र फडणवीस यांची साक्ष घेतली पाहिजे, असे यावेळी आंबेडकर म्हणाले.

आंबेडकरांनी प्रतिज्ञापत्रात काय म्हटले - प्रकाश आंबेडकर यांनी चौकशी आयोगाच्यासमोर दिलेल्या प्रतिज्ञा पत्रात म्हटले की, १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव येथील रणस्तंभाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा ज्या-ज्या गावांनी ठराव केला, त्या गावांच्या सरपंचांची चौकशी करण्यात यावी व त्यांची साक्ष नोंदविण्यात यावी. त्यामध्ये बहिष्काराचा ठराव किंवा विरोध करण्याचा ठराव हा कोणी मांडला, त्याला कोणी अनुमोदन दिले, याची तपासणी करण्यात यावी. तसेच त्या गावचे ग्रामसेवक, तलाठी यांची चौकशी करण्यात यावी. त्या गावांचे पोलीस पाटील आणि तलाठी हे सरकारी अधिकारी असल्याने त्यांनी त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या पोलीस ठाण्याला त्या दिवशी गोंधळ होण्याची लेखी/तोंडी खबर दिली होती काय? याची चौकशी करण्यात यावी. विशेष म्हणजे, ज्या ग्रामपंचातीमध्ये विरोधाचा ठराव झाला त्या गावच्या पोलीस पाटलांची व तलाठ्याची चौकशी करण्यात यावी. त्यांनी याबाबतची खबर पोलीस ठाण्याला दिली असल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना ही बाब कळविली होती काय? याची चौकशी करण्यात यावी.

या बाबींचीही व्हावी चौकशी : 1 जानेवारी २०१८ रोजी काहीतरी अनुचित प्रकार घडेल याची माहिती गुप्तचर विभागाकडे आली होती काय? आली असल्यास त्यावर त्यांनी काही कार्यवाही केली होती काय? याची चौकशी करण्यात यावी. तसेच पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण) यांच्याकडे ग्रामपंचायत, तलाठी यांनी संबंधित घटनेपूर्वी काही माहिती सादर केली असल्यास ती त्यांना कधी पोचली? याची चौकशी करण्यात यावी. घटनेपूर्वी पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण) यांना आदल्या दिवशी माहिती मिळाली असल्यास त्यांनी उपाय योजना का केल्या नाहीत? याची चौकशी करण्यात यावी. तसेच घटनेपूर्वी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांनी वढु (बु.) या गावाला कधी भेट दिली होती? तेव्हा त्यांनी बैठक घेतली होती का? बैठकीत काय ठरले? बैठकीचा तपशील पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण) यांना मिळाला होता काय? याचीही चौकशी करण्यात यावी.

तर त्यांच्या मोबाईलचा 'सीडीआर' तपासावा : सांगली येथे संभाजी भिडे यांचे वास्तव्य असल्याने सांगली एसटी स्टँडवरील ता. २९, ३०, ३१ डिसेंबर २०१७ रोजीचे सीसीटीव्ही फुटेज विशेषतः पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या एसटी फलाटावरील फुटेज मिळविण्यात यावे. तसेच त्या सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तींचे फोटो हे स्थानिक ग्रामस्थांना दाखवून ते गावातील आहेत की बाहेरचे आहेत याची खातरजमा करण्यात यावी. तसेच ते दंगलीत सामील होते किंवा नाही याची शहानिशा करून घ्यावी. आमच्या माहितीप्रमाणे दंगलखोर हे मोठ्या प्रमाणावर बाहेरून आले होते. ज्यांच्यावर दंगलीचा ठपका ठेवण्यात आला आहे त्या संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे व त्यांचे निकटवर्तीय यांच्या मोबाईलमधील घटनेच्याआधी ३ दिवसांचे CDR (call detail record) मिळविण्यात यावे. त्यामध्ये भीमा कोरेगावच्या आसपासच्या १२ गावांमध्ये राहणाऱ्या कोणाकोणा व्यक्तीला फोन आले होते किंवा केले होते, याची चौकशी करण्यात यावी.

संभाजी भिडेंना अटक का नाही - पुणे शहरात ३१ डिसेंबर, २०१७ रोजी शनिवारवाड्यावर 'एल्गार परिषद' झाली. परंतु पुणे शहरात कसलीही दंगल झाली नाही. तरीही पुणे शहर पोलिसांनी झालेली दंगल ही शहरी नक्षलवाद्यांनी केली, असे आरोपपत्र दाखल केले, ते का? याबाबतची सखोल विचारणा तत्कालीन पोलीस कमिशनर, पुणे यांना करण्यात यावी. तसेच पोलीस अधीक्षक पुणे (ग्रामीण) यांनी सर्वोच्च न्यायालयात जे प्रतिज्ञापत्र दाखल केले त्यामध्ये संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांनी दंगल भडकाविली, असे नमूद केले आहे. ते प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश पोलिसांना करावा. त्याचबरोबर ग्रामीण पोलीसांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे मिलिंद एकबोटे यांना अटक झाली; परंतु संभाजी भिडे यांना अद्यापपर्यंत अटक झालेली नाही, ही बाब गंभीर आहे. संभाजी भिडे यांना अटक करू नये, असा पत्रव्यवहार अथवा फोनरून संभाषण प्रशासनतील अधिकारी व राजकीय नेते यांचेमध्ये झाले होते काय? याची तपासणी करण्यात यावी. तसेच त्यामागील कारणांचाही शोध घेण्याचा प्रयत्न करावा.

मग ते शहरी नक्षलवादी कसे - ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यात 'एल्गार परिषद' झाली त्यादिवशी पुण्यात दंगल झाली का? १ जानेवारी २०१८ रोजी पुण्यात दंगल झाली का? पुण्यात दंगल झाली नसेल तर 'एल्गार परिषद'चे संयोजक हे शहरी नक्षलवादी कसे? याची विचारणा तत्कालीन पोलीस कमिशनर, पुणे शहर यांना करण्यात यावी. तसेच ३१ डिसेंबर, २०१७ रोजी शनिवारवाडा येथे झालेल्या 'एल्गार परिषद'चे अध्यक्ष न्यायमूर्ती पी. बी. सावंत होते. या परिषदेला शहरी नक्षलवादी असे संबोधण्यात आले. ते कशामुळे आणि का संबोधण्यात आले, याची विचारणा पुण्याचे तत्कालीन पोलीस कमिशनर यांच्याकडे करण्यात यावी, असे एकूण 15 महत्त्वाचे मुद्दे प्रकाश आंबेडकर यांनी मांडले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.