ETV Bharat / state

मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विशेष अधिवेशनात मोठी घोषणा होण्याची शक्यता

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 8:18 PM IST

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातून उद्याचा (20 फेब्रुवारी) दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारकडून विशेष अधिवेशनाची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानं मराठा आरक्षणासंदर्भात उद्या होणाऱ्या एक दिवशीय विशेष अधिवेशनात मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

special session of legislature regarding maratha reservation Shambhuraj Desai says tomorrow decision will be historic
मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार? विशेष अधिवेशनात मोठी घोषणा होण्याची शक्यता

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनासंदर्भात शंभूराज देसाई यांनी केलं भाष्य

मुंबई Maratha Reservation : मराठा आरक्षण अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी, यात कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 10 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केलीय. कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र देण्यात यावेत. तसंच, 'सग्यासोयऱ्यां'संदर्भात अधिक स्पष्टता आणावी, अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे.

  • या उपोषणादरम्यान त्यांची तब्येत खालावत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी 20 फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचं एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलविण्यात आलं आहे. त्यामुळं या अधिवेशनात मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

राज्यपालांच्या अभिभाषणानंतर अधिवेशनाला सुरुवात : 20 फेब्रुवारीला मराठा आरक्षणासंदर्भात एक दिवसीय विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आलं आहे. या अधिवेशनात राज्य मागास आयोगानं राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालावर चर्चा केली जाणार आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राज्य मंत्रिमंडळाची बैठकीला सुरुवात होऊन बैठकीमध्ये राज्य मागास आयोगाचा अहवाल सादर करून एकमतानं निर्णय घेतला जाईल. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यपालांच्या अभिभाषणानंतर अधिवेशनाला सुरुवात होईल.

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवेदन सादर करतील : मराठा आरक्षण विधेयक आणि सगेसोयरे संदर्भातील अधिसूचना सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल. त्यानंतर दोन्ही सभागृहात याविषयी चर्चा केली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात निवेदन सादर करतील. त्यानंतर एक दिवशीय अधिवेशनाचा समारोप होईल.


    अधिवेशन ऐतिहासिक होईल : या अधिवेशनासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, "मराठा आरक्षणाच्या संदर्भातील उपसमिती मंत्र्यांची आज बैठक बोलावली आहे. कोणत्याही कायद्याच्या चौकटीत मराठा आरक्षण अडकायला नको, याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळं उद्याचा निर्णय हा ऐतिहासिक असेल", असा विश्वास शंभूराज देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

मनोज जरांगे पाटलांचा इशारा : 'सगेसोयरें'संदर्भात 20 फेब्रुवारीला अंमलबजावणी केली नाही, तर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू. तसंच जर सगेसोयरेंबाबत भूमिका स्पष्ट झाली नाही तर लगेच आंदोलनाची घोषणा करण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. त्यानंतर 21 तारखेला नियोजनबद्ध आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय.

हेही वाचा -

  1. मराठा आरक्षणासंदर्भात विधिमंडळाचं एक दिवसीय विशेष अधिवेशन - मुख्यमंत्री
  2. मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन - भुजबळ
  3. शिवनेरीवरून मराठा आरक्षणाबाबत मोठं अपडेट, जाणून घ्या काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.