ETV Bharat / state

कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता हरपला, आमदार पी. एन. पाटील यांचं निधन - PN PATIL News

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 7:09 AM IST

Updated : May 23, 2024, 8:37 AM IST

MLA P N Patil Passed Away : काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार, पी. एन. पाटील यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आज (23 मे ) पहाटे एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान पाटील यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

MLA P N Patil passed away at the age 71  in kolhapur
आमदार पी. एन. पाटील यांचं निधन (ETV Bharat)

कोल्हापूर MLA P N Patil Passed Away : काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून राज्यभर ओळख असलेले प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांची आज पहाटेच्या सुमारास प्राणज्योत मालवली. रविवारी घरात पाय घसरून पडल्यानं त्यांच्या मेंदूला आणि हाताला मोठी दुखापत झाली होती. यानंतर कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली. मात्र, ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. गेले दोन दिवस त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. पी. एन. पाटील निधनानंतर राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोण आहेत पी एन पाटील? : काँग्रेसचा एकनिष्ठ नेता म्हणून पांडुरंग निवृत्त्ती पाटील ऊर्फ पी. एन. पाटील यांची राज्यात ओळख आहे. गेल्या 40 वर्षांपासून कोल्हापूरच्या राजकारणात आणि समाजकारणात आपली वेगळी प्रतिमा तयार करत ते करवीर विधानसभा मतदारसंघातून 2004 आणि 2019 असे 2 वेळा आमदार झाले. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कार्यकर्त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता आणि मैत्री पाळणारा नेता अशी त्यांची जिल्ह्यात प्रतिमा आहे.



दोनवेळा पराभव त्यानंतर दोनवेळा विजय- आमदार पांडुरंग निवृत्त्ती पाटील ऊर्फ पी. एन. पाटील यांचा जन्म 6 जानेवारी 1953 मध्ये झाले. ते मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथील रहिवाशी होते. पी. एन. पाटील हे पहिल्यांदा 2004 मध्ये त्यावेळच्या सांगरूळ विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. तत्पूर्वी त्यांनी याच मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवली होती. मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर त्यांनी 2009 आणि 2014 मध्ये करवीरमधून निवडणूक लढवली. मात्र, या दोन्हीही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार चंद्रदीप नरके यांचा पराभव करून 2009 आणि 2014 च्या पराभवाचा वचपा काढत पुन्हा दुसऱ्यांदा विधानसभा गाठली.

गेल्या 40 वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय-आमदार पी.एन. पाटील हे गेल्या 40 वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होते. ते 1999 पासून ते 2019 असे तब्बल 22 वर्ष कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. सध्या ते महाराष्ट्र राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून काम करत होते. या शिवाय सहकार क्षेत्रामध्ये देखील त्यांनी आपले पाय घट्ट रोवले होते. जिल्हा बँकेत ते 35 वर्षाहून अधिककाळ संचालक म्हणून राहिले आहेत. तर 1999 पासून सलग पाच वर्षे ते बँकेचे अध्यक्षही होते. तसंच जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या गोकुळ दूध संघातदेखील त्यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत 25 वर्ष आपलं वर्चस्व कायम ठेवलं.


गांधी घराण्याशी एकनिष्ठ - पी. एन. पाटील हे गांधी घराण्याशी एकनिष्ठ होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रति असलेल्या निष्ठेमुळं त्यांनी कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात राजीव गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा बसवला. तर या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी कोल्हापुरात आल्या होत्या. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि पी. एन. पाटील यांचे घनिष्ट संबंध होते. विधानसभा निवडणुकीतील पी. एन. पाटील यांचा प्रचाराचा शुभारंभ हे विलासराव देशमुखच करायचे. आमदार पी. एन. पाटील यांचे एक सुपुत्र राहुल हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. तर दुसरे पुत्र राजेश यांच्याकडं अन्य व्यवसायाबरोबरच श्रीपतरावदादा बँकेचं अध्यक्षपद आहे. त्यांच्या कन्या टिना या कराडमध्ये स्थायिक आहेत.

हेही वाचा -

  1. प्रतापराव भोसले यांच्या निधनानं सुसंस्कृत, निष्ठावान नेतृत्व हरपलं... नाना पटोले यांची प्रतिक्रिया - Prataprao Bhosale Death
  2. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचे निधन - Anita Goyal passes away
  3. अंतरिम जामिन मिळालेल्या नरेश गोयल यांना धक्का, पत्नीचं कर्करोगानं निधन - Naresh Goyal news
Last Updated : May 23, 2024, 8:37 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.