राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा; लालबागचा राजा मंडळाला राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण

author img

By ETV Bharat Marathi Desk

Published : Jan 21, 2024, 4:29 PM IST

Ram Mandir Ayodhya

Ram Mandir Ayodhya : प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा उद्या अयोध्येत होत आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाला निमंत्रण देण्यात आलं आहे.

मुंबई Ram Mandir Ayodhya : अयोध्येत प्रभू श्री राम मंदिरात प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देण्यात आलंय. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे विभागीय संघचालक रविंद्रभाई संघवी यांच्याकडून हे निमंत्रण लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना शनिवारी देण्यात आलं आहे.

लालबागचा राजाला राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचं निमंत्रण : जगप्रसिद्ध असलेल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देखील अयोध्येत उद्या होणाऱ्या भव्य दिव्य अशा प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. हे निमंत्रण राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे विभागीय संघचालक रविंद्रभाई संघवी यांच्या हस्ते शनिवारी देण्यात आल्याची माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली आहे.

भारतीयांसाठी सुवर्णक्षण असणार आहे सोहळा : अयोध्येतील रामलल्लाच्या मंदिराचं उद्घाटन आणि प्रभू श्री रामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा हा प्रत्येक भारतीयासाठी एक अनोखा सोहळा असणार आहे. उद्या 22 जानेवारीला हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील मंदिराचं उद्घाटन आणि श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची वेळ जवळ आली आहे. प्रत्येक भारतीयांसाठी हा सोहळा म्हणजे सुवर्णक्षण असणार आहे.

मंडळाच्या कार्यालयात घेतली भेट : विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आणि मानद सचिव सुधीर साळवी यांची शनिवारी लालबाग इथल्या मंडळाच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं त्यांनी निमंत्रण दिलं आहे. अयोध्येत होणाऱ्या या भव्य सोहळ्याचं मुंबईतील या एकाच गणेशोत्सव मंडळाला हे निमंत्रण देण्यात आलं आहे.

'लालबागचा राजा'ला सहभागी केल्यानं आनंद : "हा सोहळा सर्वांसाठी अलौकिक आणि आनंदाचा क्षण आहे. प्राणप्रतिष्ठापना उत्सव समितीनं यात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला सहभागी करून घेतलं, याचा आम्हाला खूप आनंद झाला," अशी माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली. "लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे हे या निमंत्रणाचा सन्मान राखत प्रभू श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत," असं देखील सुधीर साळवी यांनी सांगितलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.