ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीच्या ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५२.४९ टक्के मतदान - Lok Sabha election 2024 Phase 4

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 13, 2024, 6:41 AM IST

Updated : May 13, 2024, 5:48 PM IST

Etv Bharat
फाईल फोटो

17:47 May 13

लोकसभा निवडणुकीच्या ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५२.४९ टक्के मतदान

मुंबई Lok Sabha Election 2024: राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सूरुवात झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झालं आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणं

नंदुरबार - ६०.६० टक्के

जळगाव - ५१.९८ टक्के

रावेर - ५५.३६ टक्के

जालना - ५८.८५ टक्के

औरंगाबाद - ५४.०२ टक्के

मावळ - ४६.०३ टक्के

पुणे - ४४.९० टक्के

शिरूर - ४३.८९ टक्के

अहमदनगर- ५३.२७ टक्के

शिर्डी - ५२.२७ टक्के

बीड - ५८.२१ टक्के

17:34 May 13

गडचिरोलीत 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश

गडचिरोली lok Sabha Election 2024 : भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परीसरात झालेल्या भीषण चकमकीत गडचिरोली पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पेरिमिली दलमचे काही सदस्य भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात सध्या सुरू असलेल्या TCOC कालावधीत विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशानं तळ ठोकून असल्याची विश्वसनीय माहिती १३ मे रोजी सकाळी पोलीस विभागाला मिळाली. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी-६० च्या दोन तुकड्या तातडीनं परिसरात शोधासाठी दाखल करण्यात आल्या. पथकं परिसरात शोधमोहीम राबवत असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनीही नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यात तीन नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं.

15:50 May 13

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 11 मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी 42.35 टक्के मतदान

मुंबई Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात आज सकाळी 7 वाजतापासून मतदानाला सूरुवात झाली. दुपारी 3 वाजतापर्यंत राज्यात सरासरी सुमारे 42.35 टक्के मतदान झालं आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण 11 लोकसभा मतदार संघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणं

नंदुरबार - 49.91 टक्के

जळगाव - 42.15 टक्के

रावेर - 45.26 टक्के

जालना - 47.51 टक्के

औरंगाबाद - 43.76 टक्के

मावळ - 36.54 टक्के

पुणे - 35.61 टक्के

शिरूर - 36.43 टक्के

अहमदनगर- 41.35 टक्के

शिर्डी - 44.87 टक्के

बीड - 46.49 टक्के

15:21 May 13

वृत्तवाहिनीच्या पत्रकाराचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन

बीड Lok Sabha Election 2024 : मुंबई येथून वार्तांकनासाठी आलेले वृत्तवाहिनीचे पत्रकार वैभव विजय कनगुटकर (वय 48) यांचं बीडच्या अंबाजोगाईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन. लाईव्ह रिपोर्टिंग करुन आल्यानंतर तीव्र हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झाल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

14:19 May 13

११ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान

मुंबई - राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

नंदुरबार - ३७.३३ टक्के

जळगाव- ३१.७० टक्के

रावेर - ३२.०२ टक्के

जालना - ३४.४२ टक्के

औरंगाबाद - ३२.३७ टक्के

मावळ -२७.१४ टक्के

पुणे - २६.४८ टक्के

शिरूर- २६.६२ टक्के

अहमदनगर- २९.४५ टक्के

शिर्डी -३०.४९ टक्के

बीड - ३३.६५ टक्के

14:07 May 13

जालन्यात मतदान यंत्रांची अदलाबदल; आमदारानं थांबवलं मतदान

जालना : जालना लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 21.35% मतदान झालं. मात्र, मतदान सुरू असताना जालना शहरातील डबल जिम भागामध्ये मतदान यंत्रांची अदलाबदली झाल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांचे नाव खालीवर केल्याचा गंभीर आरोप जालना विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर केला आहे, आणि जोपर्यंत मतदान यंत्र सुरळीत जशाचे तसे करून देत नाही तोपर्यंत मतदान प्रक्रिया थांबवली असल्याची माहितीसुद्धा यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे.

