ETV Bharat / state

मराठा आरक्षण आंदोलन; सकल मराठा समाजाच्या वतीनं आज महाराष्ट्र बंदची हाक, जालन्यात टायर जाळले

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 14, 2024, 8:16 AM IST

Updated : Feb 14, 2024, 12:18 PM IST

Maratha Reservation Protest : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावं, यासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. मराठा आरक्षणासाठी आज सकल मराठा समाजानं महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.

Maratha Reservation Protest
संपादित छायाचित्र

जालना Maratha Reservation Protest : मराठा आरक्षणाची मागणी करत आज 14 फेब्रुवारीला सकल मराठा समाजाच्या वतीनं राज्यभर बंद पुकारण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर जालना जिल्हात सुद्धा कडकडीत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आली आहे. तत्पूर्वी मंगळवारी रात्री दहा वाजता जालना जिल्ह्यातील केदारखेडा इथं जालना ते भोकरदन या मुख्य महामार्गावर मराठा आंदोलकांनी टायर जाळत रस्ता रोको आंदोलन केलं आहे. त्यामुळं महाराष्ट्र बंद आंदोलनाची ठिणगी भोकरदनमध्ये पेटल्याचं दिसून आलं.

मराठा आंदोलकांनी जाळले टायर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं आहे. अंतरवाली सराटी या गावात मनोज जरांगे यांनी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसल्यानं मराठा समाज आक्रमक झाला आहे. सकल मराठा समाजाच्या वतीनं आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्याची ठिणगी जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये पेटल्याचं दिसून आलं. जालना भोकरदन या महामार्गावर मराठा आंदोलकांनी टायर जाळून आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी मोठी घोषणाबाजी केली. याप्रसंगी दोन्हीही बाजुनं वाहनाच्या लांबच लांब रांगा लागून राहिल्या होत्या. त्यामुळं वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत सुरू केली आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी शांततेचं आवाहन परिसरातील नागरिकांना केलं आहे.

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा अंतरवाली सराटी या गावात आमरण उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. या आमरण उपोषणात मनोज जरांगे यांनी अन्न पाणी घेण्यास नकार दिला आहे. इतकंच नाही, तर मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यासही नकार दिला. त्यामुळं त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळं मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.

हेही वाचा :

  1. उपोषण पीएचडी विद्यार्थ्यांसाठी नाही तर मराठा आरक्षणासाठी; मनोज जरांगेंनी सारथीच्या विद्यार्थ्यांना झापलं
  2. वडेट्टीवार अन् भुजबळ शेपूट नसलेले नेते; मनोज जरांगे पाटलांची टीका
Last Updated :Feb 14, 2024, 12:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.