ETV Bharat / state

माळशेज घाटात टेम्पो आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; तिघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी - Malshej Ghat Accident

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 11:58 AM IST

Malshej Ghat Accident : गेल्या काही दिवसांपासून अपघाताचं सत्र सुरू आहे. असं असतानाच आता माळशेज घाटामध्ये दुधाचा टँकर आणि भाजीपाला वाहतूक करणाऱ्या टेम्पोमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत असून मृतांमध्ये पती पत्नीचा समावेश आहे.
tempo and milk tanker accident near malshej ghat three killed two injured
माळशेज घाट महामार्गावर टेम्पो आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; 3 ठार तर दोन जण गंभीर जखमी (Etv Bharat)

ठाणे Malshej Ghat Accident : आळेफाट्याच्या दिशेनं कल्याणकडं जाणारा दुधाचा ट्रक आणि माळशेज घाटाकडं जाणारा भाजीपाल्याचा टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक होऊन तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कल्याण-नगर माहामार्गावरील माळशेज घाट परिसरातील भोरांडे गाव हद्दीतील महामार्गावर घडली. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली. अक्षय शांताराम दिघे (वय 30) आणि त्यांची पत्नी तेजस दिघे (वय 26), तसंच दत्तात्रय वामन (वय 42) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत.


नेमकं काय घडलं? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय आणि तेजस हे जुन्नर गावात राहणारे होते. शुक्रवारी (3 मे) सकाळी दत्तात्रय दुधाचा टँकर घेऊन कल्याणच्या दिशेनं निघाले होते. यावेळी त्यांच्यासह दुधाच्या टँकरमधून मृतक पती पत्नी देखील प्रवास करीत होते. दुपारी माळशेज घाट परिसरातील भोरांडे गाव हद्दीतील महामार्गावर दुधाच्या टँकरची आणि भाजीपाला टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दुधाचा टँकर महामार्गालगतच्या 40 ते 60 फूट खोल नाल्यात कोसळला. तसंच यावेळी टेम्पोचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या दुर्घटनेत दुधाच्या टँकरमधील तिघांचा मृत्यू तर टेम्पोमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच, माळशेज घाट पोलीस, टोकावडे पोलीस, उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे, टोकावडे पोलीस निरीक्षक दिनकर चकोर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना तातडीनं टोकावडे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


टेम्पो चालकावर गुन्हा दाखल : या अपघातासंदर्भात टोकावडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर चकोर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितलं की, "दुधाचा टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या 40 ते 60 फूट खोल नाल्यात पडला, यात अक्षय शांताराम दिघे आणि त्यांची पत्नी तेजस यांचा मृत्यू झाला. मृतक अक्षय हा पोलीस कर्मचाऱ्याचा भाऊ आहे. तसंच या प्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर तिघांचे मृतदेह मुरबाड शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेत. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे,"

हेही वाचा -

  1. Nagar Kalyan Highway Accident : नगर कल्याण महामार्गावर एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक; अनेक प्रवासी जखमी
  2. Bus Truck Accident : माळशेज घाटात भरधाव बस व ट्रकची समोरासमोर धडक; 15 प्रवासी गंभीर जखमी
  3. Accident At Malshej Ghat: माळशेज घाटात भीषण अपघात! इनोव्हा आणि पिकअपच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.