13:01 May 13

सिरम ग्रुपचे CEO आदर पूनावाला यांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे : सिरम ग्रुपचे CEO आदर पूनावाला यांनी ह्यूममँकेनरी स्कूल सॅलिसबरी पार्क पुणे येथे मतदानाचा हक्क बजावला. या प्रसंगी श्रीनाथ भिमाले व वंदनाताई श्रीनाथ भिमाले उपस्थित होते.

12:44 May 13

शिरुरमधील मतदार मला खासदार करणारच - अमोल कोल्हे

पुणे : अजित पवारांनी मला आव्हान दिलं असलं तरी ते शिरूर लोकसभेत मतदान कुठं करणारेत, इथले 25 लाख मतदार मला खासदार करणार आहेत, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंनी व्यक्त केलाय.

11:42 May 13

राज्यातील ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी ७ वाजतापासून सूरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.५१ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

नंदुरबार - २२.१२ टक्के

जळगाव- १६.८९ टक्के

रावेर - १९.०३ टक्के

जालना - २१.३५ टक्के

औरंगाबाद - १९.५३ टक्के

मावळ -१४.८७ टक्के

पुणे - १६.१६ टक्के

शिरूर- १४.५१ टक्के

अहमदनगर- १४.७४ टक्के

शिर्डी -१८.९१ टक्के

बीड - १६.६२ टक्के

11:37 May 13

मुरलीधर मोहोळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे : पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा अधिकार बजावला. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, ते कर्तव्य बजावण्यासाठी मी मतदान केल्याच्या भावना मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या आहेत. मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलीसह पुण्यातील एमआयटी शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान केलं.

10:57 May 13

मतदानासाठी सिंगापूरहून पुण्यात आले मात्र नाव नसल्यानं मतदानाला मुकले, निवडणूक आयोगाचा घोळ

पुणे : पुण्यात मतदान करण्यासाठी बाहेर देशातूनसुद्धा नागरिक येत आहेत. परंतु, निवडणूक आयोगाच्या यादीतून नाव वगळल्याने या नागरिकांना मतदानाला मुकावे लागले आहे. श्रेयश कुलकर्णी यांनासुद्धा मतदानाचा हक्क पुण्यातून बजावता आला नाही, कारण त्यांचं मतदान यादीत नावच नाही. बाहेर देशातील लोकांना मतदान करता यावं अशी व्यवस्था इथल्या लोकांनी उभी करणं गरजेचे असल्याची भावना कुलकर्णी यांनी बोलताना व्यक्त केली.

10:47 May 13

पुण्यात दिग्गज मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे - सकाळच्या वेळेस नागरिक मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडत आहेत. पुण्यात राहत असलेले अनेक मराठी कलावंतांनी आज सकाळच्या वेळेस आपला मतदानाचा हक्क बजावला. पुण्यातील कोथरूड येथे मोठ्या प्रमाणावर मराठी कलावंत हे राहत असून, या मराठी कलावंतांनी सकाळच्या वेळेतच मतदानाचा हक्क बजावला. अभिनेत्री बेला शेंडे, सावली शेंडे, आनंद भाटे, मोहन आगाशे, अनिल नगरकर यांनी मतदान केलं.

10:43 May 13

माजी मंत्री के. सी. पाडवी यांनी केलं मतदान

नंदुरबार : माजी मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. महायुतीचे उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांनीही मुळ गावी मतदानाचा हक्क बजावला.

10:28 May 13

अमोल कोल्हे यांनी सहपरिवार बजावला मतदानाचा हक्क

amol kolhe
अमोल कोल्हेंनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी आपल्या परिवारासह नारायणगाव येथे मतदानाचा हक्क बजावला. महाविकास आघाडीचे अमोल कोल्हे विरुद्ध महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात हा सामना होत आहे.

