महाराष्ट्र

maharashtra

अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपा आमदाराची दादागिरी, सुनील कांबळेंची पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 5, 2024, 10:10 PM IST

Updated : Jan 5, 2024, 10:15 PM IST

भाजपा आमदार सुनील कांबळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. त्यावरून सुषमा अंधारे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलंय.

BJP MLA Sunil Kamble
BJP MLA Sunil Kamble

पुणे : पुण्यातील भाजपाचे आमदार सुनील कांबळे यांनी पोलीस कर्मचारी, तसंच राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) पदाधिकारी राजीव सातव यांच्या कानशिलात लगावली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडला आहे. यानंतर सुनील कांबळे यांनी मारहाण केली नसल्याचं सांगत सारवासारव केलीय. आता शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुनील कांबळे यांच्यासह भाजपावर टीका केली आहे.

भाजपा आमदाराची मारहाण : पुण्यातील ससून रुग्णालयात विविध वॉर्डांचं उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार रवींद्र धंगेकर, भाजपा सुनील कांबळे यांची उपस्थित होती. या कार्यक्रमात पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे भाजपा आमदार सुनील कांबळे यांचं निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यानं त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी राजीव सातव यांना मारहाण केली.

सुनील कांबळेंची गुंडगिरीसाठी ओळख : यावर सुषमा अंधारे यांनी म्हटलंय की, “सुनील कांबळेंना वादग्रस्त विधानं तसंच गुंडगिरी करण्यासाठी ओळखलं जातं. दोन वर्षांपूर्वी सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेतील एका महिला अभियंत्याला अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. तर, आनंदनगरमधील रहिवाशांना सुनील कांबळे यांनी बिल्डरच्या फायद्यासाठी जबरदस्ती केली. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कांबळे यांनी गुंडगिरी केली आहे. कांबळे यांना पहिल्या प्रकरणात समज दिली, असती किंवा निलंबनाची कारवाई केली असती, तर त्यांच्यात पुन्हा असं करण्याची हिंमत आली नसती.

"आमदारानं शिवीगाळ करावी" :“भाजपा अशा आमदारांना कधीही निलंबित करत नाही. याउलट भाजपा आमदारांनी मारहाण करावी, हातपाय कापावेत, पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या द्याव्यात, महिला अधिकाऱ्यांबद्दल अपशब्द वापरावेत. मात्र, गृहखातं याबाबत कोणतीही कारवाई करणार नाही,' अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी सुनील कांबळे प्रकरणावरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीसास्त्र सोडलंय.

"मी त्या व्यक्तीला बाजूला ढकलले" :पोलीस कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीबाबत सुनील कांबळे यांनी खुलासा केला आहे. “मी कार्यक्रम संपल्यानंतर स्टेजवरून खाली येत होतो. त्यावेळी पायऱ्या उतरत असताना अचानक एक व्यक्ती माझ्या समोर आली. म्हणून मी त्या व्यक्तीला बाजूला ढकलून खाली उतरलो. मी त्याला मारहाण केलेली नाही,” असं सुनील कांबळे म्हणाले.

हेही वाचा-

  1. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात गँगवॉरनं पुन्हा काढलं डोकं वर; 'हे' आहेत कारणं
  2. 'गुंड कोणताही असो, त्याचा बंदोबस्त लावण्याचं काम'; शरद मोहोळ प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
  3. दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील मालमत्तांचा लिलाव पूर्ण, वाचा किती कोटींची लागली बोली
Last Updated : Jan 5, 2024, 10:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details