ETV Bharat / state

Republican Party of India रिपाइंचा उगवता सूर्य कुठं बुडाला; डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या पक्षाचं नेमकं काय झालं?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 19, 2024, 5:27 PM IST

Republican Party of India : एकेकाळी केंद्रासह राज्यात दबदबा निर्माण करणारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्ष कुठेही दिसेनासा झालाय. या पक्षाची अमरावती मतदार संघावर चांगली पडक होती. मात्र, काळाच्या ओघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा सूर्य बुडालेला दिसतोय.

Lok Sabha Elections
Lok Sabha Elections

अमरावती Republican Party of India : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा 'उगवता सूर्य' हा 1996 ते 2014 पर्यंत अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रकाशमान पक्ष होता. दिवंगत नेते रा.सू. गवई यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं उगवता सूर्य हे चिन्ह होतं. खरंतर गवई गटाच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची अमरावती जिल्ह्यात एकेकाळी जबरदस्त पकड होती. तसंच पक्षाचे प्रमुख रा.सू. गवई यांचा केंद्रीय राजकारणात मोठा दरारा होता. इयत्ता आठवी, नववीत असताना कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा पगडा असणारे रा.सू. गवई यांनी अमरावती शहरातील विदर्भ महाविद्यालयात शिक्षण घेतानाच राजकीय क्षेत्रात नाव लौकिक मिळवला. देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विरोधात अमरावती लोकसभा मतदारसंघात 1962 मध्ये पहिल्यांदा शेड्युल कास्ट फेडरेशनचे उमेदवार म्हणून रा. सू. गवई यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती.

केंद्रीय राजकारणात गवईंचं वजन : अतिशय कमी मतांनी त्यांचा सन्मानजनक पराभव झाला होता. 1967 मध्ये देखील अतिशय अल्पमतानं काँग्रेसचे के. जी. देशमुख यांनी रा.सू. गवई यांचा पराभव केला होता. यानंतर सलग तीस वर्ष महाराष्ट्राच्या विधान परिषदेत सदस्य, विरोधी पक्षनेता, उपसभापती, सभापती अशी अनेक पदं रा. सू. गवई यांनी भूषवलीत. पुढं 1996 नंतर गवईंनी केंद्रातील राजकारणात लक्ष द्याला सुरवात केली. तसंच त्यांनी केंद्रीय राजकारणात त्यांचं स्थान बळकट केलं. 2006 मध्ये त्यांनी बिहार, केरळचे राज्यपाल म्हणूनही काम केलंय. आजही अमरावती लोकसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं उगवता सूर्य चिन्ह कार्यकर्त्यांच्या आठवणीत आहे. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना गवई गटाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा सूर्य नेमका कुठे बुडाला याबाबत 'ईटीव्ही भारत'नं खास आढावा घेण्याचा प्रयत्न केला.


रिपाइं गवई गटाचा थोडक्यात इतिहास : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1935 मध्ये मजूर पक्ष स्थापन केला होता. या पक्षाकडून ते मुंबई प्रांतात निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी शेड्युल कास्ट फेडरेशन पक्ष स्थापन केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणानंतर त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावानं पक्ष स्थापन करण्यासंदर्भात लिहिलेलं खुलं पत्र समोर आलं होतं. त्याच पत्राच्या आधारावर 3 ऑक्टोबर 1957 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी तामिळनाडू राज्यातील एन. शिवराज या पक्षाचे पहिले अध्यक्ष होते. 1962 ते 1972 असा दहा वर्षाचा सुवर्णकाळ या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला लाभला. त्यावेळी देशभरात पक्षाचे 22 आमदार, 13 खासदार निवडून आले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सुगीचा काळ असतानाच दुर्दैवानं अवघ्या दहा वर्षात पक्ष फुटीचं ग्रहण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वाट्याला आलं. यातूनच पुढं खोब्रागडे गट, कांबळे गट, असे विविध गट निर्माण झाले. याच काळात दलित पॅंथर तसंच मास मुव्हमेंट नावाच्या चळवळीमुळं देखील पक्षाचं विभाजन झालं.



1995 ला रिपाइं गटात ऐक्य : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये निर्माण झालेले विविध गट 1995 मध्ये एकत्र आले. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत रा. सू. गवई, प्रा. जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले या चारही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्यांनी महाराष्ट्रात 11 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला पहिल्यांदा उगवता सूर्य चिन्ह मिळालं होतं. त्यावेळी रा. सू. गवई पराभूत झाले असले, तरी त्यांना 1 लाख 60 हजार मतं मिळाली होती. एकूणच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व 11 उमेदवारांनी राज्यात एकूण 17 लाखाच्यावर मतं घेतली होती.

