ETV Bharat / state

शरद पवार गटातदेखील गटबाजी? कार्यकर्ता मेळाव्याचं खासदार श्रीनिवास पाटलांना निमंत्रण नाही!

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 8:34 PM IST

NCP Political crisis लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात सोमवारपासून (५ फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे कार्यकर्ता मेळावे सुरू होत आहेत. परंतु मेळाव्याच्या बॅनरवर विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, (MP Srinivas Patil) त्यांचे पुत्र सारंग पाटील यांचा फोटो नाही. दोघांना मेळाव्याचं निमंत्रणदेखील दिलेलं नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत सारंग पाटील यांनी

MP Srinivas Patil
खासदार श्रीनिवास पाटलांना निमंत्रणच नाही

सातारा NCP Political crisis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी जोरदार जाहिरातबाजी करण्यात आली आहे; परंतु जाहिरातीमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील तसेच यंदा इच्छुक असणारे त्यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीच्या माहिती तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांना डावलल्याचं समोर आलं आहे. (Sarang Patil) यामुळे श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीला शरद पवार गटांतर्गत विरोध असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.

NCP Worker Meeting
राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे हेच ते बॅनर

खासदारांना मेळाव्याचं निमंत्रणच नाही: सोमवारी पाटणमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे. यावेळी माजी सहकार मंत्री तथा कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या मेळाव्याची जाहिरात करण्यात आली आहे. मात्र जाहिरात बॅनरवर विद्यमान खासदारांचा फोटो नाही. तसेच त्यांना निमंत्रण दखील नसल्याचं समजते.

श्रीनिवास पाटलांना कार्यकर्त्यांचा विरोध? लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची मोर्चेबांधणी आणि संघटना बांधणीच्या दृष्टीनं हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच उमेदवारीच्या संदर्भानं या मेळाव्यातून काही संकेत मिळणार आहेत. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे वयोमानामुळे यावेळी निवडणूक लढविण्यास इच्छुक नाहीत. ते आपला मुलगा सारंग पाटील यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. तथापि, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील अनेक नेत्यांचा खासदार श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटील यांच्या उमेदवारीला विरोध असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

गांभीर्यानं घ्यायचं कारण नाही- खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील हे ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, " शरद पवार गटांतर्गत गटबाजी अथवा वाद नाहीत. खासदार श्रीनिवास पाटील साहेब सध्या दिल्लीत आहेत. ते इथं नसल्यामुळे उपस्थित राहू शकणार नाहीत. तसेच प्रदेशाध्यक्षांचा दौरा सुद्धा अचानकच ठरलाय. सोशल मीडियावर कोणी काही पोस्ट केली तरी त्याला गांभीर्यानं घ्यायचं कारण नाही. आम्ही सगळे जण एक आहोत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या माहिती-तंत्रज्ञान सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी दिली.

विरोध असतानाही श्रीनिवास पाटलांचा विजय: राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर शरद पवारांच्या आदेशानुसार सनदी अधिकारी पदाचा राजीनामा देऊन श्रीनिवास पाटील यांनी १९९९ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करून खळबळ माजवली होती. २०१९ ला राष्ट्रवादीतून निवडून आल्यानंतर उदयनराजेंनी तीनच महिन्यात राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शरद पवारांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना उभं केलं. त्यांच्या प्रचारासाठी भर पावसात सभा घेऊन विजय खेचून आणला. त्यावेळी देखील श्रीनिवास पाटलांना राष्ट्रवादीतून अंतर्गत विरोध होता. परंतु पवारांच्या आदेशामुळे सर्व नेत्यांनी एकदिलानं काम करून त्यांना निवडून आणलं होतं.

श्रीनिवास पाटलांना डावलण्याचं काम: काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात घडणाऱ्या घडामोडी आणि नियोजित कार्यक्रमांमध्ये खासदार श्रीनिवास पाटील यांना जाणीवपूर्वक डावलले जात आहे. लोकसभा मतदार संघातील प्रत्येक तालुक्याला आणि स्वपक्षीय आमदारांना भेदभाव न करता फंड दिला आहे. मग असे काय घडले आहे की, त्यांना बाजूला ठेवले जात आहे. सर्व नेते एक विचारानं राहिले तरच पक्षाला गतवैभव येईल. नाहीतर आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्या सारखं होईल, असे मेसेज काही कार्यकर्ते सोशल मीडियावर टाकत आहेत. यावरून सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटांतर्गत सर्व काही आलबेल नसल्याचंच दिसत आहे.

हेही वाचा:

  1. परराष्ट्र मंत्रालयातील कर्मचाऱ्याला यूपी एटीएसनं केली अटक; आयएसआयसाठी काम केल्याचा आरोप
  2. छगन भुजबळांना रामदास आठवलेंनी दिली 'RPI' प्रवेशाची ऑफर
  3. टेकलगुडेममध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा, नक्षलवाद्यांनी जारी केले फोटो
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.