ETV Bharat / state

असंख्य मगरींनी वेढलेल्या पंचगंगेत 'तो' पाच दिवस राहिला जिवंत, व्हाईट आर्मीनं दिलं जीवदान - white army rescue

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 23, 2024, 12:55 PM IST

White Army Rescue : घरात किरकोळ कारणावरुन झालेल्या वादामुळं कोल्हापूरच्या एका 16 वर्षीय तरुणानं थेट पंचगंगेत उडी घेतली. मात्र त्यात असणाऱ्या जलपर्णी आणि 14 फुटी मगरींच्या वावरानं तो भयभीत झाला आणि पंचगंगेच्याकाठी जलपर्णीत तो अडकला. तब्बल पाच दिवस गुडघाभर चिखलात मदतीची याचना करणाऱ्या या तरुणाला व्हाईट आर्मीच्या जवानांनी जीवदान दिलं.

असंख्य मगरींनी वेडलेल्या पंचगंगेत 'तो' पाच दिवस राहिला जिवंत, कोल्हापूरची घटना वाचून म्हणाल 'देव तारी त्याला कोण मारी'
असंख्य मगरींनी वेडलेल्या पंचगंगेत 'तो' पाच दिवस राहिला जिवंत, कोल्हापूरची घटना वाचून म्हणाल 'देव तारी त्याला कोण मारी'

असंख्य मगरींनी वेडलेल्या पंचगंगेत 'तो' पाच दिवस राहिला जिवंत

कोल्हापूर White Army Rescue : क्षणिक रागातून घरात घडलेल्या वादामुळं अस्वस्थ झालेल्या सोळा वर्षीय मुलानं घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पंचगंगेत उडी घेतली. मात्र सभोवताली असलेल्या जलपर्णी आणि 14 फुटी मगरींच्या वावरानं तो भयभीत झाला आणि पंचगंगेच्याकाठी जलपर्णीत तो अडकला. तब्बल पाच दिवस गुडघाभर चिखलात मदतीची याचना करणाऱ्या कोल्हापुरातील शिरढोण गावच्या आदित्य बंडगर याला व्हाईट आर्मीच्या जवानांनी जीवदान दिलं. व्हाइट आर्मीच्या जवानांचं या बचाव कार्यामुळं सर्वत्र कौतुक होतंय.

पाच दिवस राबविली शोध मोहीम : 'देव तारी त्याला कोण मारी' याचा प्रत्यय कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळच्या शिरढोण गावात आला. सोमवारी पहाटे घरात झालेल्या वादामुळं सोळा वर्षाचा आदित्य बंडगर पहाटे साडेपाचच्या सुमारास घरातून बाहेर पडला. घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पंचगंगेत त्यानं उडी घेतली. पोहता येत असूनही सैरभैर झालेल्या आदित्यला उडी घेताना उजव्या पायाला दुखापत झाली. यामुळं त्याला धड पोहताही येत नव्हतं. पायाला आणि कमरेला जखम झाल्यामुळं तो कसाबसा नदीकाठच्या जलपर्णीजवळ आला. त्यानं मदतीची याचना केली. मात्र, निर्मनुष्य नदीकाठी त्यानं दिलेल्या हाकेला चिटपाखराचाही प्रतिसाद मिळेना. ही घटना व्हाईट आर्मीच्या जवानांना समजली. यानंतर जवानांनी पंचगंगा नदीत शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान नदीकाठी आढळलेल्या आदित्यच्या चप्पलमुळं त्यानं नदीत उडी घेतल्याचं स्पष्ट झालं. मात्र तब्बल पाच दिवस जवानांनी प्रयत्नांची पराकष्टा केली तरीही आदित्यचा थांगपत्ता त्यांना लागला नाही.

गुडघाभर चिखलातून काढलं बाहेर : व्हाईट आर्मीचं बारा जणांचं पथक ड्रोन कॅमेरा आणि बोटीद्वारे पंचगंगेत आदित्यचा शोध घेत होतं. त्यातच शुक्रवारी सायंकाळी शोध मोहीम सुरू असताना जवानांना नदीकाठी क्षीण आवाज ऐकू आला. हा आवाज संशयास्पद वाटल्यानंतर जवानांनी या ठिकाणी शोधमोहीम राबवली आणि गुडघाभर चिखलात मदतीची याचना करणारा आदित्य त्यांना दिसला. क्षणाचाही विलंब न लावता गुडघाभर चिखलात अडकलेल्या आदित्यला जवानांनी पाण्याबाहेर काढलं, पाच दिवस जलपर्णी आणि मगरींनी वेढलेल्या पंचगंगेत सोळा वर्षाचा मुलगा जिवंत कसा राहिला असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना पडला होता. मात्र, 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय घटनेतून आला.

जवानांसमोर मोठं आव्हान : पंचगंगा नदीचं पात्र मोठं असल्यामुळं या नदीच्या पाण्यात 14 फुटांच्या मगरीचा वावर आहे. त्यातच सध्या मगरीच्या अंडी घालण्याचा हंगाम असल्यामुळं या काळात मगरी अत्यंत आक्रमक असतात. त्यातच पंचगंगेला जलपर्णीनं वेढा दिलाय. यामुळं बचाव कार्य करताना व्हाईट आर्मीच्या जवानांना अनेक अडथळे पार करावे लागले. पंचगंगेत अशुद्ध पाणी असल्यामुळं पाणबुडीचाही आधार घेता आला नाही. त्यामुळं जवानांनाही आदित्य जिवंत सापडेल याची आशा नव्हती, अनेक अडथळे पार करुन आदित्यला व्हाईट आर्मीच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढलं.



आदित्यवर उपचार सुरू : महाड सारख्या मगरींच्या राजधानीत आम्ही काम केलय. त्या कामाचा अनुभव पाठीशी असल्यामुळं पंचगंगा नदीत मगरीचा वावर असूनही ड्रोन कॅमेऱ्यासह अत्याधुनिक साधनसामग्रीसह पाच दिवस बचाव कार्य सुरू होतं. नदीकाठी जलपर्णीत आवाज ऐकू आल्याचं निदर्शनास आल्यानंतर आम्ही या ठिकाणी शोध मोहीम राबवून आदित्य बंडगर याला सुखरुप बाहेर काढलं. त्याच्यावर शिरोळमध्ये खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या उजव्या पायाला आणि कमरेला दुखापत झाली असून लवकरच तो यातून बरा होईल.


हेही वाचा :

  1. कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
  2. महायुतीचा उमेदवार कोण असेल याचा विचार करण्याची गरज नाही, माझे सर्व मित्र - श्रीमंत शाहू महाराज
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.