ETV Bharat / state

फळांमध्ये फूल; धार्मिक महत्त्व, प्राणवायूचा खजिना असणाऱ्या उंबराच्या झाडाखाली भरपूर पाणीसाठा - Properties Of Udumbara Tree

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2024, 5:26 PM IST

Updated : May 22, 2024, 8:01 PM IST

Properties Of Udumbara Tree : उंबराचं झाड हे 24 तास प्राणवायू देणारं झाड असून या झाडाच्याखाली पाण्याचा मोठा साठा आढळतो. अनेक झाडांना फुलांपासून फळं येतात; मात्र उंबर या झाडाच्या फळांमध्ये फूल असतं. निसर्गाची ही आगळी-वेगळी किमया उंबरासंदर्भात आहे. धार्मिक महत्त्वासह उंबराचे औषधी गुणधर्म असणाऱ्या संदर्भात इतिहास आणि वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक डॉ. वैभव मस्के यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना वैशिष्ट्यपूर्ण अशी माहिती दिली.

Properties Of Udumbara Tree
उंबराचं झाड (Reporter)

उंबराच्या झाडाचं महत्त्व सांगताना वनस्पतीशास्त्रज्ञ (Reporter)

अमरावती Properties Of Udumbara Tree : अनेक मंदिरांमध्ये तसंच धार्मिक स्थळांवर उंबराचं झाड हे हमखास बहरलेलं दिसतं. उंबराचं झाड तोडू नये असं सांगितलं जातं. उंबराच्या झाडाला हिरवी लाल फळं नेहमीच आढळतात. उंबराची फळं दिसत असली तरी उंबराचं फूल हे कोणीही पाहिलं नाही. खरंतर उंबराचे फळ हेच उंबराचे फूल आहे. उंबराचं फूल फोडल्यावर त्यामध्ये फुलाचे सर्व अवयव दिसतात. या फळांमध्ये 'ब्लास्टोफ्यागा पेनिस' हा कीटक नेहमीच आढळतो. चिलटासारख्या असणाऱ्या ह्या कीटकाचं वैशिष्ट्य म्हणजे हे बॅक्टेरिया आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. यातील मुख्य मादी अंडी घालून अनेक नर मादी पिल्लांना जन्म देते. ही मादी स्वतः तिच्या पिल्लांना बंद फळाबाहेर काढत आपली आहुती देते. मादी मृत्यूला कवटाळून या फळांमध्येच विलीन होते. या फळात पौष्टिकता निर्माण करते. उंबराप्रमाणेच वड, पिंपळ आणि अंजीर या फळांची रचना देखील बाहेरून फळ आणि आतून फुले अशीच आहे. यातील नर जातीची फुलं ही फळांच्या पुढच्या भागात असतात तर स्त्री जातीची फूलं ही देठाकडील भागात असतात उंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात. याची सावली अतिशय शीतल असते. झाडाचा पाला, फळे, साल गुरांना चारा म्हणून वापरतात. जिथे उंबर असतो तिथे पाण्याचा स्रोत असतो अशी मान्यताच नव्हे तर ते नैसर्गिक सत्य असल्याचे वैभव मस्के यांनी सांगितलं.

घराच्या उंबरठ्याचा उंबराशी संबंध : घराचा उंबरठा असा शब्द नियमित वापरला जातो. पूर्वीच्या काळी उंबराच्या झाडाच्या लाकडापासून घराला लावल्या जाणारा दाराच्या चौकटीखाली खास उंबरठा तयार केला जायचा. आज देखील अनेक जुन्या वाड्यांमध्ये सागवानाची मोठी दारं असली तरी उंबरठा हा उंबराच्या लाकडाचाच आढळतो. पाण्यातही दीर्घकाळ हे लाकूड टिकून राहात असल्यामुळे त्याचा वापर दाराच्या उंबरठ्यासाठी केला जात असे. दाराच्या खाली उंबराचे लाकूड म्हणून त्या भागाला उंबरठा असं नाव पडलं. आज ज्याला आपण उंबरठा म्हणतो त्या ठिकाणी उंबराच्या लाकडाचा वापर होत नसला तरी त्या जागेचं नाव मात्र उंबरठा म्हणूनच घेतला जात असल्याचं वैभव मस्के यांनी सांगितलं.

उंबराबाबत अशी आहे आख्यायिका : सद्गुरु दत्त यांचं उंबराच्या झाडाखाली स्थान असल्याची श्रद्धा आहे. महादेवाच्या मंदिर परिसरात देखील मोठ्या प्रमाणात उंबराची झाडं आढळतात. भगवान विष्णूने नृसिंहवतारात हिरण्यकश्यपूचा वध उंबरठ्यावर बसून केला. त्यावेळी नृसिंहाला जखमा होऊन त्याच्या नखात विषबाधा झाली. त्यामुळे नृसिहांनी आपली नखं उंबराच्या खोडात खूपसून विषबाधेचं शमन केलं. लक्ष्मीने उंबराची फळ वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावला आणि त्यामुळे नृसिंहांना होणारा दाह थांबला अशी आख्यायिका देखील उंबरा संदर्भात पुराणांमध्ये असल्याचं प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी सांगितलं.

असे आहेत औषधी गुणधर्म : गालफुगी, गालगुंड अशा आजारात उंबर वृक्ष औषधी म्हणून उपयुक्त ठरतात. उंबराच्या पानाच्या रसामुळे शरीरातील उष्णता निघून जाते. कावीळ, खाज गोवर, कांजण्या, रक्तस्त्राव, विंचू चावणे किंवा इतर विषबाधा, उचकी लागणे, अतिसार उन्हाळी, मधुमेह आदी रोगांवर उंबराची फळं, फूलं आणि पानं उपयोगी पडतात. शरीराची व्याधी दूर करणारे म्हणून उंबर ओळखलं जातं.

पक्षांमार्फत होतो बीज प्रसार : अंजीर इतकेच पौष्टिक उंबर देखील आहे. अंजीराला आज ड्रायफूटचा मान मिळाला असताना उंबर मात्र झाडाला पिकून झाडाखालीच त्याचा सडा पडलेला दिसतो. उंबराचं झाड हे पक्षी कीटक आणि खारुताईंसाठी अतिशय आवडते राहण्याचे स्थान आहे. उंबराचे फळ खाऊन पक्षी त्याचा बीज प्रसार करतात आणि त्याद्वारेच हे झाड जमिनीत उगवतं. भारत, श्रीलंका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया या देशात उंबर सर्वत्र आढळतो. मेळघाटच्या जंगलात अनेक ठिकाणी नदीच्या काठावर उंबराची झाडं बहरलेली दिसतात. हे झाड तोडल्यानं पाप लागतं अशी मान्यता असून हे झाड लावणं हे पुण्य कर्म असल्याचे सांगितलं जातं.

हेही वाचा :

  1. मनीषा कोईरालानं ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची घेतली भेट, फोटो केले शेअर - Manisha Koirala meets UK PM
  2. पुणे अपघात प्रकरणात बाल हक्क न्याय कोर्टानं निकाल राखून ठेवला, 4 वाजता देण्यात येणार निकाल - pune porsche accident update
  3. अपघात प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांचे आहे अंडरवर्ल्ड कनेक्शन, पोलिसांनी वरदहस्त दाखविल्यानं टळली अटक - pune hit and run accident
Last Updated : May 22, 2024, 8:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.