ETV Bharat / state

लैला खान प्रकरणी दोषी परवेज टाकला फाशीची शिक्षा, दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण ठरवत मुंबई सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा - Laila Khan Murder Case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 24, 2024, 2:06 PM IST

Updated : May 24, 2024, 3:07 PM IST

Laila Khan Murder Case : बहुचर्चित लैला खान आणि पाच जणांच्या हत्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवलेल्या परवेज टाकला फाशीची शिक्षा सुनावली. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायाधीश सचिन पवार यांनी परवेजला शिक्षा सुनावली.

laila Khan murder
फाईल फोटो (Source- ETV Bharat File Photo)

मुंबई Laila Khan Murder Case : बॉलीवुड अभिनेत्री लैला खान हिच्या हत्येप्रकरणी तिचे सावत्र वडील परवेज टाक याला मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यामध्ये आज शिक्षा ठोठावण्यात आली. परवेजला भा.दं.वि. कलम 302 अन्वये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर कलम 201 अन्वये सात वर्षांचा सश्रम कारावास व 10 हजार दंड तसेच दंड न भरल्यास एक वर्षांचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली.

वकिलांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)

काय झाला युक्तिवाद? : खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील पंकज रामचंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली. परवेज याला ऑर्थर रोड कारागृहात अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. निकालावेळी न्यायालयात त्याचे आई वडिल पत्नी आणि तीन मुली उपस्थित होते. लैला खान हिच्यासहित तिची चार भावंडे आणि आईची 2011 मध्ये हत्या झाली होती. सुपरस्टार राजेश खन्नासोबत तिने एका हिंदी चित्रपटात काम केले होते.

  • परवेज विरोधात हत्या करणे, हत्येचा कट रचणे, पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यामध्ये त्याला दोषी ठरवण्यात आले होते. नाशिकजवळील इगतपुरी येथील लैलाच्या बंगल्यावर या हत्या झाल्याचा आरोप होता.

या चित्रपटात केले होते काम - मालमत्तेवरुन झालेल्या वादानंतर या हत्या करण्यात आल्या होत्या. परवेज हा लैलाची आई शेलिनाचा तिसरा पती होता. लैला खानचा विवाह मुनीर खान याच्याशी झाला होता. मुनीर हा ‘हरकत-उल-जिहाद अल इस्लामी’ या बंदी असलेल्या बांगलादेशी संघटनेचा सदस्य होता, अशी चर्चा होती. त्यामुळे त्यावेळी या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले होते. 2002 मध्ये लैला खान हिने कन्नड चित्रपटाद्वारे करिअर सुरू केले होते. लैला खाननं 2008 मध्ये वफा-अ डेडली लव स्टोरी यामध्ये काम केले होते. हत्येपूर्वी ती जिन्नात या चित्रपटात काम करत होती. 2011 मध्ये लैलाचे सख्खे वडील असलेल्या नादिर पटेल यांनी त्याच्या परिवारातील व्यक्ती गायब असल्याची तक्रार मुंबईतील ओशिवरा पोलिस स्थानकात दाखल केली होती. आसिफ शेख व परवेज टाकवर त्यांनी संशय व्यक्त केला होता.

फार्महाऊसच्या मागील बाजूला पुरले होते- पोलिसांनी या प्रकरणी आसिफ शेखला बेंगळुरु येथून अटक करुन त्याची चौकशी केली. मात्र नंतर त्याला सोडले होते. मात्र मोबाईल नेटवर्कच्या तपासामध्ये परवेज हा लैला खान सोबत इगतपुरी येथे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. लैलाची आईची तिचा दुसरा पती आसिफ शेख सोबत जवळीक होती. त्यामुळे परवेज संतापत असे. शेलिना आसिफला आपल्या संपत्तीचा केअरटेकर बनवण्याचा विचार करत होती. हत्येनंतर परवेजने या सर्वांचे मृतदेह फार्महाऊसच्या मागील बाजूला पुरले होते.

अवशेषांची ओळख डीएनए चाचणीद्वारे - हत्येनंतर परवेज त्याच्या मुळ गावी काश्मिरला गेला. तिथे व्यापार करु लागला. जम्मू काश्मिर पोलिसांनी त्याला एका फसवणुकीच्या प्रकरणात 8 जुलै 2012 रोजी अटक केली. त्यावेळी त्याने हत्येबाबत पोलिसांना माहिती दिली. त्याच्या जबाबानंतर 10 जुलै 2012 रोजी इगतपुरी येथील फार्महाऊसमध्ये पुरण्यात आलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. सुरुवातीला तो वारंवार आपला जबाब बदलत होता. मात्र गुन्ह्यातील त्याचा सहभाग निश्चित करण्यासाठी 42 साक्षीदारांनी न्यायालयात साक्ष दिली. या प्रकरणातील दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. लैला खान, तिची आई, भावंडांच्या मृतदेहांच्या अवशेषांची ओळख डीएनए चाचणीद्वारे करण्यात आली होती.

हेही वाचा - लैला खान हत्याकांड; लैला खान आणि इतर भावंडांचा डीएनए केवळ आईशी जुळला, अद्याप बाप नाही कळला, सत्र न्यायालय शुक्रवारी शिक्षा ठोठावणार - Laila Khan Murder Case

Last Updated : May 24, 2024, 3:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.