महाराष्ट्र

maharashtra

हुतात्मा नगरीत हुतात्म्यांचे वारस शासकीय लाभापासून वंचित; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

By

Published : Aug 15, 2021, 10:56 AM IST

Updated : Aug 15, 2021, 12:03 PM IST

सोलापूरला हुतात्मा नगरी म्हणून ओळखले जाते. पण या हुतात्मा नगरीमध्ये हुतात्म्यांच्या वंशजांना शासकीय लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. यांना काही महिने शासकीय लाभ मिळाला. त्यानंतर पुन्हा मिळणारा लाभ किंवा मानधन बंद करण्यात आले. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी यांच्या पूर्वजांनी इंग्रजांशी दोन हात केले, काहींनी फासावर जात देशासाठी बलीदान दिले, पण यांच्या वंशजांना मात्र शासकीय अनुदान किंवा मानधन प्राप्त करण्यासाठी आता आंदोलने करावी लागत आहेत

हुतात्म्यांचे वारस शासकीय लाभापासून वंचित
हुतात्म्यांचे वारस शासकीय लाभापासून वंचित

सोलापूर- भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रवादी मुस्लिमांनीही मोठी कामगिरी केली आहे. पण ज्यांनी स्वतंत्र लढ्यात इंग्रजी सत्तेविरुद्ध कधीच झगडा केला नाही, अशा लोकांच्या हाती आज सत्ता आहे. स्वातंत्र्या लढ्याच्या इतिहासात इंग्रजांसोबत लढणाऱ्यामध्ये सोलापुरातील स्वातंत्र्य सैनिकांचे चार हुतात्म्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात योगदान आहे. मात्र, त्यांच्या कर्तृत्वाचा विसर तर देशाची सत्ता हाकणाऱ्यांना पडलाच आहे, तसचे त्यांच्या वारसांना आज हलाखीचे आयुष्य जगण्याची वेळ आली असल्याची खंत स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होणाऱ्या सोलापूरकरांच्या नातलग वारसांनी व्यक्त केली आहे.

कुर्बान हुसेन यांच्या वंशजांचा लढा-
सोलापूरला हुतात्मा नगरी म्हणून ओळखले जाते. पण या हुतात्मा नगरीमध्ये हुतात्म्यांच्या वंशजांना शासकीय लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. यांना काही महिने शासकीय लाभ मिळाला. त्यानंतर पुन्हा मिळणारा लाभ किंवा मानधन बंद करण्यात आले. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी यांच्या पूर्वजांनी इंग्रजांशी दोन हात केले, काहींनी फासावर जात देशासाठी बलीदान दिले, पण यांच्या वंशजांना मात्र शासकीय अनुदान किंवा मानधन प्राप्त करण्यासाठी आता आंदोलने करावी लागत आहेत, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य सेनानीच्या वारसांच्या समस्यांचा आढावा घेणारा ईटीव्ही भारतचा हा विशेष वृतांत..

चार हुतात्म्यांपैकी दोन हुतात्माचे वंशज सोलापुरात आहेत. जगन्नाथ शिंदे, मलप्पा धनशेट्टी, रसूल कुर्बान हुसेन, श्री किसन सारडा या हुतात्म्यांच्या नावे सोलापूरला हुतात्मा नगरी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. यापैकी रसूल कुर्बान हुसेन आणि मलप्पा धनशेट्टी यांचेच वंशज सोलापुरात वास्तयव्यस आहेत. मात्र यांच्यावर सध्य स्थतित अतिशय हलाकीचे आणि गरीबीत आयुष्य जगण्याची वेळ आली आहे.

