चंद्रपूर : Lal Shyam Shah : सत्ता ही एक अशी गोष्ट आहे जी मिळवण्यासाठी कोणी कुठल्याही थराला जाऊ शकतो. यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्व आयुधांचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी केला जातो. म्हणून राजकारण वाईट अशी भावना सर्वसामान्य लोकांची असते. (Lal Shyam Shah resigned from MP) मात्र, चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या इतिहासात एक खासदार असेही आहेत ज्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहात आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. केवळ एक दिवस सभागृहात जाणारे ते पहिले खासदार ठरले. लाल श्याम शहा असं त्यांचं नाव आहे.
1962ची लोकसभा निवडणुक : ही गोष्ट आहे 1962 ची. यावेळी अपक्ष उभे असलेले लाल श्याम शहा यांची दुसऱ्यांदा लढत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार व्ही. एन. स्वामी यांच्याविरोधात होती. 1957 च्या लोकसभा निवडणुकीत ते थोडक्यात पराभूत झाले होते. (Chandrapur Lok Sabha) यावेळी स्वामी यांना 1 लाख 19 हजार 949 मते मिळाली होती. तर, लाल श्याम शहा यांना 97 हजार 973 मते मिळाली होती. यावेळी शाह यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. 1962 च्या निवडणुकीत त्यांनी तब्बल 1 लाख 28 हजार 233 मते मिळवत विजय मिळवला. तर, स्वामी यांना 85 हजार 322 मते मिळाली. 5 सप्टेंबर 1962 ला त्यांनी खासदार म्हणून शपथ घेतली.
कोण आहेत लाल श्याम शाह : लाल श्याम शहा यांचा जन्म 1 मे 1919 मध्ये तत्कालीन मध्य प्रदेशात झाला. तेव्हा चंद्रपूर हे इंग्रजकालीन सीपी अँड बरार प्रांतात येत होते. शहा यांचे कुटुंब हे सधन होते. चांदा (चंद्रपूर) क्षेत्रातील पानाबरसचे जमीनदार होते. अहेरीचे विदर्भवादी नेते दिवंगत विश्वेश्वराव आत्राम यांचे ते नातेवाईक होते. हजारो एकर जमीन त्यांच्या ताब्यात होती. त्यांना मानणारा मोठा वर्ग येथे होता. चौकी विधानसभा क्षेत्राचे आमदार होते. जानेवारी 1955 ला त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. लाल श्याम शहा यांचे विधानसभा क्षेत्र सीमांकन होऊन चांदा मतदारसंघ मध्य प्रदेशातून मुंबई राज्याला जोडण्यात आला. त्यामुळे चौकी, राजनांदगाव, धानोरा, चांदा हा परिसर खासदार होण्यापूर्वीपासून त्यांच्या लोकलढ्याचे कार्यक्षेत्र होते. 1962 मध्ये ते चांद्यातून खासदार झाले.
या कारणासाठी दिला राजीनामा : लाल श्याम शहा हे जल, जंगल, जमीनचे खंदे समर्थक होते. 1964 च्या काळात पूर्व पाकिस्तान म्हणजे आत्ताच्या बांगलादेशातून येणाऱ्या निर्वासितांना चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील दंडकारण्य जंगलात वसवण्याची भूमिका तत्कालीन सरकारची होती. या भूमिकेला शहा यांचा तीव्र विरोध होता. स्थानिक आदिवासींचे प्रश्न अत्यंत बिकट असताना केंद्र सरकार दंडकारण्यावर नवी आपत्ती का लादत आहे? असा दिवंगत खासदार लाल श्याम शहा यांचा सवाल होता. अखेर प्रचंड अस्वस्थ झालेल्या शहांनी लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष सरदार हुकूमसिंग यांना चांदा येथील धर्मराव बंगल्यातून राजीनामा लिहिला. हा राजीनामा सुदीप ठाकूर लिखित चरित्रग्रंथात उपलब्ध आहे. 24 एप्रिल 1964 ला त्यांनी राजीनामा दिला. लोकसभा अध्यक्ष हुकूम सिंग यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला.
असा लिहिला राजीनामा : 'मी सरकारला कोणतीही गोष्ट करण्यासाठी भाग पाडू शकत नाही पण या सगळ्या बाबींवर नव्या पद्धतीने विचार करण्याची विनंती करू शकतो. यासाठी माझा हा राजीनामा आहे. कृपा करून हा राजीनामा स्वीकारा' अशी त्यांनी विनंती त्यांनी केली. लोकसभा अध्यक्ष सरदार हुकूमसिंग यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला. शाह यांचे राजनांदगाव येथे 10 मार्च 1988 मध्ये निधन झाले.
एक नायक विस्मरणात गेला : 'लाल श्याम शहा यांनी आपलं सर्व आयुष्य आदिवासी समाजाला अर्पित केलं. त्यांचा पिंड हा राजकारण्यांचा नव्हता, याचा प्रत्यय आल्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि आपलं आयुष्य आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी झोकून दिलं. अनेकांची प्रेरणा ते बनले. वडसाचे माजी आमदार नारायण सिंह उईके यांना त्यांच्याच कार्यातून प्रेरणा मिळाली, असं ते नेहमी सांगत. असं असताना आज हे मोठे व्यक्तीमत्व विस्मरणात गेले हे आपल्या सर्वांचेच दुर्दैव आहे. ते मुळचे दुर्ग (छत्तीसगड) प्रांताचे, मात्र आता त्यांना कोणी ओळखत नाही ही खरी शोकांतिका आहे. -डॉ. तुमराम (नारायण सिंह उईके यांच्या जीवनचरित्राचे लेखक )
हेही वाचा:
1 उमेदवारीवरून महायुती-मविआत नाराजीनाट्य; काय आहेत नाराजीची कारणं? - Lok Sabha Elections
3 महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज - Lok Sabha Elections