ETV Bharat / state

मैदान एकच अन् दंड थोपटणारे अनेक! सभेसाठी 'शिवाजी पार्क'ला आली लय डिमांड - Shivaji Park Ground

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 9:22 PM IST

Updated : Mar 26, 2024, 9:29 PM IST

Shivaji Park Ground : निवडणुका म्हटलं की सुटाबुटातील आणि पांढरे शुभ्र कपडे घातलेले पुढारी हे दिसत असतात. या पुढाऱ्यांच्या मागं कार्यकर्त्यांची लगबग सुरू असते. भाऊ, दादा, नाना, तात्या, ताई, माई म्हणत हे कार्यकर्ते आपल्या नेत्याला निवडून आणण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. निवडणुकांमध्ये सभा म्हटलं की या कार्यकर्त्यांना आणखीनच जोर येतो. असं आम्ही तुम्हाला का सांगतोय? वाचा बातमी...

शिवाजी पार्क
शिवाजी पार्क

मुंबई Shivaji Park Ground : लोकसभेचं वादळ देशभरात सुरू आहे. अशा वातावरणात जो तो पक्ष आपली भूमिका सभांच्या माध्यमांतून मांडत असतो. आता राष्ट्रवादी, शिवसेना, ठाकरे गट आणि भाजपानं मुंबई पालिकेकडं शिवाजी पार्क हे मैदान देण्याची मागणी केलीय. यातील अनेक तारखा सारख्या असल्यानं मैदान कुणाला मिळणार? हा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळं 'शिवाजी पार्क'ची डिमांड जास्तीच वाढलीय.

शिवाजी पार्कला डिमांड : पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख आता हळूहळू जवळ येत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी 'इंडिया' आघाडीनं राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दादरच्या शिवाजी पार्क येथे प्रचाराचा नारळ फोडला. आता इतर पक्ष देखील आपल्याला सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी रांगेत आहेत. पालिकेच्या जी नॉर्थ वॉर्ड ऑफिसमध्ये विविध पक्षांनी यासाठी अर्ज केले आहेत. यात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेच : दादर पश्चिमेला असणाऱ्या शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी दोन मोठे मेळावे होतात. त्यातील एक म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा. आता ऐन निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा होणार आहे. त्यामुळे हे मैदान आपल्याला कसं मिळेल यासाठी मनसेकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. 9 एप्रिल रोजी गुढीपाडवा आहे. मात्र, पाडवा मेळाव्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 17 एप्रिलची परवानगी मागवण्यात आली आहे. तर, ठाकरे गटाकडून देखील नेमकी 17 तारखेलाच भव्य सभा घेण्यासाठी परवानगीचा अर्ज महानगरपालिकेकडे देण्यात आलाय. त्यामुळे आता मैदान नेमकं कुणाला द्यायचं? हा पेच पालिका अधिकाऱ्यांसमोर निर्माण झालाय.

शिंदे गटाला हवं 6 दिवस मैदान : शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबरच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं आणि शिवसेनेच्या शिंदे गटानं तसंच, भारतीय जनता पक्षानं देखील शिवाजी पार्क येथे प्रचार सभा घेण्यासाठी अर्ज केले आहेत. मात्र, यांच्या तारखा वेगवेगळ्या आहेत. यात शिवसेना शिंदे गटानं एप्रिल आणि मे महिन्यात तीन- तीन दिवस सभेसाठी अर्ज केलाय. शिंदे गटाला एप्रिल महिन्यातील 16, 19 आणि 21 तारखेला सभा घेण्यासाठी (Shivaji Park Ground) शिवाजी पार्क मैदान हवं आहे. तर, मे महिन्यात 3 मे, 5 मे आणि 7 मे असे तीन दिवस शिवाजी पार्क मैदान शिंदे गटानं पालिकेकडं मागितलंय. दरवर्षी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने होणारा वाद टाळण्यासाठी शिंदे गटाने या अर्जासोबतच 12 ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्याला देखील आपल्याला मैदान मिळावं त्यासाठीचा अर्ज केलाय.

अजित पवार गटाचा अर्ज : शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून देखील पालिकेला अर्ज पाठवण्यात आलाय. या अर्जात अजित पवार गटानं 22 एप्रिल, 24 एप्रिल आणि 27 एप्रिल असे तीन दिवस मैदान मिळावं असं म्हटलंय.

भाजपाला हवंय 3 दिवस मैदान : शिवाजी पार्क येथे भाजपाचा स्वतःचा असा कधी मेळावा झाला नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला आणि प्रचार सभांना भाजपाचे नेते येथे उपस्थित राहायचे. मात्र, भाजपानं स्वतंत्र असा मेळावा किंवा सभा शिवाजी पार्कवर घेतल्याची नोंद नाही. परंतु, यावेळी भाजपानं देखील आता शिवाजी पार्क येथे सभेसाठी अर्ज केलाय. या अर्जात भारतीय जनता पक्षाकडून 23 एप्रिल, 26 एप्रिल आणि 28 एप्रिल रोजी मैदानात सभा घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी असा अर्ज करण्यात आलाय. दरम्यान, भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी महानगरपालिकेकडं सभेसाठी मागितलेल्या तारखा पाहता कुणाला मैदान मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा :

1 कमी कार्यकाळ बाकी असल्यानं अकोला पश्चिमची पोटनिवडणूक रद्द; नागपूर खंडपीठाचा निर्णय - Akola West Assembly By Election

2 काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंनी शक्तिप्रदर्शन करत दाखल केला उमेदवारी अर्ज - Vikas Thackeray File Nomination

3 रायगडमधून सुनील तटकरेंना उमेदवारी जाहीर; पत्रकार परिषदेत अजित पवारांची घोषणा - NCP candidate list

Last Updated : Mar 26, 2024, 9:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.