महाराष्ट्र

maharashtra

पंकजा मुंडेंनी जुन्या आठवणी सांगितल्यानं उदयनराजे भोसले झाले भावूक

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 8:10 PM IST

Udayanraje Bhosale : छत्रपतींचं घर हे माहेर आणि उदयनराजे पाठिराखे असल्यामुळं मला कशाचीच चिंता नाही, असं वक्तव्य माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी साताऱ्यात केलं आहे. तसंच पंकजाताई तुम्ही कसलीही काळजी करू नका. तुमच्यापर्यंत पोहचण्याच्या अगोदर त्यांना मला सामोरं जावं लागेल, असा इशारा उदयनराजेंनी पंकजा मुंडेंच्या पक्षांतर्गत विरोधकांना दिला आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde

पंकजा मुंडे, उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया

सातारा Udayanraje Bhosale :भाजाप खासदार उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी आयोजित केलेल्या नक्षत्र महोत्सवाचं उद्घाटन भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी काही जुन्या आठवणी सांगितल्यानं उदयनराजे भोसले यांना अश्रू अनावर झाले. उदयनराजेंनी मला बहीण मानलंय. छत्रपतींचं घर, माहेर आणि उदयनराजे पाठिराखे असल्यामुळं मला कशाचीच चिंता नाही, असं वक्तव्य माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी साताऱ्यातील नक्षत्र महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केलंय. दरम्यान, पंकजाताई तुम्ही कसलीही काळजी करू नका, मी आहे. तुमच्यापर्यंत पोहचण्याच्या अगोदर त्यांना मला सामोरं जावं लागेल, असा इशारा उदयनराजेंनी पंकजा मुंडेंच्या पक्षांतर्गत विरोधकांना दिला आहे.

मुंडे साहेबांच्या आठवणी उर्जा देतात :यावेळी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सांगितल्या. तसंच त्यांचं कौतुक देखील केलं. खरंतर बाबांच्या आठवणीच मला ऊर्जा देतात. मुंडे साहेबांनी राजेंवर प्रेम केलं. मुंडे साहेब जाऊन दहा वर्षे झाली, तरी उदयनराजे त्यांच्यावर प्रेम करतात. मला पण माहेरी जावं, कोणावर तरी जबाबदारी टाकावी, असं वाटतं. छत्रपती उदयनराजे यांच्यावर मी अवलंबून आहे, असं वाटतं. त्यामुळंच सातारला आल्यानंतर मला माहेरी आल्यासारखं वाटतंय, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

छत्रपती उदयनराजे माझे पाठिराखे :लग्न झाल्यानंतर मुंबईवरून 'मी' पुण्याला शिफ्ट झाले. त्यावेळी छत्रपती उदयनराजेंनी पुण्यात जेवण ठेवलं होतं. त्यावेळी त्यांनी मुंडे साहेबांना त्यांनी सांगितलं की मुलीची काळजी करायची नाही. मी तिचा पाठीराखा आहे, असा शब्द उदयनराजेंनी दिल्याची आठवण पंकजा मुंडेंनी सांगितली. तसंच शिवशक्ती परिक्रमेला केवळ उदयनराजेंमुळंच उंची मिळाली. जातीपातीच्या जीवावर राजकारण करणाऱ्यांनी, जातीपातीच्या भिंती बांधून स्वतःची सोय करणाऱ्यांनी एका छत्रपतीचं राजासारखं मन बघावं, असं आवाहन त्यांनी केलं.

उदयनराजे पाठीशी असल्यानं चिंता नाही :उदयनराजेंनी मला बहीण मानलंय. कारण आमचे संबंध हे राजकारणाच्या पलिकडचे आहेत. राजकारणात काम करताना उदयनराजेंनी सच्चा माणूस, अशी आपली एक इमेज बनवली आहे. उदयनराजेंनी काही केलं, तर ती स्टाईल होते. एकदम सच्चा, मनाचा मोकळा माणूस म्हणून ते दबंग ठरतात. उदयनराजेंसारखा भाऊ पाठीशी असल्यावर मला कशाचीही चिंता नाही, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

माहेरात येऊन लाड करून घेतले :श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे माझ्या नणंद असल्याचं सांगून पंकजा म्हणाल्या की, दमयंतीराजे तसंच उदयनराजेंच्यामध्ये बसून मी माझे लाड करून घेतले. छत्रपतींचं घर हे माहेर असल्यामुळं कशाचीच चिंता नाही. हे ऋणानुबंध असेच कायम राहावेत, पिढ्यान पिढ्या आपण एकमेकांशी प्रेमाचे भाव ठेवावेत, अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.

पंकजाताईंना मंत्रिपद मिळणारच :खासदार उदयनराजे म्हणाले, पंकजाताई केवळ साताराच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र तुमचं माहेर आहे. तुम्ही कसलीही काळजी करू नका. तुमच्यापर्यंत पोहचण्याच्या अगोदर त्यांना मला सामोरे जावं लागेल. पंकजाताईंना मंत्रिपद मिळावं, अशी महाराष्ट्रातील लोकांची इच्छा आहे. त्यांना ते मिळणारच, असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला.

हे वाचलंत का :

  1. मराठा आरक्षणाबाबतच्या अधिसूचनेविरोधात न्यायालयात जाणार; गुणरत्न सदावर्तेंची भूमिका
  2. मराठ्यांचा ऐतिहासिक विजय! आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत सर्वांना ओबीसींच्या सुविधा मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
  3. मराठा आंदोलनाला मोठं यश, मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबीयांनी मानले सरकारचे आभार

ABOUT THE AUTHOR

...view details