ETV Bharat / state

श्रीरामांचा साईनगरीतील वनवास कधी संपणार? 105 वर्ष जुन्या मूर्ती अजूनही मंदिराच्या प्रतिक्षेत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 2:10 PM IST

Ram Mandir In Shirdi
Ram Mandir In Shirdi

Ram Mandir In Shirdi : अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर आता साईबाबांच्या शिर्डीत देखील मंदिराची मागणी जोर पकडू लागली आहे. येथील श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान आणि श्रीकृष्णाच्या मूर्तींना 105 वर्षानंतरही मंदिराची प्रतिक्षा आहे.

पाहा व्हिडिओ

शिर्डी Ram Mandir In Shirdi : अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली. गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी संघर्ष जारी होता. आता अयोध्येनंतर काशी आणि मथुरा येथील मंदिरांसाठीची मागणी जोर पकडू लागली आहे.

105 वर्ष जुन्या मूर्ती : अशाच प्रकारचा सूर आता साईबाबांच्या शिर्डीतूनही उमटतोय. शिर्डीचे साईबाबा जगभरातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान आहेत. त्यांच्या हयातीत शिर्डीत श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान आणि श्रीकृष्णाच्या मूर्ती आणण्यात आल्या होत्या. मात्र तब्बल 105 वर्षानंतरही त्यांच्या मंदिरासाठीची प्रतिक्षा संपलेली नाही.

Shri Ram Temple demand
ह्याच त्या मूर्ती

साईबाबांच्या आज्ञेनुसार वाडा बांधला : नागपूरच्या गोपाळराव उर्फ बापूसाहेब बुटींनी साईबाबांच्या आज्ञेनुसार ते जिवंत असताना शिर्डीत वाडा बांधला होता. साईबाबांनी शिर्डीत श्रीराम जन्मोत्सव तसेच श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सुरू केला होता. बुटींनी बाबांच्या अनुमतीनं या वाड्यात स्थापित करण्यासाठी नागपूरहून श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान आणि श्रीकृष्णाची मूर्ती आणल्या. त्यासाठी वाड्यात चौथराही उभारला. मात्र या मूर्तींच्या स्थापनेपूर्वीच साईबाबांचं महानिर्वाण झालं.

मूर्ती साईबाबा संस्थानच्या वस्तुसंग्रहालयात आहेत : यानंतर सर्वांच्या सहमतीनं हा चौथरा खोदून येथे साईबाबांची समाधी बांधण्यात आली. तेव्हापासून बुटीवाडा साईबाबांचं समाधी मंदिर बनलं. त्यानंतर काही वर्षांनी बुटींच निधन झालं. त्यांच्या निधनानंतर या मूर्तींचा विषय मागे पडला. सध्या या मूर्ती साईबाबा संस्थानच्या वस्तुसंग्रहालयात जपून ठेवण्यात आल्या आहेत. आता त्या मूर्तींची मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

साई संस्थानकडे अनेकदा पाठपुरावा : गोपाळराव बुटींच्या वंशजांनी आणि शिर्डीतील ग्रामस्थांनी वस्तू संग्रहालयातील या मूर्ती काढून त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात यावी, यासाठी साई संस्थानकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे. तसेच यासाठी निधी देण्याचीही तयारी दर्शवली आहे. त्यानंतर आता राजकीय दरबारी यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, लवकरच या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होईल, अशी अपेक्षा भक्तांना आहे.

हे वाचलंत का :

  1. साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीसाठी 53 उमेदवार रिंगणात, कोणतं पॅनल जिंकणार?
  2. शिर्डी रहिवाशांची आधार कार्ड वापरुन बाहेरील भाविकांना दर्शन, साई संस्थानकडून महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
  3. धोनी साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत कधी येणार, पत्नी साक्षीनं दिलं 'हे' महत्त्वाचं अपडेट
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.