ETV Bharat / state

मक्याच्या पिठापासून नैसर्गिक रंग; महिला बचत गटाला मिळतंय लाखोंचं उत्पन्न - Holi 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 24, 2024, 7:34 PM IST

Natural Colour Made from Corn Flour : वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल लागताच साजरा होणारा पहिला सण म्हणजे होळी (Holi 2024). होळी हा सण रंगांचा सण आहे. होळी म्हटलं की रंग आलेच परंतु, कृत्रिम रंगांमुळं त्वचेवर होणाऱ्या दुष्परिणांमामुळं अलिकडे नैसर्गिक रंगांबद्दल (Natural Colour) मोठी जनजागृती होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता छत्रपती संभाजीनगरमधील तुळजाभवानी महिला बचत गटातील महिलांनी नैसर्गिक रंग तयार करण्यात पुढाकार घेतला आहे.

Holi 2024 natural colour made from Natural foods like Corn flour Bachat Gat Womens benefiting financially in Chhatrapati Sambhajinagar
नैसर्गिक रंग तयार करण्यात बचत गटाचा पुढाकार, महिलांना होतोय आर्थिक फायदा

मक्याच्या पिठापासून नैसर्गिक रंग, 10 महिलांना रोजगार

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Natural Colour Made from Corn Flour : होळी हा रंगांचा सण असून रंगीबेरंगी रंगांशिवाय होळीचा सण अपूर्ण मानला जातो. मात्र, बाजारात मिळणाऱ्या रासायनिक रंगांमुळं त्वचेला हानी पोहोचू शकते. त्यामुळं गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक रंग वापरण्यावर सर्वचजण भर देत आहेत. त्यामुळं यंदा बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक रंग (Natural Colours) तयार करून विक्रीसाठी बाजारात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर जटवाडा भागातील चिमणपुर येथील महिला बचत गटानं नैसर्गिक खाद्य पदार्थांपासून रंग तयार केले आहेत. तसंच अवघ्या वीस दिवसांमध्ये साडेआठ क्विंटल रंगाची विक्री करून या महिलांनी मोठा नफा मिळवला आहे.

बचत गटानं तयार केला नैसर्गिक रंग : शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिमणपूरवाडी येथील तुळजाभवानी महिला बचत गटातर्फे होळीसाठी यावर्षी साडेआठ किलो नैसर्गिक रंग तयार करण्यात आलांय. होळीसाठी त्यांनी केलेल्या रंगाच्या उत्पादनातून जवळपास तीन लाखांच्या आसपास कमाई झाली आहे. तयार केलेले रंगांची विक्री शहर आणि आसपासच्या शहरांमधे केली जाते. या रंगाची मागणी मोठमोठ्या शहरातून केली जात असल्यानं व्यवसायाला व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. आठ वर्षांपूर्वी या बचत गटाच्या चार महिलांनी नैसर्गिक रंग तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. तेव्हापासून या रंगांचे उत्पादन सुरू झाले. मक्याचे पीठ आणि खाण्याच्या रंगांचा वापर करुन होळीचे हे रंग बनविले जातात. आरोग्याच्या दृष्टीनं सुरक्षित असलेल्या त्यांच्या या रंगांना शहरासह पुणे, अकोला आणि कोल्हापूर येथूनही मागणी आहे, अशी माहिती बचत गट सदस्य सुनंदा राठोड यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

असा तयार केला जातो नैसर्गिक रंग : सर्वात अगोदर मक्याचे पीठ बारीक दळून, चाळून घेतात. 1 किलो पिठासाठी 200 ग्रॅम याप्रमाणे खाण्याचे रंग त्यात मिसळवण्यात येतात. हे मिश्रण वाळवून, कुटून पुन्हा चाळून रंगाची पावडर तयार होते. त्याचे पॅकिंग, लेबलिंग करून विक्री केली जाते. तसंच या बचत गटात एकूण दहा महिला सदस्य आहेत. सुरुवातीला चार बचत गटांनी मिळून कामाला सुरुवात केली होती. मात्र, तयार केलेला रंग विक्री करायचा कसा? हा प्रश्न असल्यानं अनेकांनी माघार घेतली. नंतर कोरोनामुळं तीन वर्ष पुन्हा व्यवसाय ठप्प झाला. अखेर महिलांनी पुढाकार घेत पुन्हा एकदा व्यवसायाला सुरुवात केली. यावर्षी खासगी व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात काम दिल्यानं आगाऊ पैसे मिळाले. त्यातून उत्साह वाढला आणि त्यानंतर या महिलांनी मिळून साडे आठ क्विंटल रंग तयार करून त्याची विक्री केली.

इतर व्यवसायांचीही आर्थिक मदत : महिला बचत गटामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. शेतात राबणाऱ्या महिलांना दीडशे ते दोनशे रुपये रोज मिळतो. मात्र, या बचत गटातील महिला होळीसाठी नैसर्गिक रंग तयार करतात, पापड तयार करतात, किंवा इतर खाद्य पदार्थ घरगुती पद्धतीनं तयार करून त्यांचा पुरवठा करतात. त्यामुळं या महिलांना जवळपास तीनशे ते चारशे रुपये रोज मिळतो.

हेही वाचा -

  1. नेत्रदान चळवळीतून साकारला राज्यातील पहिला 'अंध बांधवांचा बचत गट'; चळवळीला अनेकांचा हातभार
  2. रस्ताच नाही सांगा कसा साधायचा 'विकास'; मेळघाटातील अतिदुर्गम गावातील आदिवासी महिलांचा टाहो
  3. Toxic Free Farming : मेळघाटात महिला बचत गटाचा विषमुक्त शेतीसाठी पुढाकार ; पाच हजार चारशे लिटर दशपर्णी अर्क तयार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.