ETV Bharat / state

दीड महिन्यात मुंबईतील रस्त्यांवरून साफ केली 68 टन धूळ; बीएमसीची मुंबई उच्च न्यायालयात माहिती

मुंबई शहरामधील हवेचा दर्जा सुधारणा करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेनं काय सुधारणा केल्या आहेत? याची माहिती महापालिकेकडून सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे.

BMC info  on pollution measures in Bombay high court
मुंबई शहरातील पदपथ (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : December 16, 2025 at 9:21 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : शहरातील वातावरणाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुुंबई महानगरपालिकेकडून विविध स्तरांवर उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या दीड महिन्यात मुंबईच्या रस्त्यावरून बृहन्मुंबई महापालिकेनं (बीएमसी) टँकरच्या माध्यमातून पाणी फवारत तब्बल 67.86 टन धूळ झाडल्याची माहिती महापालिकेनं प्रतिज्ञापत्रावर हायकोर्टात सादर केलीय.

एक्यूआय सुधारण्यासाठी काम केल्याचा मुंबई महापालिकेचा दावा- मुंबईच्या हवेचा दर्जा प्रदूषणामुळे घसरला असून याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दोन वर्षांपूर्वी सुमोटो याचिका दाखल करून घेतलीय. या याचिकेवर सोमवारी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी पालिकेच्या पर्यावरण आणि हवामान विभागाचे मुख्य अभियंता अविनाश काटे यांनी पालिकेच्यावतीनं प्रतिज्ञापत्र सादर करत पालिकेनं यासंदर्भात केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यात त्यांनी म्हटलंय की, मुंबईत सध्या 1,954 बांधकाम साईट्स सुरू आहेत. त्यापैकी 1,020 साईट्सवर लो कॉस्ट सेन्सर बसवण्यात आलेत. याशिवाय विविध ठिकणी 746 सेन्सर बसवण्यात आलेत. यातून प्रदूषणाचा सारा डेटा एकत्र गोळा केला जातोय.

BMC info  on pollution measures in Bombay high court
मुंबई शहर (Source- ETV Bharat Reporter)



महापालिकेकडून रस्ते सफाईचा दावा

BMC info  on pollution measures in Bombay high court
बृहन्मुंबई महापालिका (Source- ETV Bharat Reporter)
  • धुळीचं प्रदूषण वाढू नये म्हणून बीएमसीनं टँकरच्या साहाय्यानं गेल्या दीड महिन्यात मुंबईच्या 24 वॉर्ड मधील 1518.35 किलोमीटरचे रस्ते धुवून काढत तब्बल 67.86 टन धूळ साफ केली.
  • नोव्हेंबर महिन्यात 157 टँकर वापरून 402 किलोमीटरचे रस्ते धुऊन 12.41 टन धूळ साफ केलीय.
  • 8 डिसेंबरपर्यंत 387 टँकर वापरून 1116.35 किमीचे रस्ते धुऊन 55.45 टन धूळ साफ केलीय.
  • सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत दोन शिफ्टमध्ये 179 वेळा मिस्ट मशिनची फवारणी करत 802.8 किमी रस्त्यांवरील प्रदूषण नियंत्रणात आणलंय.
  • नोव्हेंबर महिन्यात 43 मिस्ट मशिनच्या सहाय्यानं 201.9 किमीच्या रस्त्यांवर फवारणी केलीय.
  • 8 डिसेंबरपर्यंत 136 मिस्ट मशिनच्या सहाय्यानं 600.9 किमीच्या रस्त्यांवर फवारणी केलीय.
  • महापालिकेनं जून 2025 पासून रस्त्यांवर बेकायदेशीरपणे क्रॉंक्रिट आणि इतर मलबा वाहून नेणाऱ्या 315 वाहनांवर कारवाई करत 8,03,309 रूपयांचा दंड आकारलाय.
  • जून 2025 पासून रस्त्यांवर बेकायदेशीरपणे बांधकामातील मलबा फेकणाऱ्यांवर 567 केस दाखल करत त्यांच्यावर 32,34,391 रूपयांचा दंड आकारलाय.
  • जून 2025 पासून उघड्यावर घनकचरा फेकणाऱ्यांवर 107 गुन्हे दाखल करत 84,700 रूपये दंड आकारलाय.


मुंबईतील पारंपारिक बेकऱ्यांची धुरांडी अद्यापही सुरूच - महापालिकेच्यावतीनं प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आलंय की, बीएमसीच्या हद्दीत एकूण 593 बेकऱ्या आहेत. ​यापैकी 209 बेकऱ्या आधीच हरित इंधनावर कार्यरत होत्या. तर एकूण 347 बेकऱ्यांनी हरित इंधनासाठी आवश्यक त्या निकषांचं पालन केलं. तर काही अद्यापही त्या प्रक्रियेत आहेत. मात्र, ​246 बेकऱ्या अजूनही पारंपारिक इंधनावरच असून त्या रोज धूर सोडतच आहेत. अशा बेकऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यांना लवकरात लवकर हरित इंधनाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं महापालिकेनं आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय.

  • पुढील सोमवारी होणार सविस्तर सुनावणी - सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान हायकोर्टानं या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या वकिलांचं कौतुक केलं. त्यांच्या मेहनतीची परतफेड म्हणून प्रत्येकी दीड लाख रुपयांची तरतूद करण्याचे आदेश प्रशासनाला देत पुढील सविस्तर सुनावणी सोमवारी घेण्याचं निश्चित केलंय.

डिसेंबरच्या पहिल्या 8 दिवसांत मुंबईत एक्यूआय 100 ते 180 - दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता वर्षानुवर्षे खालावत असताना र्थिक राजधानी मुंबईतील हवेची गुणवत्ता खराब होत असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. 8 डिसेंबरच्या आकडेवारीनुसार सकाळी शहराचा एकूण एक्यूआय 200 ते 250 दरम्यान नोंदवण्यात आला. तर काही भागात एक्यूआय 255 पर्यंत पोहोचल्याची नोंद आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि विविध हवामान संकेतस्थळांच्या नोंदीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या 8 दिवसांत मुंबईत एक्यूआय बहुतेक वेळा 100 ते 180 दरम्यान राहिला. तथापि, काही दिवशी एक्यूआय 200 च्या पुढे गेल्यानंतर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा-