ETV Bharat / state

शिर्डी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिष्ठा पणाला; उमेदवारीवरून राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 7:50 PM IST

साईसंस्थानासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी प्रसिद्ध आहे. येथे अहमदनगर आणि शिर्डी असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी अहमदनगर खुल्या प्रवर्गासाठी तर शिर्डी अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. असं असलं तरी आगामी लोकसभी निवडणुकीत अहमदनगरमध्ये भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील आणि शिर्डीत शिवसेनात शिंदे गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Ahmednagar and Shirdi
अहमदनगर

शिर्डी (अहमदनगर): शिर्डी लोकसभा (38) मतदारसंघात अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, नेवासे असे सहा विधानसभा मतदारसंघ आहे. या लोकसभा मतदारसंघाची लोकसंख्या 14 लाख 59 हजार 712 इतकी आहे. यात आता वाढ झालेली आहे.

काय आहेत शिर्डीतील जातनिहाय समीकरणे? शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात मराठा समाजाचं प्राबल्य आहे. अकोले विधानसभा आदिवासी बहुल असून अनुसूचित जमातीसाठी राखीव तर श्रीरामपूर विधानसभा अनुसूचित जातीकरिता राखीव आहे. त्यामुळे आदिवासी, मागासवर्गीय मतदारसंख्या 20 टक्क्यांच्या आसपास, मुस्लिम 7 टक्क्यांच्या आसपास लोकसंख्या आहे. ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख हा समाज अत्यल्प आहे. मात्र, हिंदू समाज बहुसंख्येनं आहे. राखीव विधानसभा मतदारसंघ वगळता संगमनेर, कोपरगाव, राहाता, नेवासे मतदारसंघात मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी आहेत.


शिर्डी मतदारसंघात कोणत्या पक्षाचं वर्चस्व आहे? शिर्डी लोकसभा मतदारसंघ 2008 साली पुनर्रचनेत अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. तत्पूर्वी या मतदारसंघात एखादा अपवाद वगळता काँग्रेस पक्षाचेच वर्चस्व दिसून येते. दिवंगत बाळासाहेब विखे, दिवंगत शंकरराव काळे यांनी मतदारसंघ खुला असताना प्रतिनिधित्व केले. मात्र, मतदारसंघ राखीव झाल्यानंतर 2009 पासून मतदारसंघावर शिवसेना पक्षाचे वर्चस्व राहिले. 2009 भाऊसाहेब वाकचौरे, 2014 आणि 2019 सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेचे प्रतिनिधित्व केलेले आहेत. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत गेले आहेत. मतदारसंघ राखीव असला तरी मंत्री राधाकृष्ण विखे आणि माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचा पाठिंबा निवडून येण्यासाठी गरजेचा असतो.

विद्यमान खासदार कोणत्या पक्षाचे आहेत? 2019 ला शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले. त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव केला.


गेल्या 2019 निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी काय होती ?
1) सदाशिव लोखंडे (शिवसेना) 4 लाख 86 हजार 820 (47 टक्के) विजयी
2) भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस) 3 लाख 66 हजार 625 (35 टक्के) पराभूत
3) संजय सूरदान (वंचित) 63 हजार 287 (6 टक्के) पराभूत


सध्या कोण कोण प्रमुख दावेदार आहेत? शिवसेना शिंदे गटातून खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह माजी मंत्री बबनराव घोलप, माजी प्रशासकीय अधिकारी नितीन उदमले हे सध्याचे दावेदार सांगितले जात आहेत. तर शिवसेनेच्या उबाठा पक्षातून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री बबनराव घोलप, अभ्युदय बँकेचे अध्यक्ष संदीप घनदाट तर काँग्रेस पक्षातून उत्कर्षा रुपवते हे प्रबळ दावेदार सांगितले जात आहेत.

'या' आहेत मतदारसंघातील समस्या: शेतीचा पाणी प्रश्न, औद्योगिकरणाचा अभाव त्यामुळे रोजगार, रस्ते, धरण, पाणी कालवे, शिर्डी आणि शनिशिंगणापूर धार्मिक पर्यटन विकास चालना, आदिवासी विकास/पर्यटन चालना, समन्यायी पाणी वाटप धोरणामुळे बारमाही शेती साठी कमी पडत असलेले पाणी, फळबाग शेती विकासाला चालना ह्या या मतदार संघातील समस्या आहेत. शिर्डी लोकसभा ग्रामीण मतदारसंघ आहे. तालुक्याची असलेली ठिकाणे संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगाव या ठिकाणी अनेक नागरी सुविधांचा अभाव आहे.



