महाराष्ट्र

maharashtra

Talathi Recruitment : तलाठी भरतीतील गैरप्रकाराची चौकशी 'एसआयटी' मार्फत करा - जयंत पाटील

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 23, 2023, 5:06 PM IST

राज्य शासनाच्या तलाठी भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी झालेल्या प्रकाराबाबत 'एसआयटी' मार्फत चौकशी करण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Jayant Patil On Talathi Recruitment
जयंत पाटील

मुंबई :शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण ४६४४ पदांच्या सरळसेवा भरतीसाठी परीक्षा घेतल्या जात आहेत. मात्र या परीक्षांमध्ये उमेदवारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून उमेदवारांचे मोठे नुकसान होत आहे. या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधण्यासाठी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात पाटील म्हणतात की, जवळपास ४ वर्षांनंतर तलाठी भरती परीक्षा होत असल्याने तब्बल दहा लाखांहून अधिक उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे.

पेपर फुटल्याची चर्चा :तलाठी भरती परीक्षेदरम्यान अनेक जिल्ह्यात परीक्षा केंद्रावर सर्व्हर बंद पडत आहेत. परीक्षार्थींंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर फुटल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. नाशिक येथील एका परीक्षा केंद्रावर काही उमेदवारांना गैरप्रकार करताना पोलिसांनी अटक केली आहे. परीक्षा केंद्र मॅनेज करण्यात येत असल्याचे प्रकार देखील समोर आले आहेत. नागपूर येथील परीक्षा केंद्रावरून प्रश्नपत्रिकांचे फोटो बाहेर पाठविण्यात आल्याचे समजते. यापूर्वी वनविभागाच्या भरतीसंदर्भात देखील असेच प्रकार घडल्याचे निदर्शनास आले असल्याचे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे.

'एसआयटी' स्थापन करा : म्हाडा भरतीमध्ये गैरप्रकार करणाऱ्या ६० आरोपींवर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. अशा प्रकारच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण होत आहे. सरकारने याबाबतीत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी सूचना जयंत पाटील यांनी पत्रात केली आहे. या सर्व प्रकरणांची विशेष चौकशी समितीमार्फत करून दोषींवर कठोर कारवाई करावी व प्रामाणिक परीक्षार्थीना न्याय द्यावा. तसेच, असे प्रकार पुन्हा घडू नयेत व शासकीय गट 'क' व गट 'ड' पदांची भरती पारदर्शकपणे होण्याकरिता कायम स्वरूपी यंत्रणा निर्माण करावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. याकरता केंद्र शासनाच्या कर्मचारी चयन आयोगाच्या धरतीवर राज्य शासनाने स्वतंत्र आयोग स्थापन करण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करावा. अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्येच गट 'क' व गट 'ड' पदांच्या भरतीसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.

हेही वाचा:

  1. MLAs Disqualification Hearing :आमदार अपात्रतेच्या सुनावणीसाठी दिरंगाई होणार नाही; योग्य निर्णय घेणार - राहुल नार्वेकर
  2. Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत आकस ठेवणाऱ्या अधिकाऱ्याच्या छाताडावर उभे राहू - संजय पवार यांनी ठोकला शड्डू
  3. साताऱ्यातील 'त्या' घटनेमागे मोठे कट-कारस्थान; उच्च स्तरीय चौकशी करा - उदयनराजे भोसले

ABOUT THE AUTHOR

...view details