पवारांच्या माध्यमातून झाली काँग्रेसशी युती : 1996 च्या लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एक्याची ताकद ओळखून शरद पवार यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासोबत काँग्रेसची युती करण्याचा प्रयत्न यशस्वी केला. काँग्रेससोबत झालेल्या युतीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला राज्यात लोकसभेच्या चार जागा मिळाल्या. विशेष म्हणजे त्या निवडणुकीत अमरावतीतून रा.सू. गवई पहिल्यांदाच निवडून आले. तसंच या निवडणुकीत जोगेंद्र कवाडे, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले यांनी देखील बाजी मारली होती.

...तर टिकलं असतं वाजपेयी सरकार : 1998 च्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला पहिल्यांदाच केंद्रात स्थान मिळालं होतं. पक्षाच्या चार खासदारांच्या गटाचे प्रमुख रा.सू. गवई होते. त्यावेळी अल्पमतात असणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार टिकण्यासाठी केवळ दोन मतांची गरज होती. त्यावेळी भाजपाचे नेते प्रमोद महाजन यांनी रा.सू. गवई यांना आपल्या गटाचा पाठिंबा अटल बिहारी वाजपेयींना देण्यासाठी फार प्रयत्न केला होता. वाजपेयी माझे मित्र असले, तरी माझ्या मतदारांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास तोडणार नाही. माझ्या तत्त्वांशी मी बांधील असल्यामुळं वाजपेयींना पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका रा.सू. गवई यांनी स्पष्ट केली होती. जर त्यावेळी रा.सू. गवई यांनी आपल्या तत्त्वांना बाजूला सारलं असतं, तर वाजपेयी सरकार अवघ्या 13 महिन्यात न कोसळता टिकलं असतं. तसंच रा.सू. गवई यांना केंद्रात मंत्रिपद देखील मिळालं असतं, असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

2008-09 मध्ये राजेंद्र गवईंची एंट्री : रा.सू. गवई यांच्यावर 2006 मध्ये केरळ, बिहारचे राज्यपाल म्हणून नवी जबाबदारी आली. अमरावतीच्या राजकारणात 2008 मध्ये पहिल्यांदाच मुंबईवरून रा.सू. गवई यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गवई अमरावतीत आले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीची डॉ. राजेंद्र गवई यांनी जोरदार तयारी केली होती. त्या निवडणुकीत पहिल्यांदाच अमरावती बाहेरून आलेले शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात राजेंद्र गवई यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला तगडी लढत दिली. त्यावेळी 54 हजार मतांनी डॉ. राजेंद्र गवई यांचा पराभव झाला होता. त्यांना एकूण 2 लाख 54 हजार इतकी मतं मिळाली होती.


2014 मध्ये सोडली काँग्रेस, राष्ट्रवादीची साथ : 2014 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे चिन्ह उगवता सूर्य निवडणूक आयोगानं गोठवलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसनं डॉ. राजेंद्र गवई यांना आपल्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती. "हम तो डुबेंगे ही सनम तुम्हे भी ले डूबेंगे" असं म्हणत डॉ. राजेंद्र गवई (Rajendra Gavai) यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला आपण जागा दाखवण्यास सक्षम असल्याचं म्हणत थेट प्रहारचे बच्चू कडू यांच्यासोबत युती केली होती. खरंतर राजेंद्र गवई यांच्याकडं 2009 च्या निवडणुकीत मिळालेल्या 2 लाख 54 हजार मतांची शिदोरी असताना देखील 2014 च्या निवडणुकीत त्यांना केवळ 54 हजार मतं मिळाली. त्यावेळी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ विजयी झाले होते. दुसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनीत राणा होत्या.



2019 मध्ये नवनीत राणांचा प्रचार : 2015 मध्ये रा.सू गवई यांचं निधन झालं. यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संपूर्ण धुरा डॉ. राजेंद्र गवई यांच्यावर आली. 2019 मध्ये राजेंद्र गवई पुन्हा नव्या दमानं निवडणूक रिंगणात उतरतील, असं वाटत असताना त्यांनी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा यांना आपला पाठिंबा जाहीर केला. इतकंच नव्हे, तर राजेंद्र गवई यांच्या आई कमलताई गवई यांनी स्वतः नवनीत राणा यांचा एबी फॉर्म भरेपर्यंत संपूर्ण जबाबदारी पार पाडली. 2014 मध्ये ज्या राष्ट्रवादी काँग्रेसनं डॉ. राजेंद्र गवई यांना आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढण्याची ऑफर दिली होती, तेच राजेंद्र गवई राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आपला पक्ष गुंडाळून मैदानात उतरले होते. त्यामुळं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी हा मोठा धक्का होता.

