ETV Bharat / state

गुंतवणूकदारांना 100 कोटींचा गंडा : सीए अंबर दलाल विरोधात मुंबई पोलिसांनी जारी केलं लुक ऑउट सर्कुलर - LOC Against CA Amber Dalal

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 2:54 PM IST

LOC Against CA Amber Dalal : गुंतवणूकदारांना 100 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा चुना लावणाऱ्या सीए अंबर दलाल याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी लुक आउट सर्कुलर जारी केलं आहे. मुंबईतील फॅशन डिझायनर बबीता मलकानी यांना अंबर दलाल यानं 54 कोटी रुपयाचा चुना लावला होता.

LOC Against CA Amber Dalal
सीए अंबर दलाल

मुंबई LOC Against CA Amber Dalal : एक हजार गुंतवणूकदारांना 100 कोटींपेक्षा अधिक गंडा घालणाऱ्या सीए विरोधात मुंबई पोलिसांनी लुक आउट सर्कुलर (LOC) काढलंय. अंबर दलाल असं लुक ऑऊट सर्कुलर काढण्यात आलेल्या सीएचं नाव आहे. फॅशन डिझायनर बबीता मलकानी यांनी त्यांना अंबर दलाल यानं 54 कोटींचा चुना लावल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन तो आर्थिक गुन्हे शाखेकडं वर्ग करण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त निषित मिश्रा यांनी दिली.

जुहूतील फॅशन डिझायनरनं दाखल केली तक्रार : ओशिवरा पोलीस ठाण्यात 15 मार्चला रिट्स कन्सल्टन्सी सर्विसेस कंपनीचा मालक अंबर दलाल याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी जुहूतील फॅशन डिझायनर बबीता मलकानी यांनी तक्रार दाखल केली होती. एप्रिल 2023 मध्ये या फॅशन डिझाईनर बबीता मलकानींची मित्रमंडळींमार्फत दलाल याच्याशी ओळख झाली होती. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणावर नफा देण्याचं आमिष दलाल यानं दाखवलं. दलालनं फॅशन डिझायनर बबीता मलकानी यांना सांगितलं की, "तुमचे पैसे वेगवेगळ्या कमोडिटीजमध्ये गुंतवून दीड ते 1.8 टक्के नफा मिळेल." "दलाल यानं महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग (एमओयु ) देखील सही करुन दिला होता," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गुंतवणूकदारांनी गुंतवली एक हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम : फॅशन डिझायनर बबीता मलकानी (वय 56) या महिलेनं एप्रिल 2023 ते मार्च 2024 पर्यंत चार्टर्ड अकाउंटंट अंबर दलाल याला 54 कोटी 45 लाख रुपये दिले आहेत. या गुंतवणुकीत वेगवेगळ्या व्यक्तींची देखील गुंतवणूक आहे. एक हजार कोटींपेक्षा अधिक पैसे गुंतवणूकदारांनी दलाल याच्याकडं गुंतवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तक्रारदार बबीता मलकानी या जुहू परिसरातील गांधीग्राम इथं राहतात.

अंबर दलाल विरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा : अंबर दलाल विरुद्ध भारतीय दंड विधान कलम 420, 406, 409 आणि महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स अ‍ॅक्टच्या वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यातून हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडं वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अंबर दलाल हा भारताबाहेर पळून जाऊ नये, म्हणून मुंबई पोलिसांनी लूक आउट सर्कुलर जारी केलं आहे. मुंबई पोलिसांनी अंबर दलालच्या मुलाला अनेकदा चौकशीसाठी बोलावलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. Cyber Menace डिजिटल फसवणूक; एक चिंताजनक सायबर धोका
  2. वर्धेत नरबळीचा प्रयत्न, बालकाला पूजा करण्याच्या बहाण्यानं बोलवून विहिरीत ढकललं
  3. Share Market Fraud: दुबईत बसून क्रिप्टो करन्सीद्वारे 25 कोटींचा अपहार; दुबईतील चिनी आरोपी मुख्य सूत्रधार असल्याचा संशय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.