ETV Bharat / state

गर्भवती महिलेनं रुग्णालयात जाण्यापूर्वी बजावला मतदानाचा हक्क, समाजासमोर नवा आदर्श - lok sabha election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 10:09 PM IST

Lok Sabha Election : शिरुर लोकसभा मतदारसंघात मतदान झालं असून यात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला, गर्भवती महिला, तृतीयपंथीय, नवमतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. ज्येष्ठ नागरिकांची मतदानाप्रती असलेली जागरुता कमालीची असून त्यांनी सक्रीय सहभाग घेऊन मतदान केलंय.

गर्भवती महिलेनं रुग्णालयात जाण्यापूर्वी बजावला मतदानाचा हक्क
गर्भवती महिलेनं रुग्णालयात जाण्यापूर्वी बजावला मतदानाचा हक्क (ETV Bharat Reporter)


पुणे Lok Sabha Election : जिल्ह्यात पुणे, मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघात मतदान झालं असून यात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला, गर्भवती महिला, तृतीयपंथीय, नवमतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. ज्येष्ठ नागरिकांची मतदानाप्रती असलेली जागरुता कमालीची असून त्यांनी सक्रीय सहभाग घेऊन मतदान केलंय. भारत निवडणूक आयोगाच्यावतीनं मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांकरीता असलेल्या सुविधांमुळं त्यांना सुलभरित्या मतदान करता आलं.

अनेक वयोवृद्ध मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क : शिरुर विधानसभा मतदारसंघात पिंपळे जगताप केंद्रावर रखमाबाई दत्तोबा शेळके या 106 वर्ष वयाच्या, अनुसया काशिनाथ सोंडेकर या 105 वर्ष वयाच्या आजींनी टपाली मतदानाचा पर्याय न स्वीकारता मतदान केंद्रावर येऊन मतदान केलं. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात 98 वर्षांच्या विमला दत्तात्रय शिंगणे, पिंपरी विधानसभा मतदारसंघातील 98 वर्षाच्या लक्ष्मीबाई गराडे, 90 वर्षाच्या कलावती कांबळे यांनी मतदान केंद्रावर जावून मतदानांचा हक्क बजावला. तरुण मतदारांना लाजवेल, अशी इच्छाशक्ती त्यांच्या अंगी दिसून आली.

प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मतदान : शालू राठोड या प्रसूतीकरीता त्यांच्या माहेरी चाकण इथं गेल्या होत्या. त्यांचे नाव शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील मतदार यादीत असल्यानं त्यांनी प्रसूतीची तारीख 14 मे असताना देखील रुग्णालयात जाण्यापूर्वी मतदान करण्याची प्रशासनाकडं इच्छा व्यक्त केली. जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी सदर महिलेला चाकण येथून शिवाजीनगर येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथील मतदान केंद्रावर आणण्यासाठी विशेष रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. शालू राठोड यांनी दुपारी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्या येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात त्या प्रसूतीसाठी दाखल झाल्या.

मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांना सुविधा : ज्येष्ठ नागरिकांनी सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दी केली होती. जिल्ह्यातील तिन्ही मतदार केंद्रात हेच चित्र पहायला मिळालं. काही ज्येष्ठ व्यक्ती आपल्या प्रथम मतदान करणाऱ्या नातवंडांसह तर काही आपल्या वयोवृद्ध मित्रांसह मतदानाला आले. काही ठिकाणी प्रशासनातर्फे नेमलेल्या स्वयंसेवकांनी या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी सहकार्य केलंय. त्यांच्यासाठी व्हीलचेअरची देखील व्यवस्था केली होती. मतदान केंद्रावरील सुविधांबाबत या मतदारांनी समाधान व्यक्त केलं.

इतरांनी प्रेरणा घ्यावी : रखमाबाई, अनुसया आजी, शालू राठोड यांच्यासह दुर्धर आजारानं ग्रस्त असलेले नागरिक, दिव्यांग नागरिक मतदानासाठी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येतात. हे आपले मतदानाचे प्रेरणादूतच आहेत. अशा मतदारांकडून प्रेरणा घेऊन समाजातील सर्व पात्र मतदारांनी प्रत्येक निवडणुकीत मतदान करायला हवं, असं जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी सांगितलं. शालू राठोड यांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांची राष्ट्रीय कर्तव्याप्रती असणारी भावना इतरांनाही प्रेरक आहे. त्यांना प्रशासनाच्यावतीनं सहकार्य करण्यात आलं, असं उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे यांनी म्हटलंय.

हेही वाचा :

  1. लोकसभा निवडणुकीच्या ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५२.४९ टक्के मतदान - Lok Sabha election 2024 Phase 4
  2. कुठं भाऊ, कुठं सासरा, कुठं बाप; लोकसभा निवडणुकीत नेत्यांपेक्षा जास्त नात्यांची प्रतिष्ठा पणाला - Lok Sabha Election 2024
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.