महाराष्ट्र

maharashtra

Cyclone Tauktae : सिंधुदुर्गात दोन बोटी बुडाल्या.. एका खलाशाचा मृत्यू तर तीन खलाशी बेपत्ता

By

Published : May 17, 2021, 3:48 PM IST

तौक्ते चक्रीवादळाचा कोकणाला मोठा फटका बसलेला असून मच्छिमार तसंच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. चक्रीवादळामुळे दर्याला उधाण आलं असून अनेक ठिकाणी किनाऱ्यावर उभ्या नौकांना फटका बसला आहे. देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. तर एका खलाशाचा मृत्यू झाला आहे.

cyclone-tauktae-two-boats
cyclone-tauktae-two-boats

सिंधुदुर्ग - तौक्ते चक्रीवादळाचा सिंधुदुर्गच्या किनाऱ्याला मोठा फटका बसला आहे. देवगडच्या आनंदवाडी बंदरात नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. या अपघातात एका खलाशाचा मृत्यू तर तीन खलाशी बेपत्ता झाले आहे. तीन खलाशांचे या घटनेत प्राण वाचले आहेत. किनारी भागात झाडे कोसळल्याने खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान देवगड येथील घटनेतील बेपत्ता खलाशांसाठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

एका खलाशांचा मृत्यू, तिघे बेपत्ता, तिघे बचावले -

तौक्ते चक्रीवादळाच्या फटक्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये राजाराम कृष्णा कदम (रा. गढीताम्हणे, ता. देवगड) या खलाशाचा मृत्यू झाला आहे. तर दिनानाथ जोशी (रा. पावस, रत्नागिरी), नंदकुमार नार्वेकर (रा. कोल्हापूर), प्रकाश गिरीद ( रा. राजापूर, रत्नागिरी) हे बेपत्ता आहेत. तर जानू यशवंत डोर्लेकर ( रा.रत्नागिरी), विलास सुरेश राघव (रा. पुरळ - कळंबई, ता. देवगड), सूर्यकांत सायाजी सावंत, (रा. हुंबरठ, ता. कणकवली) हे सुखरूप बाहेर आले आहेत.

सिंधुदुर्गात दोन बोटी बुडाल्या..
नांगरून ठेवलेल्या बोटीला झाला अपघात -
याविषयी देवगड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी 3.30 वा. सुमारास आनंदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या रघुनाथ यशवंत कोयंडे यांच्या रुक्मिणी या बोटीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे ती पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे वाहून जाऊ लागली. त्यामुळे रुक्मिणी बोटीवरील खलाशांना वाचवण्यासाठी, निरज यशवंत कोयंडे यांची, आर्ची नावाची दुसरी बोट रुक्मिणी बोटी जवळ नेण्यात येत होती. पण, वादळी वाऱ्यामुळे आर्ची बोटीवरील खलाशांचे नियंत्रण सुटून दोन्ही मच्छिमार बोटी लगतच्या मौजे पालये किनाऱ्यावरील खडकावर आदळल्या.
बेपत्ता खलाशांचा शोध सुरू -
त्यानंतर दोन्ही बोटीवरील खलाशांनी पाण्यात उड्या मारल्या. या दोन्ही बोटींवर मिळून एकूण 7 खलाशी होते. यापैकी तीन खलाशी सुखरूप बाहेर आले. तर चार खलाशी वाहून गेले. यापैकी एका खलाशाचा मृतदेह आज सकाळी देवगड मळई येथील खाडीमध्ये आढळून आला आहे. स्थानिक प्रशासकीय यंत्रणा व स्थानिक लोकांच्या सहकार्याने इतर तीन बेपत्ता खलाशांचा शोध सुरू आहे. तसेच या दुर्घटनेनंतर उपविभागीय अधिकारी (महसूल) यांनी बचावलेल्या खलाशांची भेट घेतली. सदरचे खलाशी हे मौजे पालये येथील सागर करंगुटकर यांच्या घरी सुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले.
तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी -
तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे जिल्ह्यात गेल्या २४ तासात अतिवृष्टी झाली आहे. सर्वात जास्त पाऊस सावंतवाडी तालुक्यात 365 मि.मी. झाला असून सर्वात कमी पाऊस वैभववाडी तालुक्यात 149 मि.मी. इतका झाला आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 748 मि.मी. पावसाची नोंद झाली असून सरासरी 218 पूर्णांक 5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची पावसाची स्थिती पाहता दोडामार्ग - 250 मि.मी, सावंतवाडी - 265 मि.मी, वेंगुर्ला - 180 मि.मी, कुडाळ - 203 मि.मी, मालवण - 21 मि.मी पाऊस झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details