महाराष्ट्र

maharashtra

Maharshtra Political Crisis : राष्ट्रवादीतील भूकंपाचा आज दुसरा अध्याय, पटेल-तटकरेंची हकालपट्टी, तर अजित पवारांनी नेमले नवीन प्रदेशाध्यक्ष

By

Published : Jul 3, 2023, 11:19 AM IST

Updated : Jul 3, 2023, 10:25 PM IST

अजित पवार हे ९ नेत्यांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. अजित पवारांनी पक्षाध्यक्ष, प्रतोद नेमले. शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे यांची हकालपट्टी केली. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांच्या निर्णयाला आव्हान दिले. नार्वेकरांच्याकडे तक्रारी गेल्या. वाचा आज काय काय घडले.

NCP political crisis
NCP Political Crisis Update

मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यंमत्रीपदाची शपथ घेऊन काल मोठा राजकीय बाँब फोडला. त्यानंतर राज्यातील राजकारणाला पुन्हा एकदा मोठी गती आल्याचे दिसून येत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराडमध्ये त्यांचे राजकीय गुरू यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी प्रीतीसंगमावर भेट दिली. आज गुरु पौर्णिमा असल्याने गुरुंना अभिवादन करण्यासाठी शरद पवार कराडला आले होते.

पारावर उभे राहून भाषण -कराडमध्ये शरद पवार यांनी व्यासपीठ उभे असतानाही त्यावरुन भाषण न करता पारावर उभे राहून भाषण दिले. यावेळी त्यांनी तरुण नेतांनी नाउमेद होऊन चालणार नाही असे स्पष्ट केले. राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा आपणच असल्याचे पवार यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते. आज त्याचाच प्रत्यय कराडमध्ये आला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रसचे तरुण नेते उपस्थित होते. त्यामुळे तरुण पिढी आजही शरद पवार यांच्याच मागे असल्याचे स्पष्ट झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे -कराडमधील पारावरच्या भाषणानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलत असल्याचे पवार म्हणाले. राष्ट्रवादी भ्रष्ट पक्ष असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर लगेच राष्ट्रवादीत फूट पडली आहे. जर पंतप्रधान यांचे आरोप खरे आहेत तर राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यांनी मंत्रिमंडळात का सहभागी करून घेतले, असा सवाल पवार यांनी केला. तसेच याचा अर्थ मोदी यांनी केलेले आरोप हे खरे नसल्याचे यामुळे सिद्ध झाल्याचे शरद पवार यांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत सांगितले. अजित पवार म्हणजे पक्ष नाही. तसेच पक्षाचा अध्यक्ष खंबीर आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी साताऱ्यात दिली.

९ जणांना कारणे दाखवा नोटीस -शरद पवार यांनी यानंतर एक ट्विट करुन प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याच्या कारणावरुन त्यांना पक्षातून काढून टाकल्याचे जाहीर केले. तसेच अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ९ जणांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. काही गैरसमजुतीमुळे पक्षापासून बाजूला गेलेल्यांच्यासाठी पक्षामध्ये परत येण्याकरता सर्वांना दरवाजे खुले आहेत, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांना काही दिवसांची मुदत दिली आहे. योग्यवेळी ते परत आले नाहीत तर त्यांचे दरवाजे पक्षासाठी कायमचे बंद असतील असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती-दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची नियुक्ती झाल्याची घोषणा पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. दुपारी अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनीपत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये यासह इतर घोषणा करण्यात आल्या. यावेळी अनिल पाटील यांची महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतोदपदी नियुक्ती केल्याची घोषणा त्यानी केली. तसेच पक्षाने अजित पवार यांची विधीमंडळ नेतेपदी नियुक्ती केली आहे. तर रुपाली चाकणकर यांची राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षापदी निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. युवा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी सुरज चव्हाण, प्रवक्ते पदी अमोल मिटकरी, आनंद परांजपे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

त्यांनी केलेल्या नेमणुका कायदेशीर नाहीत -यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांनी जे काही केले आहे, ते सगळे बेकायदेशीर असल्याचे सांगितले. विधिमंडळ पक्षाचा अध्यक्ष नेमणे, पक्षप्रतोद नियुक्त करणे, प्रवक्ता नियुक्त करणे या गोष्टी पक्षाने करायच्या असतात. त्यामुळे त्यांनी केलेल्या नेमणुका कायदेशीर नाहीत असे आव्हा़ड म्हणाले. तसेच सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा दाखला देत कोर्टानेच अशा प्रकारच्या नियुक्त्या बेकायदेशीर ठरवल्याचे स्पष्टपणे सांगितले. तसेच अजित पवार यांनी आपल्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवारच असल्याचे सांगितले होते. त्यावर आव्हाड म्हणाले की, जर शरद पवार यांना अध्यक्ष मानता तर त्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यावर केलेली कारवाई मान्य आहे का.

अमोल कोल्हे शरद पवार यांच्यासोबत -या सगळ्या राजकीय गदारोळामध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे ट्विट करुन अजित पवार यांना धक्का दिला. काल ते अजित पवार यांच्यासोबत होते. आज ते शरद पवार यांच्यासोबत आहेत. आता पुढे काय राजकीय घडमोडी घडतात याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

हेही वाचा-

  1. Maharashtra Political Crisis : शरद पवार आज प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे घेणार दर्शन, जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता
  2. NCP political crisis: अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ८ नेत्यांची आमदारकी रद्द करा, राष्ट्रवादीची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी
  3. NCP Political Crisis: अजित पवारांच्या बंडाच्या निशाण्यानंतर रोहित पवार भावूक म्हणाले... राजकारणात येऊन चूक केली का?
Last Updated :Jul 3, 2023, 10:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details