ETV Bharat / state

भाजपाचा 400 पार'चा नारा! मात्र, जागा वाटपाचं सुत्र बिघडलं; अजित पवार गटामुळे पेच प्रसंग

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 6:17 PM IST

Updated : Mar 6, 2024, 6:48 PM IST

Lok Sabha seats to Ajit Pawar group : एकनाथ शिंदे यांचं बंड झाल्यानंतर बहुमतात सरकार स्थापन झालं. मात्र, भाजपाने लोकसभा टार्गेट डोळ्यासमोर ठेऊन अजित पवारांनाही सोबत घेतलं. मात्र, पवार सोबत आले असले तरी लोकसभा जागांचं गणित किचकट झालं असल्याची परिस्थिती आहे. अशातच राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे यांना जितक्या जागा मिळतीत तितक्याच आम्हाला द्या असा सूर आळवल्याने नवी अडचण उभी राहण्याची चिन्हं आहेत.

फाईल फोटो
फाईल फोटो

व्हिडिओ

मुंबई Lok Sabha seats to Ajit Pawar group : मागच्या वर्षी जुलै 2023 मध्ये राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थिर असताना अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांचा सत्तेतील सहभाग हा येणाऱ्या काळात भाजपा तसंच, शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरू शकतो हे तेव्हासुद्धा पडद्यामागून अनेक नेत्यांनी सांगितलं होतं. आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सत्तेतील सहभाग लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच नाही तर शिंदे गटालासुद्धा अडचणीचा ठरत आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे महायुतीचा लोकसभा जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम असून अजित पवार गटानेही शिंदे गटाला देण्यात येणाऱ्या जागांएवढ्याच जागा आम्हालाही मिळाव्यात असा आग्रह धरला आहे.

जास्तीत जास्त जागांची मागणी : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून "अबकी बार 400 पार" आणि राज्यामध्ये 45 पार अशी भूमिका घेतली आहे. यासाठी राज्यात भाजपाकडून जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भाजपासोबत जात राज्यात सत्तांतर घडवून आणलं. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार पूर्ण बहुमताने स्थिरावलं असताना अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. इतकंच, नाही तर आपल्यासोबत आलेल्या आमदारांना मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती देण्यातसुद्धा ते यशस्वी ठरले. अजित पवार यांना सत्तेत घेऊ नये, घेतलं तर त्यांना अर्थमंत्री हे खातं देऊ नये. याबाबत भाजपाकडून तसंच शिंदे गटाच्या नेत्यांकडूनही बराच दबाव टाकण्यात आला. परंतु, या सर्वांना बगल देत अजित पवार यांना शिंदे-फडवणीस सत्तेत महत्त्वाचं स्थान देण्यात आलं. अशा परिस्थितीमध्ये आता महायुतीत लोकसभा जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असताना अजित पवार गटही जास्तीत जास्त जागा हव्यात या हट्टाना पेटला आहे.

दिल्ली दरबारीच निर्णय होईल : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस महाराष्ट्र मुंबईच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला असल्याची खात्रीशीर सुत्रांची माहिती आहे. परंतु, तो प्रयत्न यशस्वी झालेला नाही असं सध्याचं चित्र आहे. शिवसेना लोकसभेसाठी 22 जागांसाठी आग्रही आहे. भाजपा 32 ते 35 जागांवर निवडणूक लढण्यावर ठाम आहे. अशा परिस्थितीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा दिल्या जातील? हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा आहे. ज्या पक्षांचे विद्यमान खासदार आहेत तितक्या जागा त्यांना देण्यात याव्यात अशी यांची मागणी असल्याची सुत्रांची माहिती आहे.

18 जागांची मागणी : अशा परिस्थितीत भाजपाकडं सध्याच्या घडीला 23 खासदार आहेत. तर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 13 खासदार आणि अजित पवार यांच्याकडे एकच खासदार आहे. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांनाही शिंदे गटाला देण्यात येतील तितक्या जागा हव्यात असा आग्रह केला आहे. 2019 च्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यात 4 खासदार निवडून आले होते. त्यापैकी 3 खासदार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असून, रायगडचे सुनील तटकरे हे एकमेव खासदार अजित पवार गटासोबत आहेत. तसंच, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले होते. त्यापैकी 13 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत असून, 5 खासदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. या सर्व परिस्थितीत छगन भुजबळ यांनी प्रत्यक्षपणे शिंदे यांच्या गटाला देण्यात येणाऱ्या जागा म्हणजे 18 जागांची मागणी केल्याने मोठी अडचण निर्माण होईल असं चित्र आहे.

जागावाटपाचा तिढा कायम : या विषयावर बोलताना एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते वैजनाथ वाघमारे म्हणाले की, महायुतीतील जागा वाटपाचा तिढा लवकरच सोडवला जाईल. 2019 च्या निवडणुकीत आम्ही जितक्या जागा लढल्या होत्या तितक्या जागांचा अधिकार आम्हाला आहे. याबाबत अजित दादा यांची राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते तो त्यांचा विषय आहे. पण हा विषय समोपचराने सोडवला जाईल, असंही वाघमारे म्हणाले आहेत. परंतु, असं जरी असलं तरी जागा वाटपाचा तिढा सोडवणं हे इतकं सोपं काम नाही. अजित पवार यांना सत्तेत सामील करून घ्यायची गरजच काय होती? ही मागं बंद झालेली चर्चा पुन्हा लोकसभा जागा वाटपाच्या मुद्द्यावरून दबक्या आवाजात सुरू झाली आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या गटाने लोकसभा निवडणुकीसाठी बारामती, माढा, शिरूर, रायगड, बुलढाणा, सातारा, धाराशिव, परभणी, हिंगोली आणि गडचिरोली या जागांवर दावा केला आहे.

हेही वाचा :

1 अमित शाह यांनी बैठक घेऊनही जागा वाटपाची बैठक निष्फळ? भाजपाच्या लोकसभा उमेदवारांची रखडली यादी

2 कोल्हापुरात जुडवा पोलीस कर्मचारी; ओळखताना अनेकांचा उडतोय गोंधळ, साहेबांचीही होते तारांबळ

3 "पक्ष आणि पवार कुटुंबात फूट नाही"; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

Last Updated : Mar 6, 2024, 6:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.