Minor Girl Murder Thane: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Published: Aug 17, 2023, 5:18 PM


Minor Girl Murder Thane: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Published: Aug 17, 2023, 5:18 PM

एकतर्फी प्रेमातून एका 20 वर्षीय तरुणाने सातव्या वर्गात शिकणाऱ्या 12 वर्षीय मुलीची हत्या केल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील तिसगाव भागात बुधवारी रात्री आठ वाजल्याच्या सुमारास घडली. यानंतर आरोपी तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आदित्य प्रकाश कांबळे (वय २०) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
ठाणे : कल्याण पूर्वेतील तिसगाव भागात बुधवारी रात्री आठ वाजल्याच्या सुमारास एका २० वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून १२ वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या केली; मात्र या घटनेनंतर आपण पोलिसांच्या जाळ्यात अडकले जाऊ या भीतीने हल्लेखोर तरुणानेसुद्धा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या तरुणावर बुधवारी रात्री कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर आज आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर दुसराही गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
मुलगी सातवीतील विद्यार्थिनी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर आदित्य हा कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील चेतना विद्यालय परिसरात कुटुंबासह राहतो. तर मृतक मुलगी तिसगाव भागात एका सोसायटीत कुटुंबासह राहून ती कल्याण पूर्वेतील एका शाळेत ७ व्या वर्गात शिक्षण घेत होती. हल्लेखोर आदित्यचे त्या मृतक अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम होते; मात्र मृतक मुलगी आपल्याशी बोलत नाही. आपणावर प्रेम करत नाही, याचा राग तरुणाला होता. या अल्पवयीन तरुणीला धडा शिकवण्यासाठी त्याने कट रचला होता.
मुलीला संपविण्यासाठी आरोपीची तयारी : आरोपी हा मृतक मुलीची माहिती काढून ती किती वाजता शाळेत आणि शिकवणीत जाते याची माहिती घेत होता; मात्र याचा अंदाज कोणाला आला नाही. हल्लेखोर आदित्यने बुधवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान मृतक मुलगी खासगी शिकवणी वर्गावरून घरी कधी येते याची माहिती सोसायटीतील रहिवाशांकडून घेतली. त्यानंतर आरोपी सोसायटीच्या परिसरात चाकू, मिरची पूड आणि फिनाईलसोबत घेऊन दबा धरून बसला होता. त्याच सुमारास संबंधित मुलगी आपल्या आईसोबत शिकवणी वर्गावरून रात्री आठ वाजता घरी येत होती. त्यावेळी सोसायटीच्या जिन्यावरून घरात जात असताना आरोपी आदित्यने पाठीमागून धावत जाऊन मुलीच्या आईला जोराने बाजुला ढकलले आणि त्यानंतर मुलीवर हल्ला चढवून तिला गंभीर जखमी केले. आईने हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने दाद दिली नाही. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
आदित्यवर उपचार सुरू : हल्लखोर आदित्याला सोसायटीतील रहिवाशांनी पकडून ठेवले. त्याचवेळी आदित्यने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घटनास्थळी कोळसेवाडी पोलिसांचे पथक आल्यानंतर त्यांनी हल्लेखोर आदित्यचा ताबा घेतला. त्याची प्रकृती खालावल्याने हल्लेखोर आदित्यला पोलीस बंदोबस्तात ठाण्यातील कळवा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आदित्यवर हत्येचा गुन्हा दाखल : पोलिसांनी घटनेनंतर मृत मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आदित्यवर हत्येचा गुन्हा दाखल केला. तर पोलीस नाईक जाधव यांच्या तक्रारीवरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर दुसरा गुन्हा दाखल केला. दरम्यान त्या मुलीबरोबर आपले एकतर्फी प्रेम होते. ती आपल्याशी बोलत नव्हती. या रागातून आपण तिच्यावर हल्ला केल्याची कबुली आरोपी आदित्य कांबळेने पोलिसांना दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी दिली आहे.
हेही वाचा:
