ETV Bharat / politics

कोकणातील रायगड, रत्नागिरी- सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीची अस्तित्वाची लढाई - Lok Sabha Elections

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 2, 2024, 7:13 PM IST

Lok Sabha Elections
रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ

Lok Sabha Elections : १८ व्या लोकसभा निवडणुकीचा धुरळा संपूर्ण देशभर उडाला असताना, महाराष्ट्रातसुद्धा जागा वाटपावरून महाविकास आघाडी असो आणि महायुती यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतभेद सुरू आहेत. अशात रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या कोकणातील दोन प्रतिष्ठित लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे.

प्रतिक्रिया देताना डॉ. दिनेश शर्मा

मुंबई Lok Sabha Elections : रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांना उमेदवारी दिल्यानं तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अंतर्गत नाराजी असून रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महायुतीला उमेदवाराची निवड न करता आल्यानं संभ्रमाचं वातावरण आहे. या मतदारसंघातून भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे इच्छुक असून त्यांना याच मतदारसंघातून शिंदे गटाचे नेते, मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांच्याकडून 'काटे की टक्कर' दिली जाण्याची शक्यता आहे. तर या मतदारसंघात सुद्धा नारायण राणे यांना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करावी लागत आहे.





नाराज धैर्यशील पाटील काय करणार : रायगड लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडून उबाठा गटाचे अनंत गिते हे यंदा उमेदवार असणार आहेत. अनंत गिते यांनी १९९९, २००४, २००९ आणि २०१४ अशा चार वेळा रायगडमधून विजय प्राप्त केला होता. रायगड हा एक प्रकारे शिवसेनेच्या वर्चस्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे. मागच्या २०१९ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी शिवसेनेच्या अनंत गिते यांचा पराभव केला आणि ते या मतदारसंघातून खासदार झाले. यंदा पुन्हा एकदा महायुतीकडून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विद्यमान खासदार सुनील तटकरे यांना उमेदवारी देण्यात आलीय. अशात ही लढत अनंत गिते विरुद्ध सुनील तटकरे अशी होणार असताना अलिबागचे भाजपाचे आमदार धैर्यशील पाटील हे सुद्धा त्यांना उमेदवारी न दिल्यानं नाराज झाले असून ते स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

रायगडची निवडणूक तिरंगी : अशा परिस्थितीमध्ये रायगडची निवडणूक तिरंगी होणार आहे. वास्तविक रायगड या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपाचं तसं फारसं अस्तित्व नव्हतं. याच कारणानं भाजपानं शेकापामधून धैर्यशील पाटील यांना आपल्या पक्षात घेतलं आणि आपली ताकद या मतदारसंघात निर्माण करण्याचा प्रयत्न केला. धैर्यशील पाटील यांनी सुद्धा २०१९ मध्ये भाजपामध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं तयारीला सुरुवात केली होती. परंतु ऐन मोक्याच्या क्षणी त्यांचा पत्ता कट करून महायुतीकडून ही जागा सुनील तटकरे यांना देण्यात आल्यानं भाजपा कार्यकर्ते सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये नाराज असून त्याचा फटका सुनील तटकरे यांना बसू शकतो.



तटकरेंसाठी लढाई अवघड : रायगड लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचे महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी तसेच दापोलीचे आमदार योगेश कदम हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. तर श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे या आमदार असून पेण विधानसभा मतदारसंघात रवींद्र पाटील हे भाजपाचे आमदार आहेत. तर गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे एकमेव उबाठा गटासोबत आहेत. मागच्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार अनंत गिते यांना ४,५५,५३० मतं मिळाली होती. तर काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप यांच्या आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना ४,८६,९६८ मतं मिळाली होती. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत अनंत गिते यांना शेतकरी कामगार पक्षाची साथ मिळाली आहे. ही अनंत गिते त्याचबरोबर महाविकास आघाडीसाठी फार मोठी जमेची बाजू असल्याकारणानं सुनील तटकरेंसाठी ही लढाई तितकी सोपी नसणार आहे.


नारायण राणे की किरण सामंत : दुसरीकडं कोकणातील महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदार संघातून कुणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं यावरून महायुतीचं घोडं अद्याप अडकलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा राज्यसभेवरून पत्ता कट केल्यानंतर त्यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाण्याची अपेक्षा आहे. परंतु विशेष म्हणजे या मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी शिंदे शिवसेना गटाचे नेते, मंत्री उदय सामंत यांनी त्यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांच्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. वस्ताविक रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदार संघ शिवसेनेच्या बाले किल्ल्यांपैकी एक आहे. या मतदारसंघातून उबाठा गटाचे नेते खासदार विनायक राऊत यांनी २०१४ आणि २०१९ साली विजय संपादन केला असून ते यंदा हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहेत.

नारायण राणेंना मोठा झटका बसू शकतो : विशेष म्हणजे या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी माजी खासदार आणि नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे यांचा पराभव केला होता. अशा परिस्थितीमध्ये दोनवेळा पुत्राला आणि आता नारायण राणे यांना उमेदवारी दिल्यास पित्याचा पराभव करून विनायक राऊत हॅट्रिक साधण्याच्या प्रयत्नात असून जर त्यात त्यांना यश आलं तर महायुतीसाठीच नाही तर नारायण राणे यांच्यासाठी सुद्धा हा फार मोठा झटका बसू शकतो. अशा परिस्थितीमध्ये सामंत बंधूंची मनधरणी करण्याचे मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न हे विशेष करून नारायण राणे यांच्याकडून केले जात आहेत. याकरता नारायण राणे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठींचं सत्र मागील महिन्याभरापासून सुरू आहे. परंतु अद्याप त्यात यश येताना दिसत नाही.


किरण सामंत यांच्या उमेदवारीसाठी शिंदे गटाची शक्ती पणाला : रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर चिपळूण, रत्नागिरी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सावंतवाडी, कणकवली अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये चिपळूण विधानसभा मतदारसंघात शेखर निकम हे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर रत्नागिरीत उदय सामंत, सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर हे दोन शिंदे गटाचे आमदार आहेत. कुडाळमध्ये वैभव नाईक तर राजापूरमध्ये राजन साळवी हे दोन उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत. तर कणकवलीत नितेश राणे हे एकमेव भाजपाचे आमदार आहेत.

रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघांमध्ये रस्सीखेच : अशा परिस्थितीमध्ये एकंदरीत पाहिलं तर इथे शिवसेनेचेच वर्चस्व मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. अशातच नारायण राणे यांना उमेदवारी दिल्यास किरण सामंत हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तरी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये इतर पक्षांकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता जास्त आहे. म्हणूनच राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी कोकणातील रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्सीखेच सुरू असून शेवटी इथे उमेदवाराची योग्य निवड पक्षाला फायदेशीर ठरू शकते. तर रायगडमध्ये धैर्यशील पाटील आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये किरण सामंत यांना उमेदवारी न दिल्यास ती महायुतीसाठी धोकादायक ठरण्याची घंटा आहे.

उमेदवार महत्त्वाचा नाही कमळ चिन्ह महत्त्वाचं : महायुतीतील या जागावाटपाच्या तिढ्याबाबत बोलताना भाजपाचे राज्याचे निवडणूक प्रभारी खासदार डॉ. दिनेश शर्मा यांचं एक वाक्य बरंच काही सांगून जातं. महायुतीतील जागा वाटपाच्या संदर्भात ते म्हणाले की, राज्यामध्ये महायुतीत जागा वाटपात कुठेही मतभेद नाहीत. राज्यातील सर्व ४८ जागेवर कमळ चिन्ह दिल्यास सर्व उमेदवार निवडून येतील. आज भाजपाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला विचारलं की, तुमच्या मतदारसंघामध्ये उमेदवार कोण हवा? तर ते उमेदवाराचं नाव नाही तर कमळ चिन्ह हेच सांगत आहेत.

उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडून यावेत : आमचा उमेदवार घोषित आहे तो म्हणजे कमळाचं फुल. विशेष म्हणजे भाजपाची हीच इच्छा आहे की, राज्यात जास्तीत जास्त उमेदवार हे कमळाच्या चिन्हावर निवडून यावेत. म्हणून जिथे जिथे असे मतभेद आहेत. तिथे भाजपा उमेदवाराला आपल्या बाजूनं खेचत असून त्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्यास प्रोत्साहित करत आहे. अशा परिस्थितीमध्ये रत्नागिरीमध्ये सुद्धा किरण सामंत यांना कदाचित कमळ या चिन्हावर सुद्धा निवडणूक लढवावी लागू शकते. शेवटी जास्तीत जास्त खासदार कमळ या चिन्हावर निवडून आणणे हेच भाजपाचं ध्येय आहे.

हेही वाचा -

  1. बारामती लोकसभा मतदारसंघात चुरस वाढली! ही लढाई प्रस्थापितांविरोधात विस्थापितांची, प्रकाश शेंडगे यांचं वक्तव्य - LOK SABHA ELECTIONS
  2. इंग्रजानींही विकास केला म्हणून लोक त्यांच्यासोबत गेले का? - रोहित पवार - Lok Sabha Elections
  3. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज - Lok Sabha Elections
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.