10:10 May 13

पुण्यातील एमआयटी मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिकांना त्रास, अधिकारी सहकार्य करत नसल्याचा नागरिकांचा आरोप

पुणे : पुणे लोकसभेसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले. अनेक मतदान केंद्रामध्ये मतदारांचा उत्साह दिसत आहे. सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदारांनी रांगा लावल्या आहेत. मात्र, पुण्यातल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातील एमआयटी शाळेत ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. येथील अधिकारीसुद्धा आम्हाला सहकार्य करत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

09:53 May 13

चौथ्या टप्प्यातील 11 मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45% मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील मतदारसंघनिहाय मतांची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.

जळगाव - 6.14%

जालना - 6.88%

नंदुरबार - 8.43%

शिरूर - 4.97%

अहमदनगर - 5.13%

औरंगाबाद - 7.52%

बीड - 6.72%

मावळ - 5.38%

पुणे - 6.61%

रावेर - 7.14%

शिर्डी - 6.83%

09:33 May 13

पद्मश्री राहीबाई पोपेरेंनी बजावला मतदानाचा हक्क

rahibai popere
पद्मश्री राहीबाई पोपेरेंनी बजावला मतदानाचा हक्क

अहमदनगर : पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी आपला मतदानाचा हक्क अकोले तालुक्यातील कोंभाळणें या त्यांच्या जन्मगावी बजावला. रांगेत उभे राहून लोकशाहीचा आदर करत त्यांनी सन्मानपूर्वक आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावताना त्यांनी आपले पायातील जोडे मतदान केंद्राच्या बाहेर काढत लोकशाहीच्या या सर्वोच्च उत्सवात सहभाग नोंदवला. याप्रसंगी त्यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना "सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा" असं आवाहन केलं.

09:16 May 13

छत्रपती संभाजीनगरमधील दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

election vote
छत्रपती संभाजीनगरमधील दिग्गजांनी केलं मतदान

छत्रपती संभाजीनगर : सकाळी साडेसातच्या सुमारास महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे यांनी पैठण तालुक्यातील पाचोड येथे मतदान केलं. डॉ. कल्याण काळे यांनी पिसादेवी या गावात सहपत्निक आपला मतदानाचा हक्क बजावला. तर एम.आय.एम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी गोदावरी शाळेत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अजबनगर महानगरपालिका शाळा, ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी औरंगपुरा येथे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी समता नगर येथे आणि राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी खडकेश्वर येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.

08:45 May 13

रवींद्र धंगेकरांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे : महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. विजयी होण्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. रविवार पेठ येथील कमला नेहरू महापालिका शाळा येथे पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे.

08:34 May 13

मावळ मतदारसंघावर कंट्रोल रुमद्वारे लक्ष

पिंपरी-चिंचवड : मावळ लोकसभेतील मतदानाच्या संपुर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे ५० टक्के मतदान केंद्र वेब कास्टिंगद्वारे जोडली आहेत. आकुर्डी येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये कंट्रोल रूम स्थापित करण्यात आली असून, निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला संपुर्ण प्रक्रियेवर कंट्रोल रूममधून बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.

तसेच पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात देखील नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. समन्वयासाठी समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे हे देखील निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षामध्ये उपस्थित आहेत. या ठिकाणाहून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाशी समन्वय साधला जात आहे.

08:12 May 13

मी चार लाख मतांनी जिंकेन, रावसाहेब दानवेंना विश्वास

जालना : मी जिंकेन याचा मला 100% विश्वास आहे. ही माझी पहिली निवडणूक नाही. मी 8 निवडणुका लढवल्या आहेत आणि त्या जिंकल्या आहेत. यावेळी मी 4 लाख मतांनी जिंकेन. आम्हाला महाराष्ट्रात 45 जागा मिळतील आणि देशात 400 जागा पार करू, असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि जालना लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

08:00 May 13

विखे कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्क; थोरात कुटंबियांनीही केलं मतदान

शिर्डी : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी पत्नी धनश्री विखे यांच्यासह मतदान केलं. औक्षणानंतर डॉ. सुजय विखे, पत्नी धनश्री विखे, वडील राधाकृष्ण विखे पाटील आणि आई शालिनीताई विखे यांनी गावाचे ग्रामदैवत म्हसोबा मंदिरात जावून दर्शन घेतलं. दर्शनानंतर लोणी बुद्रुक येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर प्राथमिक व माध्यमिक महाविद्यालयात जावून विखे कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला.

