ETV Bharat / state

"मुंबई काँग्रेस अध्यक्ष आशिष शेलार", भाजपात प्रवेश करताच अशोक चव्हाणांचा 'स्लिप ऑफ टंग'; म्हणाले फडणवीस जे सांगतील ते करणार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 13, 2024, 2:18 PM IST

Updated : Feb 13, 2024, 4:42 PM IST

Ashok Chavan Join Bjp : गेली सहा दशकांची काँग्रेसची राजकीय परंपरा असलेले ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आज मंगळवार (दि. 13 फेब्रुवारी)रोजी अखेर भाजपवासी झाले. मात्र प्रवेशानंतर त्यांनी आशिष शेलार यांचा उल्लेख मुंबई काँग्रेस अध्यक्ष असा केला.

अशोक चव्हाण भाजपाच्या गोटात दाखल
अशोक चव्हाण भाजपाच्या गोटात दाखल

अशोकराव चव्हाण यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई Ashok Chavan Join Bjp : माझ्या राजकीय आयुष्याची ही नवी सुरूवात आहे. मी कालपर्यंत काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केलं आहे. आता भाजपामध्येही मी प्रामाणीकपणेच काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर दिली आहे. यावेळी त्यांनी सवईप्रमाणे आशिष शेलार यांचा उल्लेख मुंबई भाजपा अध्यक्ष असा करण्या ऐवजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष असा केला. त्यावेळी एकच हशा पिकला. मात्र लगेच दुरुस्ती करत त्यांनी शेलार यांचा उल्लेख भाजपा अध्यक्ष असा केला. यावेळी आदर्श घोटाळ्याबाबत विचारलं असता चव्हाण म्हणाले, या प्रकरणात आमच्या बाजूने निकाल लागला आहे. तसंच, त्यामध्ये बऱ्याच याचिका दाखल आहेत. मात्र, या प्रकरणात मी बरंच काही सहन केलंय असंही ते यावेळी म्हणाले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये अधिकृतरित्या भाजपामध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक काँग्रेसचे माजी आमदार अमर राजूरकर यांनीही आज भाजपात प्रवेश केला. अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्याची दाट शक्यता असल्यानं हा प्रवेश छोटेखानी पद्धतीने झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रसंगी बोलताना अशोक चव्हाण यांनी हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांच्या येण्यानं भाजपा पक्ष अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला.

योग्यवेळी ती मदत घेतली जाईल- याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "भाजपामध्ये अशोक चव्हाण, अमर राजूरकर यांचे मन:पूर्वक स्वागत करतो. यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात भाजपाची व युती पक्षाची शक्ती वाढली आहे. मोदी यांनी भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वास नेण्याचं काम केलं. त्यामुळे देशातील प्रत्येकाला असे वाटतं की, आपण मोदींजीसोबत काम करावं. देशाला पुढे नेण्याचं काम पंतप्रधान मोदी करत आहेत." अशोक चव्हाण यांनी पक्षात प्रवेश करताना कुठलीही अपेक्षा ठेवली नाही. फक्त विकासाच्या मुख्य प्रवाहात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या प्रवेशानं राज्यातील भाजप व युती पक्षाची ताकद ही नक्की वाढणार आहे. अशोक चव्हाण यांची मदत कधी कशी घ्यायची, हे आम्हाला पक्के ठाऊक आहे. योग्यवेळी ती मदत घेतली जाईल. येत्या काही काळात अजूनही मोठे पक्ष प्रवेश भाजपामध्ये होणार आहेत," असेही फडणवीस म्हणाले.

सभागृहाच्या बाहेर आम्ही सर्व एक- भाजपामध्ये पक्ष प्रवेश झाल्यानंतर यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, "जिथे मी राहिलो आहे, तिथे प्रामाणिकपणे काम केलं आहे. इथेही मी प्रामाणिकपणे काम करेन. कुठलेही दोषारोप मी कोणावर करणार नाही. सबका साथ सबका विकास, ही प्रधानमंत्री यांची भूमिका आहे. या भूमिकेने मी प्रेरित झालो आहे. जे चांगले ते चांगले आहे. विरोधी पक्षात असताना सुद्धा आम्ही जाणूनबुजून कधी मोदींवर टीका केली नाही. महाराष्ट्राच्या विधिमंडळात अनेक दिग्गज आम्ही पाहिले आहेत. सभागृहाच्या बाहेर आम्ही सर्व एक असतो. तसेच जो आदेश पक्ष मला देईल ते काम मी करेन. भाजपमध्ये पक्ष प्रवेश करताना कुठलीही मागणी मी केलेली नाही. हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे. मी या पक्षात नवीन आहे, म्हणून मी आज काही जास्त बोलणार नाही.

वाद घालण्यात काही अर्थ नाही- गेल्या ३८ वर्षाचा राजकीय प्रवासात आज मी नव्याने सुरुवात करत आहे. देशाच्या विकासात आपली सुद्धा महत्त्वाची भूमिका असावी, या इच्छेनं मी भाजपामध्ये प्रवेश करत आहे. मी कोणालाही माझ्यासोबत बोलवलं नाही. हा निर्णय माझ्यासाठी इतका सोपा नव्हता. माझ्यासाठी, राज्यासाठी, माझ्या मतदारसंघासाठी महत्त्वाचा निर्णय होता. पक्षानं मला भरपूर दिले आहे. पण मीसुद्धा पक्षाला भरपूर दिलं आहे. म्हणून यावर वाद घालण्यात काही अर्थ नाही," असेही चव्हाण म्हणाले.

मोदींच्या नेतृत्वात देशाची सेवा करणार : आज देशात मोठ्या समस्या आहेत. राजकारण हे विकासाचं माध्यम आहे. त्यामुळे भाजपामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मी प्रामाणिकपणे काम करणार आहे. मोदींच्या नेतृत्वात मी देशाच्या सेवेच काम करणार आहे असंही अशोक चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने मी प्रभावीत झालो आहे. ते आज देशभरात मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलं काम करत आहेत. सर्व प्रश्न सोडवण्यासाठी ते सक्षम आहेत. त्यांच्यासोबत मी आता काम करणार आहे असंही चव्हाण म्हणाले. मी कुणावरही टीका करणार नाही. मी आजपासूनच भाजपामध्ये एका सकारात्मक दृष्टीने काम करणार आहे. तसंच, माझ्यावर कुणी टीका केली, कुणी समर्थन केलं. तरीही मी कुणावर काही बोलणार नाही, असं म्हणत चव्हाण यांनी यावेळी काँग्रेस नेत्यांवर बोलणं टाळलं. हा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता. मी खूप दिवस यावर विचार केला. परंतु, देशात मोदींच्या नेतृत्वात खूप चांगलं काम चालू आहे. तसंच, काँग्रेसने आपल्याला खूप दिलं आहे. परंतु, मीही काँग्रेसला खूप दिलं आहे असाही दावा चव्हाण यांनी केला आहे.

हेही वाचा :

1 अखेर अशोक चव्हाण यांनी 'कमळ' हाती घेतलं, काँग्रेसला 'बाय-बाय'

2 तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपात गेलेलं बरं; विनायक राऊतांचा अशोक चव्हाणांना टोला

3 शेतकरी आंदोलन चिघळलं; पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा, शंभू सीमेवर अनेक शेतकरी ताब्यात

Last Updated : Feb 13, 2024, 4:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.