महाराष्ट्र

maharashtra

BMC Election : 'मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना ५० चा आकडाही पार करू शकणार नाही'

By

Published : May 21, 2023, 7:01 PM IST

Etv Bharat

मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर सध्या राजकीय वातावरण तापले आहे. यावेळी आमचा महापौर होईल असा दावा सर्वच पक्ष करत आहेत. यावरूनच भाजप नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला आहे. मुंबई पालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 50 नगरसेवकही निवडूण आणता येणार नाही, असे शेलार यावेळी म्हणाले. मुंबई भाजपच्या कार्यकारिणीची बैठक मुंबईत पार पडली. यावेळी शेलार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर लगेच भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत रविवारी मुंबईत भाजप कार्यालयात पार पडली. मागील २५ वर्षात मुंबईकरांनी उद्धवजींच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या शिवसेनेला प्रत्येक निवडणुकीत पूर्णपणे नाकारले असून कायम घरचा रस्ता दाखवला आहे. तसेच भाजपच्या समर्थनामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या कमी असतानाही तुम्ही खुर्च्या उबवत होता. याचे कारण म्हणजे फक्त हिंदुत्वासाठी आम्ही तुम्हाला समर्थन देत होतो. परंतु सध्या परिस्थिती बदलली असून आज तुम्हा सर्वांसमोर भाकीत करतो की, उद्धवजींच्या शिवसेनेचे येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ५० नगरसेवकही निवडून येणार नाहीत, अशी घणाघाती टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

"सध्या परिस्थिती बदलली आहे. उद्धवजींच्या शिवसेनेचे येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ५० नगरसेवकही निवडून येणार नाहीत" - भाजप नेते आशिष शेलार

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वमान्यता - याप्रसंगी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, मुंबई शहरात आमच्यावर टीका करणारे काहीजण म्हणायचे कधीतरी लोकाचे ऐका, मन की बात लोगो की सूनो. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात मुंबईभर दहा हजार ठिकाणी ऐकली गेली आहे. त्याचप्रमाणे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा मुंबई, पुणे दौरा यशस्वीरित्या झाला. भाजपच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या परिषदेला १० हजार संस्थेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. तसेच मुंबईतील गरजू महिलांना तसेच २७ हजार गरीब कुटुंबांना मदत करण्यात आली. सलग १५ दिवसामध्ये ९ मोठे कार्यक्रम अन्य कुठल्या पक्षाला जमू शकत नाहीत तेवढे आपण घेतले. देशात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाला सर्वमान्यता आहे. परंतु हेच विरोधकांचे दुखणे आहे. त्यांना त्रास होतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनीही मोदींची प्रशंसा केली आहे. ते म्हणातात, मोदीजी तुम्ही चांगली लोकशाही राबवत आहात. आपण पुढच्या महिन्यात लवकरच भोजनासाठी वॉशिंग्टनमध्ये भेटत आहोत. अमेरिकेतील उच्च वर्तुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी फार प्रसिद्ध आहेत. हे दुर्लभ नेतृत्व आपल्याला मिळाले आहे. आम्ही टीका करणाऱ्यांचे स्वागत करतो. कारण प्रत्येक टीकेतून आम्हीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतो.

कर्नाटकातील ४५ जागा थोड्या फरकाने गेल्या - कर्नाटकातील निकालानंतर ज्यांची बोलती इतके दिवस बंद होती ते लगेच बोलू लागले आहेत. हे खर आहे की, आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्याचे आत्मचिंतन आणि परीक्षण करणे आमचं कर्तव्य आहे. निकालाच्या विश्लेषणाचे काम राष्ट्रीय स्तरावर होईलचं. परंतु याबाबत पोपटपंची करणारे पोपट आता बोलायला लागले म्हणून मी, मुद्दाम आकडेवारीची माहिती घेतली. कर्नाटक मध्ये १ हजाराच्या खाली आमच्या जागा गेल्या अशा ५ जागा आहेत. ३ जागा अशा आहेत ज्या फक्त दोन हजार मतांनी गेल्या, २२ जागा अशा आहेत ज्या पाच हजाराच्या आतील अंतराने गेल्या आहेत. तर सहा - सात हजाराच्या अंतराने गेल्या अशा १६ जागा आहेत, या सगळ्याची गोळा बेरीज केली तर ४६ होते. या ४६ जागा इथून तिथे झाल्या असत्या तर त्या निवडणुकीत ८५ वर काँग्रेस आणि ११० वर भाजपा गेली असती. आम्हाला पराभव मान्य आहे. त्याचे विश्लेषण करू, असेही आशिष शेलार म्हणाले.