अहमदनगरमध्ये या विधानसभांचा समावेश: अहमदनगर लोकसभा (37) मतदारसंघात नगर शहर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, शेवगाव-पाथर्डी, राहुरी असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. या लोकसभा मतदारसंघाची लोकसंख्या 18 लाख 54 हजार 248 (2011 च्या जनगणना आणि 2019 निवडणुकीच्या अनुषंगाने) आहे. यात सध्या वाढ झालेली आहे.


अहमदनगर लोकसभा मतदारसंघात जातनिहाय समीकरणे काय आहेत? अहमदनगर लोकसभा मतदारसंघ खुला मतदारसंघ आहे. मतदारसंघात मराठा जातीचे प्राबल्य आहे. त्याच बरोबर माळी, वंजारी, धनगर, मुस्लिम, मागासवर्गीय मतदारसंख्या प्रभावी आहे. मुस्लिम 7 टक्क्यांच्या आसपास लोकसंख्या आहे. ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख हा समाज अत्यल्प आहे. मात्र मराठा, हिंदू समाज बहुसंख्येने आहे. लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी आहेत.


अहमदनगर मतदारसंघात कोणत्या पक्षाचे वर्चस्व आहे? अहमदनगर लोकसभा मतदारसंघ 2008 साली पुनर्रचनेत खुला प्रवर्गतच राहिला. तत्पूर्वी या मतदारसंघात 2004-2009 वगळता काँग्रेस पक्षाचं प्राबल्य राहिलं. मात्र, 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत दिवंगत दिलीप गांधी तर 2019 ला डॉ. सुजय विखे असे तीन टर्म भाजपाचे उमेदवार निवडून आले. एकूणच गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. युतीमध्ये भाजपा तर आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात लढत होत आली आहे. सध्या महायुतीतील नगर शहर, पारनेर इथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तर श्रीगोंदा, शेवगाव-पाथर्डीत भाजपाचे असे चार आमदार आहेत. कर्जत-जामखेड आणि राहुरीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत. जिल्ह्यातील विखे आणि थोरात या दोन नेत्यांचा प्रभाव मतदारसंघावर दिसून येतो.

अहमदनगरमध्ये विद्यमान खासदार कोणत्या पक्षाचे आहेत? 2019 ला काँग्रेस पक्षातून ऐनवेळी भाजपामध्ये आलेले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे पुत्र डॉ. सुजय विखे हे निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार संग्राम जगताप यांचा पराभव केला.


2019 लोकसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी काय होती?
1) डॉ. सुजय विखे (भाजप) 7 लाख 04 हजार 660 मते (58.54 टक्के) विजयी
2) आमदार संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस) 4 लाख 23 हजार 186 मते (35.15 टक्के) पराभूत
3) सुधाकर आव्हाड (वंचित बहुजन आघाडी) 31 हजार 807 मते (2.64 टक्के) पराभूत


सध्या कोण प्रमुख दावेदार आहेत? भाजपाकडून विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे हे प्रमुख दावेदार आहेत. भाजपाचे विधानपरिषद सदस्य माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. पक्षानं उमेदवारी दिल्यास आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे राम शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे. महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी तसेच त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचं सांगितलं आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटातर्फे अद्याप उमेदवार घोषित झालेला नाही. तरी देखील कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, राहुरीचे आमदार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे उमेदवार असू शकतात.


'या' आहेत अहमदनगर मतदारसंघातील समस्या? शेतीचा पाणी प्रश्न-सिंचन, अहमदनगर, सुपा एमआयडीसीचे औद्योगिकरण, विस्तार आणि विकास, रोजगार, रस्ते, धरण पाणी कालवे, नगर-मनमाड महामार्गाचे रखडलेले काम, नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे सेवेसाठी रखडलेली परवानगी या समस्या प्रमुख आहेत. यासह परळी-बीड-नगर, नगर-कल्याण माळशेज रेल्वेची आग्रही मागणी केली जात आहे. अहमदनगर लोकसभा ग्रामीण मतदारसंघ आहे. जिल्ह्याचे अहमदनगर हे मुख्यालय आहे. तसेच मतदारसंघातील तालुक्यांच्या ठिकाणी नागरी सुविधांचा अभाव आहे.

हेही वाचा:

  1. शून्यातून विश्व निर्माण करून वडिलांच्या पायी ठेवेल, तीच माझी सेवा असेल-सुप्रिया सुळे
  2. शरद पवार यांनी 'तुतारी' हे चिन्ह विरोधकांना वाजवण्यासाठी घेतलं असावं- वडेट्टीवार
  3. "येणाऱ्या काळात एकट्याची... "; पंकजा मुंडेंचा इशारा कोणाला?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.