महाराष्ट्र

maharashtra

राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आवर्जुन मतदान करण्याचं सुबोध भावेचं कळकळीचं आवाहन - Lok Sabha election 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 10:26 AM IST

Updated : May 13, 2024, 11:05 AM IST

अभिनेता सुबोध भावेनं पुण्यातील मतदान केंद्रावर कुटुंबासह आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान करणं हे नागरिक म्हणून आपलं आद्य राष्ट्रीय कर्तव्य असल्याचं सांगत त्यानं मतदान करण्याचं कळकळीचं आवाहन केलं.

Subodh Bhave voting
सुबोध भावे मतदान (Subodh Bhave voting Etv Bharat)

सुबोध भावे मतदान (Subodh Bhave voting Etv Bharat video)

पुणे - लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील आज मतदान होत आहे. राज्यात पुण्यासह अनेक लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत असून सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर नागरिक हे मतदानासाठी बाहेर पडत आहे. नवीन मतदारांमध्ये मोठा उत्साह असून उन्हं वाढण्याच्या आत मतदान करण्याकडे ज्येष्ठ नागरिकांचा कल असतो. आज पुण्यातील मतदार केंद्रावर मराठी चित्रपटसृष्टील प्रतिभावान अभिनेता सुबोध भावेनं आपला मतदानाचा हक्क बजावला. सुबोध मूळचा पुण्याचा रहिवासी असून याच ठिकाणी त्याचं मतदान तो नेहमी करत आलाय. शूटिंगच्या कामानिमित्त तो जरी मुंबईत राहात असला तरी प्रत्येक निवडणुकीला तो प्रवास करुन मतदानाला आवर्जुन उपस्थित राहतो.

मतदानानंतर त्यानं सर्व मतदारांना घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन केलं. याबद्दल बोलताना सुबोध म्हणाला, "लोकशाहीनं मला मतदानाचा हक्क दिलाय. माझ्या एका मताची किंमत किती आहे याची मला जाणीव आहे. म्हणूनच मी मुंबईहून प्रवास करुन पुण्यात येतो, मतदान करतो आणि पुन्हा मुंबईला जातो. कोणतीही कारणं न सांगता मी आणि माझी पत्नी दरवेळा हा हक्क बजावत आलो आहे."

देशाचं भवितव्य घडवण्यासाठी मतदान करा असं आवाहन करताना सुबोध पुढं म्हणाला, "माझं सगळ्यांनाच सांगणं आहे की, हा एक लोकशाहीचा उत्सव आहे. आपण दिलेल्या मतदानावरतीच एखादा आमदार खासदार निवडणून येत असतो. आपण मत न दिल्यानं काय फरक पडणार आहे, असा निराशावादी विचार कोणी केला तर त्यानं कोणताच बदल घडणार नाही. जो कोणी तुम्हाला योग्य वाटतो त्याला मत द्या, पण मत द्या. ते मत वाया जाऊ देऊ नका, कारण तुमच्या नावावर कोणीतरी बोगस मतदानही करु शकतं. तुमचं जर यादीत नावं आलं नाही, तर संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारा. आपलं ओळखपत्र बरोबर आहे की नाही, मतदान यादीत नाव आहे की नाही, हे चेक करा कारण हे आपलं प्रथम राष्ट्रीय कर्तव्य आहे. ते आपण पार पाडलंच पाहिजे. कुठलंही आस्थापन, कुठलीही कंपनी अथवा संघटना, कुठलीही शक्ती तुम्हाला मतदान करण्यापासून रोखू शकत नाही. फक्त तुमची इच्छा पाहिजे, त्यामुळे जरुर मतदान करा. हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे, देशाचं भवितव्य घडवण्यासाठी, देश सुजलाम सुफलाम करण्यासाठी मतदान करणं हे आवश्यक आहे."

Last Updated : May 13, 2024, 11:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details