महाराष्ट्र

maharashtra

अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री की पुणे-पिंपरीचे; चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल

By

Published : Sep 19, 2021, 12:50 PM IST

भाजापाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. पेट्रोल डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्यास महाराष्ट्र सरकारचा विरोध आहे, आता अजित पवारांचा खरा चेहरा उघड झाला असल्याचा टोला त्यांनी लगवला आहे. तसेच भाजपामधून कोणीही जाणार नाही, आणि गेलेल्यांना परतीचा मार्ग नाही, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल
चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल

पुणे- मला हे कळत नाही की उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत की पुणे, पिंपरीचे, अख्ख्या कोरोना काळात ते कुठे नागपूरला चंद्रपूरला गेले का? का राज्यातील इतर जिल्हे कुठे आहेत, त्यांना माहीतच नाही, असे म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच अजित पवार यांनी पुणे, पिंपरीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे अनेक नगरसेवक संपर्काच असल्याचे विधान केले होते. मात्र लोकांचं मोदींवर विश्वास आहे. त्यामुळे तुम्ही कितीही लोकं पळवण्याचा प्रयत्न केला तरी, कोणीही जाणार नाही, असा विश्वासही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील मानाचे आणि प्रमुख गणेशमंडळाला पाटील यांनी भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.

भारतीय जनता पक्षाचे आमदार सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर चंद्रकांत पाटील यांना विचारणा केली असता, पाटील म्हणाले फक्त बातम्या निर्माण केल्याने काहीही होत नाही. 22 महिने झाले आहेत, असच चालले आहे. आमच्या एकाही आमदाराला हात लावला नाही. उलट आम्ही पंढरपूरची पोट निवडणूक जिंकली, असा टोलाही पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.

अजित पवारांचा चेहेरा उघडा झाला -

पेट्रोल डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोध केल्याने आता त्यांचा खरा चेहेरा उघडा पडला असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आम्ही सांगत होतो की राज्यांनी त्यांचा जीएसटी टॅक्स कमी केल्यास पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहेत. गोवा आणि गुजरातमध्ये ते कमी करण्यात आले आहेत. मात्र आत्ता अजित पवार यांचा चेहेरा उघडा झाला आहे. त्यांना पेट्रोल डिझेलच्या टॅक्सवर राज्य चालवायचे आहे. त्यामुळे त्यांनी पेट्रोल डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्याच्या सरकारच्या भूमिकेला विरोध केला. त्यामुळे आत्ता सर्वसामान्य नागरिकांनी अजित पवार यांना प्रश्न विचारावा की लखनऊच्या बैठकीला का गेले नाहीत, पवारांना महागाईशी काही पडलेले नाही, तुम्हाला फक्त पैसा पाहिजे, अशी टीका यावेळी पाटील यांनी केली.

आजी माजीचा सांगितला तो किस्सा

मला असं वाटतंय मी फारच मोठा माणुस झालो आहे, असे वाटत आहे. कोणी मला राज्यपाल करतोय, कोणी मला केंद्रात पाठवत आहे. ते ऐकून मला खूप बरं वाटते आहे, असा उपरोधिक टोला लगावत आजी माजीच्या त्या वक्तव्याचे स्पष्टीकरण देत चंद्रकांत पाटील यांनी चर्चेंवर पडदा टाकला. पाटील म्हणाले, प्रसंग असा आहे की कोरोनाच्या काळात एक नाभिक समाजाचा तरुण माझ्या संपर्कात आला आणि मी त्याला सांगितलं की एक चांगला सलून तुला उभारून देऊ आणि देहू येथे त्याच्या सासुरवाडीत ते उभे केले. त्याच्या लोकार्पणचा कार्यक्रम होता आणि तेथील माईक सिस्टीमप्रमाणे त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब भेगळे इथे यावे असे सांगत होते. तेव्हा मी म्हणालो की माजी काय म्हणताय, ते काही दिवसांनी आजी होणार आहेत. त्यात मला माजी म्हणू नका याचा काहीही विषय नव्हता आणि तीच व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली. सामाजिक जीवनात जेव्हा तुमच्या नावावर एखादं बिल लागलं की मग एकामागोमाग घटना घडत असतात. एवढंच म्हणू की त्यानिमित्ताने महाराष्ट्रात खूप राजकीय चर्चा झाली. माझा कुठलाही हेतू नव्हता, असे स्पष्टीकरण पाटील यांनी यावेळी दिले.


परप्रांतीयांच्या मुद्द्यात शिवसेनेचे राजकारण -

कुठल्याही प्रांतातील नागरिक हा कुठेही जाऊन नोकरी, शिक्षण, व्यवसाय करू शकतो. आज मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रीयन माणूस हा मध्यप्रदेशमध्ये आहे. इंदोर, जबलपूर, दिल्लीत लाखो संख्येने मराठी माणूस आहे. गुन्ह्यांच्या विषयात जो कोणी गुन्हा करेल, मग तो मराठी भाषिक असो की परप्रांतीय त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मात्र परप्रातीयांच्या मुद्द्यावरून शिवसेनाच राजकारण करत आहे, आम्ही काहीही परप्रांतीयांच राजकारण करत नाहीये, आम्ही त्याचे अधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहोत. यात शिवसेनाच राजकारण करत आहे असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

मग समजायचं जहाज बुडणार -

या लोकांचा प्रॉब्लेम हाच आहे की भाजपने काहीही केलं तरी यांना झेपत नाही. जहाज जेव्हा बुडते तेव्हा कॅप्टनने सगळ्यात शेवटी बाहेर निघायचे असते. कॅप्टन जेव्हा बाहेर पडतात, तेव्हा असे समजायचं की आता जहाज बुडणार आहे, असे म्हणत पंजाब मधील राजकीय घडामोडीवर पाटील यांनी भाष्य केले.


हेही वाचा - संजय राऊत यांना अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून पाठवणार - चंद्रकांत पाटील

हेही वाचा - चंद्रकांत पाटील हे नागालॅंडचे राज्यपाल होणार असल्याचे मी ऐकले आहे; संजय राऊतांचा टोला

ABOUT THE AUTHOR

...view details