महाराष्ट्र

maharashtra

मुंबई महापालिका निवडणूक - आज आरक्षण सोडत, राजकीय पक्ष आणि इच्छुकांचे लक्ष

By

Published : May 31, 2022, 7:14 AM IST

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षित प्रभागांसाठी आरक्षण सोडत आज काढण्यात येणार आहे. आज आरक्षण सोडत काढल्यावर इच्छुक उमेदवारांना कोणत्या प्रभागातून निवडणूक लढवायची हे स्पष्ट होणार आहे. यामुळे या आरक्षण सोडतीकडे राजकीय पक्ष आणि इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिका निवडणूक
मुंबई महापालिका निवडणूक

मुंबई -मुंबई महानगरपालिकेचे 227 प्रभाग होते. लोकसंख्येत वाढ झाल्याने राज्य सरकारने 9 प्रभागांची वाढ करून 236 प्रभाग केले आहेत. प्रभाग रचना मंजूर झाल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने निवडणूक आयोगाने ओबीसी वगळता निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज 31 मे ला सकाळी 11 वाजता बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात अनुसूचित जातीच्या 15, अनुसूचित जमातीच्या 2 आणि 50 टक्के म्हणजेच 118 महिला आरक्षित प्रभागांची लॉटरी काढली जाणार आहे.

अशी सोडत काढली जाणार -राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी, पालिका आयुक्त व प्रशासक इकबाल सिंग चहल यांच्या उपस्थितीत महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षण लॉटरी काढली जाणार आहे. सुरुवातीला अनुसूचित जातीच्या 15, अनुसुचित जमातीच्या 2 प्रभागांची सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर त्यामधील महिला आरक्षित प्रभागांची सोडत काढली जाईल. शेवटी उर्वरित प्रभागांमधून 109 महिला आरक्षित प्रभागांची सोडत काढली जाणार आहे. आरक्षित प्रभागांच्या सोडतीनंतर त्यावर 6 जूनपर्यंत सूचना व हरकती मागवण्यात येणार आहेत. 13 जूनला अंतिम आरक्षण सोडत राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.

इच्छुक उमेदवारांचे लक्ष -आज प्रभाग आरक्षण सोडतीनंतर कोणत्या प्रभागातून कोणता उमेदवार द्यायचा याची चाचपणी राजकीय पक्षांकडून सुरू केली जाईल. त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवारही निवडणुकीच्या कामाला लागणार आहे. ही आरक्षण सोडत प्रभाग आरक्षित झाल्याने अनेकांना पुढील पाच वर्षे नगरसेवक पदापासून लांब ठेवणार आहे. यामुळे या आरक्षण सोडतीकडे राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details