07:42 May 13

पैसे वाटप प्रकरणी संजय राऊतांनी केला व्हिडिओ पोस्ट

पैसे वाटप प्रकरणी खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ पोस्ट केलाय.

संजय राऊतांची पोस्ट -

मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण!

नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस...

दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहात आहेत?

यातून कोणता माल नाशिकला पोहचला?

निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे.

07:24 May 13

प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात

चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. पुण्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नीकडून धंगेकर यांचं औक्षण करण्यात आलं.

06:52 May 13

मुंबईला लुटणार्‍या घोटाळेखोरांना जाब विचारण्यासाठी ही निवडणूक महत्वाची - देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी शेयर केलेली पोस्ट -

आज मुंबईतील मराठी माणूस बेघर झाला, त्याला वसई-विरारला जाऊन राहण्याची वेळ आली. हे कोविड काळात लोकांची सेवा करण्याचे सोडून घोटाळे करण्याचे काम करत होते. गरिबांच्या खिचडीमध्ये पैसे कमावणारे आणि दुर्दैवाने मरण पावणाऱ्या लोकांच्या कफनात देखील घोटाळा करणारे हे 'खिचडी आणि कफन चोर' आहेत. हजारो लोक मरण पावले, परंतु यांनी ऑक्सीजनमध्येही घोटाळा केला.

ही निवडणूक साधी निवडणूक नाही, ज्यांनी मुंबईकरांना नागवले, मुंबईकरांच्या जिवावर स्वतःची संपत्ती केली, अशांना जाब विचारायची निवडणूक आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुंबईच्या सर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण आम्ही सुरू केले. आधी पावसाळा आला की मुंबईच्या खड्ड्यांवर केवळ चर्चा व्हायच्या. दरवर्षी रस्ते बनवण्याच्या नावाखाली यांनी गरिबांचे पैसे खाल्ले. कोस्टल रोड पासून अटल सेतुपर्यंत आम्ही अनेक प्रकल्पांची निर्मिती केली, पण उद्धव ठाकरे यांनी तयार केलेल्या अशा एका तरी आयकॉनिक प्रकल्पाचे नाव सांगावे.

06:04 May 13

लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरू

मुंबई Lok Sabha Election 2024 Phase 4 : देशासह राज्यात आज (13 मे) लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. राज्यातील 11 मतदारसंघामध्ये निवडणूक होत आहे. जळगाव, नंदुरबार, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, पुणे, शिरुर, शिर्डी, बीड आणि औरंगाबाद या 11 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत टक्कर : महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. यात 11 मतदारसंघांचा समावेश आहे. विशेष म्हणजे पुणे, बीड, अहमदनगर, शिरुर, शिर्डी आणि औरंगाबाद या मतदारसंघाकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. पुण्यात मतदानाच्या एक दिवस आधीच महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये राडा झाला. पैसे वाटप केल्याचा आरोप करत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ठिय्या दिला होता. तर तिकडं बीडमध्येही बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांच्यासमोर कडवं आव्हान दिलंय. बीडमध्ये मराठा फॅक्टरही महत्त्वाचा असणार आहे. तर शिर्डीमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी टक्कर होत आहे.

हेही वाचा -

  1. मतदान कसं करायचं माहिती आहे का? जाणून घ्या, A टू Z स्टेप्स - Lok Sabha Election 2024
  2. तुमचं मतदान कार्ड हरवलंय? काळजी करू नका, 'ही' ओळखपत्र सोबत ठेवून करू शकतात मतदान - Lok Sabha Election 2024
  3. लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात; महाराष्ट्रातील 'या' दिग्गज नेत्यांमध्ये होणार 'टाईट-फाईट' - Lok Sabha Elections 4th Phase
Last Updated :May 13, 2024, 5:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.