प्रभावी उपाययोजनांमुळे AQI मध्ये लक्षणीय सुधारणा, महापालिकेने थोपटली स्वतःचीच पाठ
मुंबईतील AQI मध्ये म्हणजेच वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा होत असल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले असून, महापालिकेने स्वतःचीच पाठ थोपटण्याचा प्रयत्न केलाय.

Published : December 1, 2025 at 5:13 PM IST
मुंबई – मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विविध प्रभावी उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये खासगी प्रकल्पांसह रस्ते, मेट्रो आदी शासकीय प्रकल्पांचाही समावेश आहे. वाऱ्याच्या वेगातही आता सुधारणा झालीय. या सर्वसमावेशक कारणांमुळे मुंबईतील AQI मध्ये म्हणजेच वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा होत असल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले असून, महापालिकेने स्वतःचीच पाठ थोपटण्याचा प्रयत्न केलाय.
मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन : महानगरपालिकेने जारी केलेल्या 28 मुद्द्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन होईल, यावर भर दिला जात असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. तसेच यासाठी विविध बांधकामांना ‘कामे थांबवा’ नोटीस बजावण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी, शासकीय, अशासकीय प्रकल्पांवर यापुढेही कारवाई सुरूच ठेवावी, असे सक्त निर्देश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. तसेच ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन स्टेज-4 (ग्रॅप-4) मुंबईसाठी सध्या लागू नाही. मात्र, संनियंत्रणासंदर्भात निर्देश देण्यात आल्याचे गगराणी यांनी स्पष्ट केले आहे.
वायू प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावीपणे उपाययोजना : महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी म्हणाले की, “वायू प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावीपणे उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये बेकरी तसेच स्मशानभूमीचे स्वच्छ इंधनावर परिवर्तन, धूळ आटोक्यात आणण्यासाठी मिस्टिंग मशीनच्या सहाय्याने फवारणी, पाण्याने रस्ते धुऊन काढणे आणि विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन, नागरिकांमध्ये जनजागृती यासह विविध उपाययोजनांचा समावेश आहे. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी 15 ऑक्टोबर 2024 रोजी महानगरपालिकेने 28 मुद्द्यांचा समावेश असलेली सर्वंकष मार्गदर्शक तत्त्वे जारी केलीत. हीच मार्गदर्शक तत्त्वे यावर्षी देखील पुन्हा लागू करण्यात आली आहेत.”
सर्व प्रशासकीय विभाग स्तरावर एकूण 94 भरारी पथकांची नियुक्ती : पुढे बोलताना गगराणी म्हणाले की, “या मार्गदर्शक तत्त्वांचे काटकोरपणे पालन व्हावे, यासाठी महानगरपालिकेकडून सर्व प्रशासकीय विभाग स्तरावर एकूण 94 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांनी खासगी प्रकल्पांसह रस्ते, मेट्रो आदी शासकीय प्रकल्पांची पाहणी करत मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. बांधकाम स्थळी सेन्सॉर आधारित एक्यूआय मोजणारे संयंत्र कार्यान्वित राहतील, याची पाहणीसुद्धा या पथकाकडून सुरू आहे. मुंबई बंदर प्राधिकरण परिसरात पेटवल्या जाणाऱ्या शेकोट्या बंद करण्याच्या सूचनेला संबंधित यंत्रणेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेदेखील आयुक्त भूषण गगराणी यांनी म्हटले आहे.
वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 18 किलोमीटरपर्यंत पोहोचला : 26 नोव्हेंबरपासून मुंबईतील एक्यूआयमध्ये सातत्याने सुधारणा दिसून येत आहे. हे सर्व प्रशासनाने केलेल्या नियमांच्या कठोर अंमलबजावणीमुळे झाल्याचे महापालिकेने म्हटले आहे. 28 नोव्हेंबरपूर्वी वाऱ्याचा वेग ताशी 3 ते 4 किलोमीटर होता, तसेच वातावरणात आर्द्रता होती. मात्र, आता त्यात सुधारणा होऊन वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 18 किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. परिणामी, वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा होत आहे.
मुंबईतील 482 बांधकामांना 'कारणे दाखवा' नोटीस : मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तसंच वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याप्रकरणी पालिकेकडून मुंबईतील 482 बांधकामांना 'कारणे दाखवा' नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यापैकी 264 बांधकामांना 'कामे थांबवा' नोटीस बजावण्यात आली आहे.
हेही वाचाः

