ETV Bharat / state

रामनवमी उत्सव 2024 : साईबाबांच्या शिर्डीत रामनवमी उत्सवाला मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात - Ram Navami 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 16, 2024, 1:41 PM IST

Ram Navami festival
Ram Navami festival

Ram Navami 2024 : शिर्डीतील साई बाबांच्या मंदिरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत देशभरातून नागरिक साईचरणी लिन होण्यासाठी येतात.

शिर्डी Ram Navami 2024 : साईबाबांच्या रामनवमी उत्सवाला आज पहाटेच्या काकड आरतीनं सुरुवात झाली. आजपासून तीन दिवस साईबाबांच्या शिर्डीत रामनवमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी साईची प्रतिमा, पादुका आणि साईचरित्राची सवाद्य मिरवणूक द्वारकामाईत पोहचल्यानंतर अखंड साईचरित्र पठणास सुरुवात झाली आहे.

Ram Navami 2024
साईबाबांच्या शिर्डीत रामनवमी उत्सवाला सुरुवात

काकड आरतीनं उत्सवाची झाली सुरुवात : आज उत्सवाची सुरुवात पहाटे साईंच्या काकड आरतीनं झाली. परंपरेप्रमाणं साई मंदिरातून साईंची प्रतिमा, विणा आणि पोथीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी पोथी आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी यांनी वीणा आणि उपमुख्यकार्यकरी अधिकारी तुकाराम हुलवले हे प्रतिमा घेऊन सहभागी झाले. वाजत गाजत ही मिरवणूक द्वारकामाईत पोहचल्यानंतर इथं साईचरित्राच्या अखंड पारायणास सुरुवात करण्‍यात आली. यावेळी प्रथम अध्यायाचं वाचन तदर्थ समितीचे सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केलं. हे पारायण उद्या सकाळपर्यंत सुरु राहणार आहे.

Ram Navami 2024
साईबाबांच्या शिर्डीत रामनवमी उत्सवाला सुरुवात

रामनवमीला भाविक पालख्या घेऊन होतात दाखल : उद्या रामनवमीचा मुख्य दिवस असल्यानं उत्सवासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक पायी पालख्या घेऊन शिर्डीत दाखल होतात. रामनवमी उत्सव आणि पालखीचं एक वेगळ नातं असल्यानं या उत्सवासाठी खास करुन मुंबईहुन मोठ्या प्रमाणात पालख्या दाखल होतात. पंधरा दिवसांचा पायी प्रवास करुन शिर्डीत येऊन साईंच्या दर्शनासाठी भाविक आतूर झालेला असतो. 113 वर्षांची परंपरा असणारा हा उत्सव आजही तितक्याच उत्साहानं साजरा केला जातोय.

रामनवमी उत्सवाला 1911 पासूनचा इतिहास : शिर्डीतील रामनवमी उत्सव हा शके 1833 म्हणजेच १९११ साली सुरु झाला. प्रथम हा उत्सव उरुसापोटी जन्माला आला. त्यावेळी केवळ मोठ्या प्रमाणात उरुसच शिर्डीत भरत असे. मात्र साईभक्त भिष्म यांनी हा उरुस रामनवमी उत्सव म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची साईबाबांना विनंती केली. तेव्हापासून साईबाबांच्या आज्ञेनंच भिष्म आणि गोपाळराव गुंड या भाविकांनी रामनवमी उत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला. तेव्हापासून आजपर्यंत ही पंरपरा आणि हा उत्सव सुरु आहे.

रामनवमीला काढली जाते शिर्डीतून मिरवणूक : रामनवमी उत्सवाचं महत्व मोठं असल्यानं या उत्सवात सहभागी होण्यासाठी भाविकांची मांदीयाळी देशभरातून शिर्डीत जमते. अषाढीचे वेध लागले की वारकऱ्यांची दिंडी ज्या प्रमाणं पंढरपुरकडं निघते, त्याचप्रमाणं रामनवमीसाठी साईभक्तांच्या पायी पालख्या शिर्डीकडं येतात. मुंबई, पुणे, अहमदाबाद, सूरत या राज्यातील प्रमुख शहारांच्या बरोबरीनंच अनेक गावातूनही शिर्डीला भाविक पायी चालत येतात. पायी चालत आलं की आपली दुखं, संकट दूर करुन आपल्या मनोकामना साईबाबा पूर्ण करतात, अशी भाविकांचा श्रद्धा असते. साई नामाच्या गजरानं संपूर्ण शिर्डी दुमदुमुन गेली. आज उत्सवाचा पहिला दिवस असल्यानं रात्री साईंच्या पालखीची गावातून मिरवणूक काढली जाणार आहे. उत्सवाच्या निम्मीतानं साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली. साई मूर्तीलाही विविध अलंकारांनी सजवण्यात आलं आहे.

हेही वाचा :

  1. शिर्डीतील रामनवमी उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; पाहा ग्राऊंड रिपोर्ट - Ram Navami 2024
  2. श्रीरामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार - Sai Sansthan Shirdi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.