कुर्बान हुसेन यांच्या वंशजांचा लढा-

कुर्बान हुसेन यांना दोन मुलं होती. गुलाम हुसेन आणि इस्माईल हुसेन. इस्माईल हुसेन यांच्या मुलाचे नाव रसूल इस्माईल शेख. यांनाच हुतात्मा कुर्बान हुसेन या नावाने ओळखले जाते. इस्माईल शेख यांना दोन अपत्य होती रसूल आणि मरियम, या दोघांनी देशासाठी इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा दिला होता. रसूल कुर्बान हुसेन यांना 12 जानेवारी 1931 रोजी पुणे येथील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली होती. देशासाठी शहीद झालेले रसूल कुर्बान हुसेन यांचा मृतदेह देखील सोलापूरला आणता आला नाही, अतिशय कमी वयात म्हणजे वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी अविवाहित रसूल कुर्बान हुसेन देशासाठी फासावर गेले. त्यांच्या वंशजांपैकी मरियम शेख या त्यांच्या बहिणीला ओळखले जात होते. भावाने देशासाठी प्राण दिले म्हणून मरियम शेख यांनी सुध्दा देशाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत मरियम यांनी स्वतः ला वाहून घेतले आणि भारत स्वतंत्र होइपर्यंत अहिंसेच्या मार्गाने इंग्रज सत्तेविरुद्ध लढा दिला.

हुतात्म्यांचे वारस शासकीय लाभापासून वंचित

अखेर 15ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर मरीयम शेख यांनी सोलापुरातील एका कुर्बान हुसेन नगर येथील झोपडपट्टी मध्ये गरीबीत आयुष्य काढले. स्वातंत्र्य सैनिकांना मानधन किंवा शासन अनुदान देत आहे, याबाबत त्या अनभिज्ञच होत्या. 1996 साली त्यांना काही समाजसेवकांनी शोधून काढले आणि त्यांची विचारपूस केली, त्यावेळी त्यांना शासनाने कसल्याही प्रकारची मदत दिली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली.

स्वातंत्र्यानंतर शासकीय लाभासाठी मरियम शेख यांचा लढा-


मरियमबी शेख या कुर्बान हुसेन नगरातील एका झोपडपट्टी मध्ये हलाखीचे आयुष्य जगताना त्यांना समाजसेवकांची साथ लाभली आणि प्रसिध्दी माध्यमातून त्यांची माहिती वाऱ्यासारखी राज्यभर पसरली. पण राज्य शासनाला माहिती होऊन सुद्धा काहीही मदत जाहीर करण्यात आली नाही. शेवटी मरियम शेख यांनी मुख्यमंत्र्यांना ,विधानसभा सभागृह नेत्यांना, आणि विरोधी पक्ष नेत्यांना अनेक अर्ज निवेदने दिले आणि 300 स्क्वेर फुटाचा भूखंड मंजूर झाला. पण हा भूखंड शासनाच्या लाल फितीच्या कारभारात अडकला. त्यासाठी देखील मरियम यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यावर मंजूर झालेला भूखंड त्यांना मिळाला. 2000 साली त्यांना शासनाकडून सोलापुरातील भारत नगर येथील एका छोट्याशा जागेत सोलापूर महानगरपालिकेने घर बांधून दिले. पण मासिक पेन्शन किंवा मानधन मिळत नव्हते. त्यासाठी देखील मरियम शेख यांनी आंदोलनाला सुरुवात केली. चार वर्षाच्या लढ्यानंतर त्यांना भूखंड मिळाले होता, मग आता पेन्शन किंवा मासिक मानधनासाठी आणखीन किती वर्षे लढायचे हा त्यांच्या वृद्धत्वाच्या शेवटच्या टप्प्यापुढे गेलेल्या शरीराचा प्रश्न होता. कारण 90व्या वर्षी आंदोलन किंवा उपोषण करण्यासाठी मरियम शेख याना शरीर साथ देत नव्हते.

पुढच्या पिढीचा आजही लढा सुरूच-

2001 साली मरियम शेख यांना तीन हजार रुपये मासिक पेंशन सुरू झाली. पण ते देखील अल्पावधीतच बंद झाले, मरियम शेख यांचे सुपुत्र हकीम शेख यांनी आईचा लढा आपल्या हाती घेतला आणि राज्य शासन व सोलापूर पालिका प्रशासन याविरोधात आंदोलन सुरू केले. स्वातंत्र्य सेनानी मरियम शेख यांची गरीबीतच 31 मार्च 2004 रोजी प्राण ज्योत मालवली. पण हकीम शेख यांचा लढा आजही आई मरियमसाठी मंजूर झालेल्या रकमेसाठी सुरूच आहे. पण त्यांची राज्य शासन किंवा सोलापूर महानगरपालिका प्रशासन दखल घेत नाही, अशी खंत हकीम यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.

