साईबाबांना बांधली अनोखी राखी, 'ऑपरेशन सिंदूर' थीमवर असलेल्या राखीनं भाविकांचं लक्ष वेधलं
रक्षाबंधन सण साईबाबांच्या शिर्डीत मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. बहिणींनी साईंना राखी बांधत हा सण साजरा केला.

Published : August 9, 2025 at 12:15 PM IST
|Updated : August 9, 2025 at 2:41 PM IST
शिर्डी (अहिल्यानगर) : देशभरात रक्षाबंधन उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. शिर्डीतही मोठ्या भक्तिभावानं आणि आस्थेनं हा सण साजरा केला जातोय. रक्षाबंधननिमित्तानं अनेक भगिनी साईंना भाऊ मानत त्यांच्या दर्शनासाठी गर्दी करतात. बंधुराज असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्तीलाही राखी बांधण्यात आली. शनिवार, रविवार आणि राखी पौर्णिमा अशा सुट्ट्या जोडून आल्यानं शिर्डीत साईभक्तांची मोठी गर्दी झाली आहे.
पूजा करत राखी बांधली : रक्षाबंधन निमित्तानं साईभक्तांनी दिलेली राखी साईबाबांच्या मूर्तीच्या हाताला बांधली जाते. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं पूजन करून श्रींना राखी अर्पण केली.

35 किलो वजनाची राखी साईबाबांना अर्पण : छत्तीसगड राज्यातील बिलासपूर येथील साई भक्त परिवाराकडून 35 किलो वजनाची 36 फूट लांब व 5 फूट रुंद अशी राखी साईबाबांच्या चरणी समर्पित केली आहे. ही राखी कलाकार दिलीप दिवाकर पात्रीकर यांनी 10 दिवसांत बनवली असून, 'ऑपरेशन सिंदूर'च्या थीमवर आधारित ही राखी आहे. या राखीत पंधरा मान्यवरांच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला असून, यात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तिन्ही सेना प्रमुख तसेच ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह तसेच ऑपरेशन दरम्यान सैनिकांची काळजी घेणारे श्रवण सिंग यांचा फोटो लावण्यात आलाय.

राखी पाहण्यासाठी भक्तांची गर्दी : साई मंदिराच्या बाहेर ज्या ठिकाणाहून साईच्या मूर्तीचे खिडकीद्वारे साईभक्त दर्शन घेतात, त्या ठिकाणी ही राखी लावण्यात आली असून, आज साई दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी ही राखी विशेष आकर्षण ठरत आहे. अनेक साई भक्त ही राखी पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. तसंच फोटो घेण्यासाठीही येथे भक्तांची झुंबड उडाली आहे.

हेही वाचा -

