महाराष्ट्र

maharashtra

Thane Crime : सावकाराच्या जाचामुळे महिलेची रेल्वेखाली आत्महत्या; तर प्रेमीयुगुलानं गळफास घेऊन संपवलं जीवन

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 9:36 AM IST

Thane Crime : रेल्वे रुळावर महिलेचा मृतदेह आढळून आल्यानं ठाण्यात खळबळ उडाली होती. या महिलेनं उल्हासनगर पोलीस ठाण्यात एका सावकाराविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तर दुसऱ्या घटनेत अहमदनगर इथल्या तरुण आणि तरुणीनं तानाजी नगरातील घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे.

Thane Crime
प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे Thane Crime : कल्याण - कसारा रेल्वे मार्गावरील शहाड ते आंबिवली दरम्यान रेल्वे रुळावर एक 46 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांना ही आत्महत्या असल्याचं आढळून आलं असून, या महिलेनं चार दिवसांपूर्वी उल्हासनगर पोलीस ठाण्यात एका सावकरांकडून होणाऱ्या छळाची तक्रार केली होती. तर दुसऱ्या घटनेत कसारा इथं एका प्रेमीयुगुलानंही घरातील पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. या दोन्ही घटनांप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून कल्याण लोहमार्ग पोलीस आणि कसारा पोलीस पथकानं तपास सुरू केला आहे.

महिलेच्या मृतदेहाजवळ आढळली तक्रारीची प्रत :कल्याण रेल्वे पोलिसांना गुरुवारी रात्री 8.30 च्या सुमारास आंबवली आणि शहाड स्थानकादरम्यान मालगाडीनं एका महिलेला धडक दिल्याचा फोन आला होता. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. खळबळजनक बाब म्हणजे महिलेच्या मृतदेहाजवळून पोलिसांना सावकाराविरुद्ध केलेल्या तक्रारीची प्रत सापडली. ही महिला शहाड येथील रहिवासी असून तिला दोन मुलं आहेत. या महिलेचा पती कपड्याच्या दुकानात कामगार आहेत.

सावकाराकडून दोन वर्षांपूर्वी घेतले होते कर्ज :मालगाडीच्या धडकेत या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती या घटनेचा तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली. मृत महिलेनं चार दिवसांपूर्वी उल्हासनगर पोलीस ठाण्यात एका सावकाराविरोधात तक्रार दाखल केली होती. या सावकाराकडून दोन वर्षांपूर्वी या महिलेनं लाखो रुपये कर्ज घेतलं होतं. ते कर्ज फेडण्यासाठी सावकार छळ करत असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. महिलेचा मृत्यू झाल्यावर त्या तक्रारीची प्रत रेल्वे पोलिसांना मिळाली आहे. मात्र मृताच्या कुटुंबीयांनी कोणाच्याही विरोधात तक्रार न केल्यामुळे आम्ही अपघाती मृत्यूची नोंद कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात केल्याचं पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितलं.

तरुण तरुणीनं गळफास घेऊन केली आत्महत्या :दुसऱ्या घटनेत कसारा येथील वीर तानाजीनगरमधील एका बंद खोलीत तरुण तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमनाथ सोनवणे (23) व सुजाता देशमुख (21) असं आत्महत्या करणाऱ्या तरुण आणि तरुणीचं नाव असून दोघंही अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रहिवाशी होते. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

अहमदनगरमधील तरुण तरुणीची ठाण्यात आत्महत्या :पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृतक सोमनाथ व सुजाता यांच्यात प्रेम संबंध असल्यानं दोघंही मूळ गावातील घर सोडून गेल्या दीड महिन्यांपासून भाड्यानं कसारा इथं तानाजीनगरमध्ये राहत होते. दोन दिवसांपूर्वी सोमनाथ व सुजाता यांनी बंद खोलीत घरातील पंख्याला ओढणीनं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. मृतदेहांजवळ कुठलाही पुरावा मिळून न आल्यानं आत्महत्येचं कारण स्पष्ट झालं नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

  1. Minor Girl Murder Thane: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
  2. Suspicious of wifes character: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीकडून मुलीची डीएनए चाचणी, गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details