महाराष्ट्र

maharashtra

पंतप्रधान मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर; 'या' कार्यक्रमांना राहणार उपस्थित

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 7:56 AM IST

Updated : Dec 4, 2023, 12:03 PM IST

PM Narendra Modi on Sindhudurg Tour : 'भारतीय नौदल दिना'निमित्तानं होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरणही करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

सिंधुदुर्ग PM Narendra Modi on Sindhudurg Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. 'भारतीय नौदल दिना'निमित्तानं जिल्ह्यातील तारकर्ली इथं होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. यासोबतच पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरणही करण्यात येणार आहे.

कसा असेल दौरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 3.40 वाजण्याच्या सुमारास चिपी विमानतळावर दाखल होणार आहेत. तिथून ते राजकोट किल्ल्याकडे रवाना होतील. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं ते अनावरण करतील. यानंतर पंतप्रधान मोदी सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहेत. तिथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकमेव मंदिरात जाऊन ते दर्शन घेणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर नरेंद्र मोदी तारकर्ली इथं नौदल दिनानिमित्त होणाऱ्या प्रात्यक्षिकांना उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत. यानंतर नौदलाकडून 'नौदल दिना'च्या निमित्तानं प्रात्यक्षिकं सादर करण्यात येणार आहेत.

काय आहे भारतीय नौदलाचा इतिहास : भारतीय सेनेच्या एअरस्पेसवर 3 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्ताननं हल्ला केला होता. पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर 1971 सालच्या युद्धाला सुरुवात झाली. पाकिस्तानच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय नौदलानं ऑपरेशन त्रिशूल (ट्रायडन्ट) सुरt केलं होतं. ऑपरेशनच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या नौदल मुख्यालय असलेल्या कराची तळाला लक्ष्य करण्यात आलं. भारतीय नौदलानं 4 डिसेंबरच्या रात्री कराची बंदरावर केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या अनेक सैन्यदलाच्या विमानांचं नुकसान झालं. त्यामुळं पाकिस्तानची भारतावर बॉम्ब वर्षाव करण्याची क्षमता कमी झाली होती. त्यात भारताच्या नौदलाच्यावतीनं पहिल्यांदाच अ‍ॅन्टी शीप मिसाईलचा वापर करण्यात आला होता. भारतीय नौदलाच्या या प्रखर हल्ल्यात पाकिस्तानच्या नौदलाचं आणि कराची बंदराचं अतोनात नुकसान झालं. यामध्ये पाकिस्तान सैन्यदलाचं कंबरडे मोडलं.

पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळं स्थानिकांच्या रहदारीवर निर्बंध : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्तानं मालवण तारकर्लीतल्या बाजारपेठा बंद राहणार आहेत. त्याशिवाय, पंतप्रधानांचा ताफा ज्या मार्गावरुन जाणार आहे, त्या मार्गावरील वाहतुकीला प्रतिबंध असणार आहे. तसंच स्थानिकांच्या रहदारीवरही निर्बंध राहणार आहेत. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत पंतप्रधान मोदी हे सिंधुदुर्गात असतील. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, सुभोभिकरण यांसारख्या गोष्टींवर विशेष लक्ष देण्यात आलंय.

हेही वाचा :

  1. भाजपाच्या विजयाचं श्रेय महिलाशक्तीला, पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्पष्टोक्ती, युवक शेतकऱ्यांसह गरिबांचेही मानले आभार
  2. World Food India 2023 : वर्ल्ड फूड इंडिया 2023 चं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन; काय आहे याचं उद्दिष्ट?
Last Updated : Dec 4, 2023, 12:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details