विधानसभा निवडणूक लढवून झाकली मूठ केली उघड : 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यावर डॉ. राजेंद्र गवई यांनी अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, असा सल्ला पक्षातील ज्येष्ठांनी त्यांना दिला होता. मात्र, आपण सोनिया गांधींसोबत बसणारे नेते आहोत विधानसभा लढवणं आपल्याला शोभणारे नाही, असा होरा त्यावेळी राजेंद्र गवई यांचा होता. 2019 मध्ये मात्र, चक्क अचलपूर विधानसभा मतदारसंघात केवळ काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी राजेंद्र गवई यांनी निवडणूक लढवली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते अशी ओळख सांगणाऱ्या डॉ. राजेंद्र गवई यांना त्या निवडणुकीत केवळ 2 हजार 591 मतं मिळाली. या अल्पशा मतांमुळं डॉ. राजेंद्र गवई यांची लाखाची झाकलेली मूठ सर्वांसमोर उघडी झाली.

2014 मध्ये चालवली कैची : डॉ. राजेंद्र गवई यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना दर्यापूर, अचलपूर, तिवसा, अमरावती, बडनेरा या मतदार संघातून उमेदवारी दिली. त्यावेळी सर्वच पक्षाचे उमेदवार स्वतंत्र लढले. गवईंच्या पक्षाचे सर्व उमेदवार हे कात्री चिन्हावर निवडणूक रिंगणात होते. या निवडणुकीत राजेंद्र गवई यांचा आलेला अनुभव पाहता त्यांच्या पक्षातील प्रताप अभ्यंकर हे थेट भाजपामध्ये निघून गेले. अमरावती जिल्हा परिषदेत रिपाइं, गवई गटाचा मराठा चेहरा असणारे अभिजीत ढेपे यांनी देखील पक्षाला रामराम ठोकला. दर्यापूर मतदार संघात, तर रामेश्वर अभ्यंकर यांना आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार उभा करून पक्षातील बळवंत वानखडे यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यास सांगितलं. याचा फायदा जिल्हा बाहेरून पहिल्यांदाच अमरावतीत आलेले शिवसेनेचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांना झाला.

बळवंत वानखडे झाले आमदार : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पूर्वी जिल्हा परिषद तसंच महानगरपालिकेमध्ये तीन ते सात सदस्य हमखास असायचे. ग्रामपंचायत, पंचायत समितीवरदेखील रिपाइंचा झेंडा फडकायचा. मात्र, आता कुठंच त्यांचा झेंडा दिसत नाहीये. 2014 च्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेत दर्यापूर विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोडून बळवंत वानखडे काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आलेत. आता अमरावती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बळवंत वानखडे यांचं नाव आघाडीवर आहे.

डॉ. राजेंद्र गवई यावेळी काय करणार : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा असणारे डॉ. राजेंद्र गवई पूर्णतः खासदार नवनीत राणा तसंच बडनेराचे आमदार रवी राणा यांना समर्पित आहेत. 2019 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी डॉ. राजेंद्र गवई स्वतः मैदानात उतरले होते. आता पुन्हा नवनीत राणा यांना निवडून आणण्यासाठी डॉ. राजेंद्र गवई पूर्ण प्रयत्न करणार, असं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्ष सोडून गेलेले कार्यकर्ते सांगताहेत. वेळ पडल्यास अनुसूचित जातीच्या मतांचं विभाजन व्हावं आणि याचा फायदा नवनीत राणा यांना मिळावा यासाठी डॉ. राजेंद्र गवई निवडणूक रिंगणात देखील उतरू शकतात, असा अंदाज देखील त्यांच्या खास निकटवर्तीयांकडूनच व्यक्त केला जात आहे.

हे वाचलं का :

  1. Amit Thackeray News : निवडणुकीच्या रिंगणात ठाकरे कुटुंबातील दुसरे सदस्य उतरणार? अमित ठाकरे यांच्या नावाची 'या' मतदारसंघाकरिता चर्चा
  2. 'वंचित'चा काँग्रेसला सात जागांवर पाठिंब्याचा प्रस्ताव, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षावरून विश्वास उडाला; आंबेडकरांचं खर्गेंना पत्र
  3. Raj Thackeray Met Amit Shah : राज ठाकरे एनडीएमध्ये सहभागी होणार? अमित शाह यांच्याबरोबर अर्धा तास झाली बैठक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.