मुंबई - पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात अटक झालेला उद्योजक राज कुंद्रा याला अटक केल्यानंतर नवनवीन माहिती समोर येत आहे. याच प्रकरणाशी निगडीत अटकेत असलेल्या उमेश कामत याच्यासोबतचे चॅट समोर आले आहे. मात्र, यामुळे चर्चेत आलेल्या आरोपी उमेश कामतचे नाव पुढे येताच प्रसारमाध्यमांकडून मराठी चित्रपट अभिनेता उमेश कामत याचा फोटो दाखवला आहे. त्यामुळे अभिनेता उमेश कामतने सोशल मीडियातून बेजबाबदार पत्रकारिता म्हणत संताप व्यक्त केला आहे. तसेच या माध्यमांवर कारवाई करण्याचा इशाराही त्याने दिला आहे..
काय आहे प्रकरण-
मुंबईतील मढ येथील एका बंगल्यावर छापा मारून पोर्नोग्राफी चित्रीकरण करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीत राज कुद्रा याचा माजी पीए म्हणून काम पाहणाऱ्या उमेश कामत या आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राजकुद्रा याला अटक झाल्यानंतर उमेश कामत आणि राज कुंद्रा या दोघांतील संभाषण समोर आले आहे. त्यानंतर माध्यमांनी आरोपी उमेश कामत याचा फोटो वापरण्याऐवजी सुप्रसिद्ध मराठी अभिनेता उमेश कामत याचा फोटो आरोपी उमेश कामत म्हणून प्रसारीत केला. त्यावर अभिनेता उमेश कामत यांने संताप व्यक्त केला.