...म्हणून उद्धव ठाकरेंना मुंबईकरांनी नाकारले -आशिष शेलार पुढे म्हणाले की, १९९७ साली उद्धवजींची शिवसेना लढली तेव्हा १०३ नगरसेवक होते. ९७ ते २००२ या काळात हा आकडा ९७ वर आला त्यानंतर ते ८४ वर आले. २०१२ मध्ये तर ही संख्या ७५ वर आली. २०१७ मध्ये ८४ हा आकडा आला. ते आमच्या सरकारचे भाग होते म्हणून हे झाले. त्या फायद्यावर ८४ चा आकडा गाठला. राज्यात सरकारमध्ये नसते तर त्याच वेळेला हा आकडा ६० वर आला असता, आज तुमच्यासमोर मी भाकीत करतो की ... उद्धवजींची शिवसेना मुंबई महापालिकेत निवडणुकीत ५० चा आकडाही पार करू शकणार नाही. ही आकडेवारी त्याचा पुरावा आहे म्हणून मुंबईकरांनी यांना नाकारले; झिडकारले. मुंबईकरांनी कधीच त्यांना आपल म्हणणं देखील टाळले आहे. मुंबईकरांचा प्रामाणिकपणावर भरोसा आहे, उबाठा शिवसेनेचे पाकीट मारीत मोठे नावच आहे... पाकीट मारीचा धंदा करणारे महापालिकेतील आणि मविआतील अट्टल चोरांनी मुंबईला लुटले आहे. प्रामाणिक पणे काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईकर उभे राहतीलच याबद्दल माझ्या मनात बिलकुल शंका नाही, असेही आशिष शेलार म्हणाले.

राज ठाकरेंना इशारा -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ हजारच्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली आहे. यावर शेलार म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी २ हजाराची नोट बंद करण्याचा निर्णय प्रामाणिकपणे घेतला. मोदीजींचा देशातील प्रामाणिक नागरिकांवरचा हा भरोसा आहे. आता लगेच काही लोक बोलायला लागले आहेत. सन्माननीय राज ठाकरे यांना आमचे निवेदन आहे की, तुम्ही उत्तम बोलता. मोठे नेते आहात. अभ्यास करण्याचा प्रयत्न करता पण सगळ्याच बाबतीत तुम्ही बोलले पाहिजे आणि तुमचं बोलल्यावर खरंच असेल असं मानण्याच काही कारण नाही. व्यक्तिगत संबंधांमध्ये तुम्ही आमच्यावर व्यक्तिगत टीका केली तर त्याला आम्ही उत्तर देणार नाही. पण जर तुम्ही माझ्या पक्षावर आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर टीका केली तर तुमच्या विरोधात बोलायला मुलाहिजा ठेवणार नाही असा इशारा आशिष शेलार यांनी दिला आहे.

हेही वाचा -

  1. Arvind Kejriwal : केजरीवाल मुंबईत घेणार शरद पवार, उद्धव ठाकरेंची भेट, केंद्राच्या 'या' अध्यादेशाविरोधात समर्थन मागणार
  2. Raj Thackeray : राज ठाकरेंनी शेतकऱ्यांना थेटच विचारले; तुम्ही मला मतदान करत नाही, मग अडचणीच्या वेळी...
  3. Sanjay Raut News: दोन हजाराचे बंडल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे असतील- संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details