ETV Bharat / state

गुन्हेगारीत महाराष्ट्र बिहारकडे वाटचाल करतोय का? असं का वाटतंय? काय आहेत कारणे?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 9, 2024, 5:17 PM IST

Gun Firing In Maharashtra
महाराष्ट्रात गोळीबार

Gun Firing In Maharashtra : शांतताप्रिय आणि पुरोगामी राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे; मात्र महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. राज्यातील विविध भागात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. (Shooting Incidents in Maharashtra) यामुळं गुन्हेगारीच्या बाबतीत सुसंस्कृत आणि शांत महाराष्ट्र बिहारकडे वाटचाल करत आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महाराष्ट्रातील गुन्ह्यांविषयी राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया

मुंबई Gun Firing In Maharashtra : 2024 या वर्षाच्या सुरुवातीलाच पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर कोथरूड परिसरात गोळीबार करण्यात आला होता. यात शरद मोहोळ गंभीररित्या जखमी झाला होता. (Maharashtra Crime Rate) अखेर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याआधी ऑक्टोबर 2023 मध्ये पुण्यात घोरपडे पेठेतील एका इमारतीत घुसून परप्रांतीय कामगारावर रात्रीच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये एका सराफ व्यावसायिकावर गोळीबार करून सोनं लुटण्यात आलं. या घटनेमुळं पुण्यात भीतीचं वातावरण पसरलं होतं. नोव्हेंबर 2023 मध्येच पुण्यातील बाणेरच्या महाबळेश्वर हॉटेलजवळ किरकोळ वादातून दोन मित्रांमध्ये गोळीबार झाला. तर जुलै 2023 महिन्यात स्वारगेट परिसरातसुद्धा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती.

सांगलीत नगरसेवकाची भर रस्त्यात हत्या : सांगलीत मार्च 2023 मध्ये जत नगरपालिकेच्या भाजपा नगरसेवकाची भर रस्त्यात हत्या केल्याची घटना घडली होती. गुंडांनी नगरसेवकाची गाडी अडवून त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळं जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती. तर 30 जानेवारी 2024 रोजी शहरातील जुना बुधगाव रस्त्यावर रत्नजित पाटील या युवकावर अज्ञातांनी गोळीबार केला. पुढे सांगलीतच जून 2023 मध्ये नगरसेवकानं गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून नगरसेवकानं फायरिंग केली होती. त्यामुळं भीतीचं वातावरण सांगलीत होतं.


जालन्यात तरुणावर गोळीबार : डिसेंबर 2023 रोजी जालना शहरातील मंठा चौफुली भागात गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला. गजानन तौर असं गोळीबारात मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. यानंतर जालना जिल्ह्याती दोन महिन्यांपूर्वी घनसांवगीतील पानेवाडी या गावच्या आठवडी बाजारात दुपारी एका तरुणानं गोळीबार केल्याची घटना घडली. यात एक तरुण जखमी झाला होता. यानंतर 5 जानेवारी 2024 रोजी गुटख्याच्या पुडीवरून झालेल्या बाचाबाचीत मित्रानेच मित्राचा चाकूनं भोसकून खून केला होता.


मुंबईत शिंदे गटाच्या आमदारावर गोळीबाराचा आरोप : शिंदे गटाचेच आमदार सदा सरवणकर यांच्यावरही गोळीबार केल्याचा आरोप आहे. सप्टेंबर 2022 मध्ये प्रभादेवी परिसरात गणपती विसर्जनाच्यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद झाला होता. त्यातूनच आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केला. विशेष म्हणजे, सदा सरवणकरांच्या बंदुकीतून गोळीबार झाला; पण तो त्यांनी केलाच नसल्याचं पोलीस अहवालात समोर आलं.


उल्हासनगरात भाजपा आमदाराचा गोळीबार : मागील आठवड्यात उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाले. जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरूध्द गुन्हा दाखल केला.