हुतात्मा मलप्पा धनशेट्टी यांची सून शासकीय अनुदाना पासून वंचितच-

मलप्पा धनशेट्टी यांना देखील कुर्बान हुसेन यांच्यासोबतच 12 जानेवारी 1931 रोजी फासावर चढवण्यात आले. त्यावेळी त्यांचा पत्नी(निलव्वा बाई धनशेट्टी), एक मुलगा(शंकरप्पा धनशेट्टी) आणि सून(अन्नपूर्णा धनशेट्टी) असा परिवार होता. वडील धनशेट्टी यांच्या हौतात्म्यांनंतर मुलगा शंकरप्पा धनशेट्टी यांनी देशासाठी इंग्रजांविरोधात चळवळीत सहभाग घेतला. एका बॉम्ब खटल्यात इंग्रजांनी शंकरप्पा धनशेट्टी यांना अटक देखील केली होती. पण त्यांची सुटका झाली. पण वर्षभर शंकरप्पा धनशेट्टी यांच्या पत्नी अन्नपूर्णा आणि आई निलव्वाबाई यांचे मोठे हाल झाले होते. स्वातंत्र्याच्या अनेक आंदोलनात सासू सुनेने सहभाग घेतला होता. अखेर भारत स्वतंत्र झाला आणि मलप्पा धनशेट्टी यांचे सुपुत्र शंकरप्पा धनशेट्टी शेकाप पक्षा मार्फत राजकारणात आले, आणि मुंबई द्वैभाषिक राज्यातील विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. पण निलव्वाबाई धनशेट्टी(मलप्पा धनशेट्टी) यांना हुतात्म्याची पत्नी म्हणून कोणतेही अनुदान किंवा मासिक पेंशन मिळाली नाही. तसेच वारस म्हणून शंकरप्पा धनशेट्टी आणि अन्नपूर्णा धनशेट्टी यांना देखील कोणत्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही.

हुतात्मा मलप्पा धनशेट्टी यांची सून शासकीय अनुदाना पासून वंचितच-
1991साली अन्नपूर्णा धनशेट्टी यांना शासनाकडून घर मिळाले-

आमदार म्हणून शंकरप्पा धनशेट्टी यांनी सोलापुरात आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. देशासाठी लढले आणि महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी देखील यांनी प्रखर लढा दिला होता. शंकरप्पा धनशेट्टी आणि अन्नपूर्णा यांना एकच मुलगी होती, त्यांचे नाव शकुंतला असे होते. शकुंतला धनशेट्टी यांना मात्र दोन मुलं आहेत.21 ऑक्टोबर 1991 साली हुतात्मा मलप्पा धनशेट्टी यांचे सुपुत्र माजी आमदार शंकरप्पा धनशेट्टी यांचे निधन झाले. अन्नपूर्णा धनशेट्टी पून्हा एकट्या झाल्या. मुलगा नसल्याने मुलगी शकुंतला आपल्या पती आणि दोन्ही मुलांसोबत आईकडे राहावयास होती. त्याच वर्षी महापौर चाकोते यांनी हुतात्मा मलप्पा धनशेट्टी यांचे वारस आहेत म्हणून सोलापूर पालिकेकडून भूखंड मंजूर करून दिले आणि बांधकाम देखील करून दिले. तसेच सोलापूर पालिकेकडून मानधन सुरू केले. पण हे मानधन काही महिन्यांनी बंद झाले. सद्यस्थितीत एक रुपया देखील अन्नपूर्णा धनशेट्टी(हुतात्मा मलप्पा धनशेट्टी यांची सून) यांना मानधन किंवा अनुदान मिळत नाही. पण माजी आमदार शंकरप्पा धनशेट्टी यांच्या पत्नी म्हणून आमदर पेंशन मिळत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

Last Updated : Aug 15, 2021, 12:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details