ETV Bharat / state

शून्यातून विश्व निर्माण करून वडिलांच्या पायी ठेवेल, तीच माझी सेवा असेल-सुप्रिया सुळे

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 5:45 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी हे नवं चिन्ह मिळाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी पक्षाचे नाव आणि चिन्हे गेल्यानं सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. सत्ताधाऱ्यांविरोधात नव्यानं लढणार असल्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला. त्या बारामतीत आज माध्यमांशी बोलत होत्या.

MP Supriya Sule in Pune
सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे विरोधकांना टोला लगावताना

बारामती (पुणे) : '' पक्ष स्थापन करणाऱ्या संस्थापक अध्यक्षाकडून तो हिसकावून दुसऱ्याला देण्याची घटना या देशात पहिल्यांदाच घडली. अर्थात यामागं देश चालविणारी अदृश्य शक्ती आहे. या शक्तीनं आम्हाला कितीही धमकावलं. अन्याय अथवा घात केला तरी त्यांच्या विरोधातील आमची लढाई सुरूच राहील'', असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

खासदार सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, ''हा देश डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालला पाहिजे. मात्र, आता हा देश अदृश्य शक्ती स्वतःच्या मर्जीनं चालवताना दिसत आहे. अशी परिस्थिती असली तरी आमचा संघर्ष सुरूच राहील. सर्वोच्च न्यायालयातील लढ्यात त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, शरद पवारांना पक्ष आणि चिन्ह देता कामा नये. परंतु, सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं की, या देशात लोकशाही आहे. चुकीच्या पद्धतीनं चिन्ह काढून घेतल्यानं शेजारच्या देशात काय परिस्थिती निर्माण झाली, तुम्ही पाहत आहात. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या या निकालाबद्दल आम्ही त्यांचं आभार व्यक्त करतो.''

शून्यातून सुरुवात करून उभे राहू: खासदार सुळे म्हणाल्या, ''या देशात वकील किंवा अन्य कोणाची मनमानी चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाची ऑर्डर आम्ही तात्काळ निवडणूक आयोगाला दिली. मेरिटनुसार आम्हाला मूळ पक्ष आणि घड्याळ चिन्ह मिळणं अपेक्षित होतं. परंतु, अदृश्य शक्तीच्या मनमानीमुळे ते मिळालं नाही. तरीही आम्ही घाबरणार नाही. शून्यातून सुरुवात करून उभे राहू. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष आणि नवीन तुतारी चिन्ह यापुढे काय करेल तुम्ही पाहाल''.

मनोहर जोशींना वाहिली श्रद्धांजली: शिवसेनेचे नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ''ठाकरे, पवार, जोशी, महाजन, मुंडे या परिवाराचे राजकीय विचार वेगळे होते. परंतु, कौटुंबिक जिव्हाळा कायम आहे'', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.


तुतारी घरोघरी पोहोचवू : "आता एक तुतारी घेणारा माणूस घेऊन फिरणार आहेत. नवीन मिळालेले चिन्ह घरोघरी पोहोचविणार आहोत. जरी माझ्या वडिलांचा पक्ष आणि चिन्ह काढून घेतलं असलं तरी शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद आमच्यात आहे. ते विश्व निर्माण करून मी माझ्या वडिलांच्या पायाजवळ नेऊन ठेवेल. तीच माझी सेवा असेल. जेव्हा संघर्षाची वेळ येईल तेव्हा या सुप्रियासारखी प्रत्येक घरात सुप्रिया कुटुंबाच्या बाजूनं उभा राहील. बहिण नेहमीच त्याग करत असते. कुटुंबासाठी नेहमी एक पाऊल मागे घेते, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेसाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत.

हेही वाचा:

  1. "येणाऱ्या काळात एकट्याची... "; पंकजा मुंडेंचा इशारा कोणाला?
  2. शरद पवार यांनी 'तुतारी' हे चिन्ह विरोधकांना वाजवण्यासाठी घेतलं असावं- वडेट्टीवार
  3. "संकटकाळातही बाळासाहेबांच्या सोबत असणारे एकनिष्ठ शिवसैनिक"; मनोहर जोशींना उद्धव ठाकरेंची श्रद्धांजली, बुलडाणा दौरा अर्धवट सोडून मुंबईला रवाना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.