महाराष्ट्र

maharashtra

रोमहर्षक सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय, मालिका ४-१ ने जिंकली

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 10:31 PM IST

Updated : Dec 3, 2023, 10:45 PM IST

Ind Vs Aus : बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या टी २० सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर ६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारतानं ५ सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली आहे.

Ind Vs Aus
Ind Vs Aus

बेंगळुरू Ind Vs Aus :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी २० सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना आज (रविवार, ३ डिसेंबर) खेळला गेला. बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात टीम इंडियानं ६ धावांनी विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित २० षटकांत १६०-८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ २० षटकात ८ गडी गमावून १५४ धावाच करू शकला. या विजयासह भारतानं मालिका ४-१ अशी जिंकली आहे.

श्रेयस अय्यरचं अर्धशतक : ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण दिलं. भारताचे दोन्ही युवा सलामीवीर आज मोठी खेळी करू शकले नाही. यशस्वी जयस्वाल २१ धावा करून बाद झाला तर ऋतुराज गायकवाडनं १० धावाचं योगदान दिलं. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरनं दमदार खेळी केली. त्यानं ३७ चेंडूत ५३ धावा ठोकल्या. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंह स्वस्तात बाद झाले. त्यांनी अनुक्रमे ५ आणि ६ धावा केल्या. अखेरच्या षटकात जितेश शर्मानं १६ चेंडूत २४ धावा आणि अक्षर पटेलनं २१ चेंडूत ३१ धावा केल्यानं भारतानं २० षटकात १६०-८ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाकडून बेहरेनडॉर्फ आणि द्वारशुईसनं प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.

मुकेश कुमारचे ३ बळी : धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर जोश फिलिप ४ धावा करून बाद झाला, तर ट्रॅव्हिस हेड २८ धावा करून परतला. ऑस्ट्रेलियाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बेन मॅकडरमॉटनं अर्धशतकी खेळी केली. तो ३६ चेंडूत ५४ धावा करून बाद झाला. अखेरच्या षटकांमध्ये कर्णधार मॅथ्यू वेडनं १५ चेंडूत २२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ निर्धारित २० षटकात ८ गडी गमावून १५४ धावाच करू शकला. अशाप्रकारे भारतानं ६ धावांनी विजय मिळवला. भारताकडून मुकेश कुमारनं ३२ धावा देऊन ३ बळी घेतले.

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

भारत - यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार

ऑस्ट्रेलिया - जोश फिलिप, ट्रॅव्हिस हेड, बेन मॅकडरमॉट, आरोन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड (कर्णधार/विकेटकीपर), बेन द्वारशुईस, नॅथन इलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा

हेही वाचा :

  1. अक्षरच्या फिरकीची कमाल, भारताचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय; मालिकेत ३-१ ची विजयी आघाडी
Last Updated : Dec 3, 2023, 10:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details