ETV Bharat / state

तुळजाभवानी संस्थानचा लाचखोर लेखाधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात; सहा लाखांची घेतली लाच

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 10:51 AM IST

Tuljabhavani Temple Sansthan : तुळजाभवानी मंदिर (Tuljabhavani Temple) संस्थानचे मुख्य लेखाधिकारी सिद्धेश्वर शिंदे यांना 6 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं आहे.

Tulja Bhavani Mandir Sansthan
तुळजाभवानी देवी मंदिर संस्थान

धाराशिव Tuljabhavani Temple Sansthan : तुळजाभवानी मंदिर संस्थान पुन्हा चर्चेत आलं आहे. गेल्या वर्षापासून मंदिर संस्थानच्या सोन्या चांदी दागिन्यांच्या गैरव्यवहाराचं प्रकरण राज्यात गाजत आहे. आता मंदिर संस्थानच्या लेखाधिकाऱ्यानं सहा लाख रुपयांची लाच घेतल्यानं मंदिर संस्थानचा गैरकारभार चर्चेत आलाय. सिध्देश्वर शिंदे असं लाचखोर मुख्य लेखाधिकाऱ्याचं नाव आहे.


लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं : तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य लेखाधिकारी सिध्देश्वर शिंदे यांना सहा लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं आहे. एका ठेकेदाराकडून केलेल्या कामाचं देयक अदा करण्यासाठी शिंदे यांनी 10 लाख रुपयांची मागणी केली होती. पंचासमक्ष सहा लाख रुपये रोख घेताना तुळजाभवानी मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून शिंदे यांना अटक केलीय.

10 लाखांची केली मागणी : तुळजापूर शहरात मंदिर संस्थानच्या वतीनं तुळजाभवानी सैनिकी विद्यालय चालविले जाते. या विद्यालयाच्या संरक्षण भिंतीसह प्रवेशद्वाराच्या बांधकामाचा ठेका सोलापूर येथील एका शासकीय कंत्राटदाराला मिळाला होता. तीन कोटी 88 लाख रूपयांचे हे एकूण काम होते. 90 टक्के बांधकाम जवळपास पूर्ण झालं आहे. त्यामुळं दोन कोटी रूपयांपेक्षा अधिकच्या देयकाची रक्कम तपासणी करुन मंजुरीस पाठविण्यासाठी आणि जमा करण्यात आलेली अतिरिक्त सुरक्षा रक्कम 34 लाख 60 हजार रूपये परत मिळवून देण्यासाठी 10 लाखाची मागणी केली होती.

तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : दोन-तीन दिवसांपासून त्यासाठी तडजोड सुरू होती. तडजोडीअंती हा व्यवहार सहा लाख रूपयांमध्ये मान्य करण्यात आला. तडजोडीत ठरल्याप्रमाणं बुधवार, 7 फेब्रुवारी रोजी दुपारी तुळजाभवानी मंदिराच्या प्रशासकीय कार्यालयात सहा लाख रूपये स्वीकारताना लेखाधिकारी शिंदेंना अटक करण्यात आली. तुळजापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सिध्दराम म्हेत्रे, पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, आशिष पाटील यांनी केली.

हेही वाचा -

  1. Tuljapur Bandh : तुळजापूरमध्ये कडकडीत बंद; तुळजाभवानी दर्शन मंडपावरून वाद पेटला, पुजारी-व्यापाऱ्यांसह स्थानिकांची नाराजी
  2. Tulja Bhavani Temple : अंगावर तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना तुळजापूर मंदिरात दर्शनास मनाई; ड्रेस कोड लागू
  3. श्री तुळजाभवानीच्या गायब दागिन्यांची खंडपीठामार्फत चौकशी करावी, किशोर गंगणेंची मागणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.