महाराष्ट्र

maharashtra

जरांगेंनी उपोषणातून जे कमावलं ते भाषणातून गमावू नये - दीपक केसरकर

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2023, 10:06 PM IST

Deepak Kesarkar on Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) निमित्ताने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे नाव आता एक परवलीचा शब्द बनला आहे. जरांगे पाटील यांचं उपोषण असो किंवा राज्यातील दौरे आणि दौऱ्यांना होणारी गर्दी आणि या गर्दीसमोर जरांगे पाटील करत असलेले तडफदार भाषण हा सध्या महाराष्ट्रातील केंद्रबिंदू बनला आहे. जरांगेंनी उपोषणातून जे कमावलं ते भाषणातून गमावू नये,असं म्हणत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी टिप्पणी केली आहे.

Minister Deepak Kesarkar
दीपक केसरकर आणि मनोज जरांगे पाटील

प्रतिक्रिया देताना मंत्री दीपक केसरकर

अहमदनगर (शिर्डी) Deepak Kesarkar on Manoj Jarange: मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्यावर आक्रमक असलेले जरांगे पाटलांना ओबीसी समाजाकडूनही आता प्रत्युत्तर दिलं जाऊ लागलं आहे. अंबड येथील सभेत ओबीसी नेत्यांनी विशेष करून छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर (Manoj Jarange Patil) तिखट शब्दात टिका केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री दीपक केसरकर यांनी जरांगे पाटलांना सबुरीचा सल्ला दिला आहे. जरांगे पाटलांनी उपोषणातून जे कमावलं ते त्यांनी आता आपल्या भाषणातून गमावू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे.

जरांगे पाटलांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी: दीपक केसरकर आज शिर्डी येथे साई समाधी दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणासह एकूणच राज्यात सुरू असलेल्या विविध घडामोडींवर आपलं मत व्यक्त केलं. जरांगे पाटलांनी केलेल्या उपोषणातून मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र त्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असं वचन दिलं आहे. त्यामुळं जरांगे पाटलांनी श्रद्धा आणि सबुरीचा मार्ग अवलंबत सरकारला वेळ दिला पाहिजे.

यामुळं राज्यातील वातावरण बिघडत आहे : राज्यात एकीकडे मराठा आरक्षण आणि यानिमित्तानं होणारी वक्तव्य त्याचबरोबर ओबीसी नेत्यांकडून दिलं जाणारे प्रत्युत्तर, यामुळं राज्यातील वातावरण कुठेतरी बिघडत आहे. त्यामुळं दोन्ही बाजूने आता संयम पाळला पाहिजे. शेवटी हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे अठरापगड समाजाला एकत्रित ठेवून घडलेले राज्य आहे. कुठेतरी समाजामध्ये वितृष्ट निर्माण होईल असं वक्तव्य दोन्ही बाजूंनी होऊ नये अशी अपेक्षा केसरकर यांनी यावेळी व्यक्त केली.


मनोज जरांगे पाटील यांनी आपलं प्राण पणाला लावून उपोषण केलं. त्यामुळं उपोषणातून त्यांची वाढलेली लोकप्रियता अतिशय शिखरावर आहे. मात्र आता जे उपोषणातून कमावलं आहे ते त्यांनी आपल्या भाषणातून गमावू नये. निश्चितपणे जरांगे पाटलांना मराठा आरक्षणाबाबतीतल्या मुद्द्यावर क्रेडिट द्यावे लागेल. मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिलं आहे. त्या पूर्ततेसाठीचा संयम जरांगे पाटलांनी बाळगावा. - दीपक केसरकर, शिक्षण मंत्री



आक्षेपार्ह वक्तव्य करण्यापेक्षा संयम बाळगा : मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे प्रयत्न केलं. उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकलं. मात्र पुढे सर्वोच्च न्यायालयात अडचणी आल्या. त्यानंतर आता क्युरेटिव्ह याचिका दाखल झालेली आहे. त्यामुळं आता मराठा समाजाने सरकारला सहकार्य करत इंपिरिकल डाटा योग्य पद्धतीने गोळा केला पाहिजे. गावागावात समित्या स्थापन करून मराठा समाजाची आजची असलेली अवस्था हा सर्व डाटा न्यायालयासमोर गेल्यास आरक्षण मिळण्यास कोणत्याही अडचणी येणार नाही. मात्र यासाठी श्रद्धा आणि सबुरी याची आवश्यकता आहे. त्यामुळं कोणत्याही समाजाने आता एकमेकांवर आक्षेपार्ह वक्तव्य करण्यापेक्षा संयम बाळगला पाहिजे असं केसरकर म्हणाले.

हेही वाचा -

Deepak Kesarkar Met Sharad Pawar : शरद पवारांच्या भेटीवर मंत्री केसरकर काय म्हणाले... पाहा व्हिडिओ

Sunil Kawale Suicide Case : आत्महत्याग्रस्त सुनील कावळे यांच्या कुटुंबियांना सरकारकडून १० लाखांची मदत; मंत्री दीपक केसरकरांची माहिती

Monsoon Session 2023: शिक्षण पद्धती व शिक्षकांच्या प्रश्नांवर एक दिवसाची विशेष बैठक घेणार- शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन

ABOUT THE AUTHOR

...view details