दहीसरमध्ये माजी नगरसेवकावर गोळीबार : 8 फेब्रुवारी 2024 रोजी ठाकरे गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा यांनी गोळीबार केला. यात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला. यानंतर मॉरिसने स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. मॉरिस नोरोन्हाच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.


महाराष्ट्राचा बिहार झालाय- ठाकरे गट : राज्यातील वाढती गुन्हेगारी आणि वाढते गोळीबार पाहता कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. याला संपूर्णपणे राज्य सरकार आणि गृहमंत्री जबाबदार आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे प्रवक्ते तुषार रसाळ यांनी केली आहे. महाराष्ट्र सध्या गुन्हेगारीच्या बाबतीत बिहारकडे वाटचाल करतोय का? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे; पण मला असं मुळीच वाटत नाही. तर महाराष्ट्र बिहारकडे वाटचाल करत नसून, महाराष्ट्राचा बिहार झालेला आहे, असंही तुषार रसाळ यांनी म्हटलं आहे. दरम्यान, या सर्व गुन्हेगारीस राज्य सरकार आणि गृहमंत्री कारणीभूत असून गृहमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, ही आमची मागणी असल्याचं ठाकरे गटाचे प्रवक्ते तुषार रसाळ यांनी म्हटलं आहे.


विरोधक राजकारण करताहेत- शिंदे गट : उल्हासनगर आणि दहिसर या दोन्ही घटना पूर्व वैमनस्यातून आणि वैयक्तिक वादातून घडलेल्या आहेत; परंतु या दोन्ही घटनांचं विरोधक घाणेरडं राजकारण करत आहेत, असा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी केला आहे. गुन्हेगारी क्षेत्रात महाराष्ट्र बिहारकडे अजिबात वाटचाल करत नाही. उलट महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचं राज्य आहे. त्यामुळे विरोधकांकडे काही काम नसल्यामुळं हे बिनबुडाचे आरोप आणि सरकारला बदनाम करण्याचं काम करताहेत, असंही अरुण सावंत म्हणाले. कुणाचा तरी मृत्यू झालाय याबाबत तरी किमान विरोधकांनी संवेदनशीलता दाखवून, याचं घाणेरडं राजकारण करू नये. विरोधकांची जी डायलॉगबाजी सुरू आहे ती अत्यंत चुकीची आहे. सत्ताधारी-विरोधकात जर हा कलगीतुरा असाच सुरू राहिला तर समाजात कोणताही बदल घडणार नाही. उलट कायदा आणि सुव्यवस्थेचेच तीनतेरा वाजतील, अशी भीतीसुद्धा अरुण सावंत यांनी व्यक्त केली आहे.


महाराष्ट्रात राहतोय की बिहारमध्ये : महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचं राज्य आहे. राज्यातील विविध भागात सतत गुन्हे घडत आहेत. त्यामुळं आपण महाराष्ट्रात राहतोय की बिहारमध्ये हेच समजत नाही, असं मत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी मांडलय. फेसबुक लाईव्हमध्ये एका लोकप्रतिनिधीवर गोळीबार होतो आहे. गेल्या चार दिवसात लोकप्रतिनिधीकडून किंवा लोकप्रतिनिधींवर उघडपणे गोळीबार होण्याची ही दुसरी घटना आहे. सामान्य माणसात असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी, अत्यंत चीड आणणारी ही घटना आहे. महाराष्ट्राला गुन्हेगारीचा डाग लावत असाल तर जनता तुम्हाला माफ करणार नाही. राज्यात गुंडगिरी वाढत चालली आहे. खुलेआम गोळीबाराच्या घटना घडत आहेत. याची नैतिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्राचा बिहार करणाऱ्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, अशी मागणी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

हेही वाचा:

  1. अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी मोठी बातमी, मारेकरी मॉरिसच्या अंगरक्षकासह तिघं ताब्यात
  2. अभिषेक घोसाळकर खून प्रकरण: आरोपी मॉरिसवर आर्म्स अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल
  3. अतिक्रमणाविरोधात कारवाईनंतर हल्द्वानीमध्ये उसळली दंगल; संचारबंदी लागू, पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.